कोकणात नशेचा फास आवळला
कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यालगत असलेल्या गोवा राज्यात अमली पदार्थांचा मोठा व्यापार चालतो. या व्यापाराची साखळी हळूहळू कोकणातही निर्माण झाली आहे आणि शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही त्याचे जाळे पसरले आहे. नुकतीच सिंधुदुर्गातून 25 लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ वाहतूक करताना गोवा पोलिसांनी जप्त करण्याची मोठी कारवाई केली आहे. यावरून कोकणात आता अमली पदार्थ साठवणूक आणि विक्री केंद्र बनून युवा पिढीच्या भोवती नशेचा फास आवळला गेल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचे उच्चाटन करणे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.
गोव्यालगतच्या कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात अनेक वर्षांपासून गोव्याहून राजरोसपणे बेकायदेशीर दारू वाहतुक सुरू आहे. ही रोखणे सिंधुदुर्ग व रत्नागिरी पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागासाठी डोकेदुखी बनलेली आहे. पोलिसांची कार्यशक्ती अर्धीअधिक त्यातच खर्ची होते. या बेकायदेशीर दारू वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरुपी बनल्यानंतर अमली पदार्थ वाहतूक व विक्रीचा प्रश्नही आता कोकणसाठी गंभीर बनला आहे. ती रोखण्यासाठी गोवा राज्याप्रमाणे स्वतंत्र यंत्रणा नाही. त्यामुळे आधीच दुबळ्या असणाऱ्या यंत्रणेसमोर आता अमली पदार्थ रोखण्याचे आव्हान उभे राहिले आहे.
अमली पदार्थांच्या अवैध धंद्याने आता सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही जाळे पसरले आहे आणि अगदी 20 ते 35 वर्षांपर्यंतचे युवक व तरुण या अमली पदार्थ अवैध धंद्यात गुंतले आहेत. त्यामुळेच अमली पदार्थांचा फास कोकणात घट्ट आवळत चालला आहे. गोव्यामध्ये गेल्या दहा-पंधरा वर्षांत अमली पदार्थांचे राष्ट्रीय व अंातरराष्ट्रीय स्तरावरचे केंद्रच बनले आहे. या राज्यातही अमली पदार्थ अवैध धंद्याविरोधात कारवाई सुद्धा केली जाते. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नेमलेली आहे. पंरतु, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये पोलीस यंत्रणा सोडली, तर कारवाई करणारी स्वतंत्र यंत्रणा नाही. त्यामुळे आता अमली पदार्थांची साठवणूक सिंधुदुर्ग-रत्नागिरीमध्ये होऊ लागली आहे. गोवा राज्य अमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलिसांनी पत्रादेवी पोलीस तपासणी नाका येथे सिंधुदुर्गातून गोवा येथे 25 लाखाचे अमली पदार्थ घेऊन जात असताना नुकतेच जप्त केले. यावरून अमली पदार्थांची कोकणात साठवणूक होते हे अधिकच स्पष्ट झाले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण कोकण पर्यटन व्यवसाय म्हणून नावारुपास आले आहे. याच कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ-पिंगुळी येथील परवेज अली खान या युवकाला 25 लाख रुपये किंमतीच्या अमली पदार्थांसह गोवा हद्दीत गोव्याच्या नॉर्कोटिक्स विभागाने नुकतेच पकडले. गोवा ते सिंधुदुर्ग असा अमली पदार्थांचा प्रवास अनेकवेळा घडला आहे. अनेकवेळा गुन्हेही उघड झालेले असताना सिंधुदुर्गातून गोव्याकडे हा उलटा प्रवास सुरू झाला आहे. हा निश्चितच कोकणच्या पर्यटन आणि युवा पिढीसाठी धोकादायक आहे. त्याला वेळीच आवर घालण्यासाठी पालकांनी सजग होण्याची गरज आहे.
