सुमनी स्वर हरपले
संगीताच्या आकाशात काही स्वर गाजतात, काही स्वर दुमदुमतात, पण काही स्वर असेही असतात की ते कोणताही गाजावाजा न करता काळाच्या स्मरणात कायमचे कोरले जातात. सुमन कल्याणपूर यांचा स्वर असाच होता. नाजूक, स्वच्छ, संयमी आणि मनाच्या अतिशय आतल्या कोपऱ्याला स्पर्श करणारा. त्यांच्या आवाजात नाट्यामयता नव्हती, पण भावनांची खोली होती. दिखाऊपणा नव्हता, पण अभिजात सौंदर्य होते. म्हणूनच त्यांचे गाणे ऐकताना रसिकाला केवळ स्वर ऐकू येत नाहीत, तर एक सुसंस्कृत, शांत आणि निर्मळ भावविश्व अनुभवायला मिळते.
28 जानेवारी 1937 रोजी ढाका येथे सुमन हेमाडी म्हणून जन्मलेल्या या स्वरकन्येने पुढे सुमन कल्याणपूर या नावाने भारतीय संगीतविश्वात अढळ स्थान निर्माण केले. चित्रकलेची आवड, घरातील कलासंस्कार आणि शास्त्राrय संगीताची साधना या साऱ्यांनी त्यांच्या गायकीला एक वेगळीच शालीनता दिली. 1950 च्या दशकात सुरू झालेला त्यांचा संगीतप्रवास हिंदी, मराठीसह अनेक भारतीय भाषांमध्ये विस्तारला. मात्र मराठी रसिकांच्या मनात त्यांचे स्थान विशेष राहिले, कारण त्यांच्या आवाजाने मराठी भावगीत आणि भक्तिगीतांना एक मृदू, सात्त्विक आणि दीर्घकाळ टिकणारी ओळख दिली.
“केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर” हे गीत ऐकताना निसर्गातील प्रसन्नता, लय आणि कोमलता जाणवते. “निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई” या गीतात आईच्या मायेचा, बालमनाच्या निरागसतेचा आणि घरगुती भावविश्वाचा सुगंध दरवळतो. “जिथे सागरा धरणी मिळते” या गीतात विरह, शांतता आणि अंतर्मुख करणारी ओढ आहे. “रिमझिम झरती श्रावणधारा” मध्ये श्रावणाची कोमलता आणि मनात दाटणाऱ्या आठवणींचा ओलावा आहे. “केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा”, “सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले” आणि “ओंकार प्रधान रूप गणेशाचे” यांसारख्या भक्तिगीतांत त्यांचा स्वर भक्तीला दिखाऊपणापासून दूर ठेवून थेट श्रद्धेशी जोडतो.
सुमनताईंच्या आवाजाची तुलना अनेकदा लता मंगेशकर यांच्याशी झाली. ही तुलना त्यांच्या स्वरातील नाजूकपणाची दखल असली, तरी त्यांच्या स्वतंत्र ओळखीवर सावली टाकणारीही ठरली. परंतु सुमन कल्याणपूर यांनी या तुलनेला कधी कटुतेने उत्तर दिले नाही. त्यांनी स्वत:ची बाजू मांडण्यासाठी आवाज चढवला नाही, त्यांनी आपली बाजू आपल्या गायकीतून सिद्ध केली. स्पर्धा, वंचना, दुर्लक्ष आणि काळाची कठोर परीक्षा सहन करूनही त्यांच्या आवाजातील शुद्धता, नम्रता आणि संयम अबाधित राहिले. हेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे खरे मोठेपण आहे.
त्यांच्या गायकीची खरी ताकद त्यांच्या मर्यादेत होती. त्या स्वरांवर आक्रमण करत नसत, त्या स्वरांना फुलू देत. त्या भावना जबरदस्तीने व्यक्त करत नसत, त्या भावना श्रोत्यांच्या मनात अलगद उतरवत. म्हणूनच त्यांची गीते काळानुसार जुनी झाली नाहीत. उलट, काळ पुढे गेला तशी त्यांची किंमत अधिक जाणवू लागली. आजच्या वेगवान आणि गोंगाटी काळात सुमनताईंचा आवाज आपल्याला सांगतो की खरी कला ही आवाज मोठा करण्यात नसते, तर स्वर शुद्ध ठेवण्यात असते. कलाकाराचे मोठेपण प्रसिद्धीच्या प्रकाशझोतात नसते, तर लोकांच्या स्मरणात टिकून राहण्यात असते. 31 मे 2026 रोजी सुमन कल्याणपूर यांचे वयाच्या 89व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने केवळ एक ज्येष्ठ गायिका हरपली नाही, तर मराठी भावविश्वातील एक सोज्वळ स्वर शांत झाला. त्यांना पद्मभूषणसारखा मानाचा सन्मान लाभला, पण त्यांच्या आयुष्याचा सर्वात मोठा गौरव म्हणजे लाखो रसिकांच्या मनात आजही त्यांच्या गीतांनी मिळवलेले अढळ स्थान.
सुमनताईंची गाणी ही केवळ ध्वनिमुद्रणांमध्ये जपलेली गीते नाहीत, ती मराठी घरांच्या आठवणी आहेत, आईच्या ओठांवरची हळवी चाल आहे, देवघरातील शांत प्रार्थना आहे आणि जुन्या काळाच्या सांस्कृतिक सभ्यतेची साक्ष आहे. म्हणूनच त्यांचे निधन ही शेवटाची घटना नाही, ती स्मरण अधिक गहिरं करणारी वेळ आहे.
आज एक सुमन देवचरणी अर्पण झाले आहे. पण त्या सुमनाचा सुगंध त्यांच्या गीतांमधून पुढील अनेक पिढ्यांना जाणवत राहील. सुमन कल्याणपूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
-आदित्य र.पावसकर, कांदिवली (प.) मुंबई