मुंबई-ठाणे, रायगड, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजी नगर आदी महत्त्वाच्या शहरांमध्ये गेल्या वर्षभरात गांजा, कोकेन, हेरॉईन, चरस या अमली पदार्थांचे कोट्यावधी रुपयांचे साठे पकडण्यात आले. त्यात आता कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा सुद्धा समाविष्ट होत आहे हे धोकादायक आहे. यापूर्वी मोठ्या शहरांमधून हे अमली पदार्थ छोट्या जिल्ह्यात, गावात जात होते. मात्र, आता सिंधुदुर्गसारख्या छोट्या जिल्ह्यातून कुडाळ-पिंगुळीमधून गोवा राज्यात अमली पदार्थ गेल्याचे तपास यंत्रणांच्या रेकॉर्डवर आले आहे. त्यामुळे आता प्रशासकीय यंत्रणा जागी झाली आहे. पोलीस तपासानुसार गोवा राज्याच्या हद्दीत अमली पदार्थांसह पकडण्यात आलेला युवक कुडाळ-पिंगुळी येथे राहत आहे. त्याला अमली पदार्थ पुरविणारा दुसरा युवक हा कुडाळ तालुक्यातीलच असून मुंबईस्थित आहे. म्हणजेच या अमली पदार्थांचे धागेदोरे मुंबई-कुडाळ-गोवा असे असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे.
मुंबई ते गोवा या ड्रग्ज व्यापाराच्या साखळीमध्ये सिंधुदुर्गचा साठवणुकीसाठी वापर होत असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात प्रामुख्याने गांजा पकडल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, यावेळी सिंथेटिक ड्रग्ज मिळाल्याने खळबळ उडालेली आहे. अमली पदार्थ तस्करीतील हा सगळ्यात गंभीर प्रकार मानला जातो. सिंथेटिक ड्रग्ज प्रामुख्याने कृत्रिम पद्धतीने विविध रसायनांचा वापर करून तयार केला जातो. त्याचा थेट परिणाम माणसाच्या मानसिकतेवर होतो. यातून निर्माण होणारी नशा आणि त्याचे जडलेले व्यसन गंभीर मानले जाते. द्रव किंवा गोळ्यांच्या रुपात ही ड्रग्ज असतात. अगदी कमी आकारमान असल्याने ती लपविणे आणि त्याची तस्करी करणे सोपे होते.
गोव्यात स्वतंत्र राज्य असल्याने त्यांचा अमली पदार्थविरोधी विभाग आहे. या शिवाय पोलिसांसह इतर अनेक तपासणी यंत्रणा अशा अमली पदार्थ विरोधी कारवायांचा तपास करत असतात. त्यामुळे तेथे असे पदार्थ साठविणे जोखमीचे असते. या ड्रग्जची किंमत लाखो रुपयांमध्ये असते. त्यामुळे साठा पकडला गेल्यास तस्करी करणाऱ्यांचे मोठे नुकसान होते. या तुलनेत लगतच्या सिंधुदुर्गात पोलीस यंत्रणा सोडली, तर अमली पदार्थांचा तपास करणाऱ्या इतर एजन्सी सक्रीय नाहीत. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून सिंधुदुर्गात अशा अमली पदार्थांचा साठा केला जाऊ लागला आहे. पूर्वी हा साठा किनारपट्टी भागात केला जायचा. गोव्यात मागणी येईल, तितकाच माल काढून तो ग्राहकापर्यंत पोहोचविला जायचा. मात्र, कुडाळ-पिंगुळी येथील युवकाला पकडल्यानंतर अमली पदार्थ साठ्याचे खरे रुप समोर आले आहे.
अमली पदार्थांच्या साठ्याबरोबरच सिंधुदुर्गसह रत्नागिरीतील शहरी भागात हळूहळू गांजाचा पुरवठा करणारे नेटवर्क तयार होऊ लागले आहे. व्यावसायिक शिक्षणाची सोय असलेल्या शहरांच्या ठिकाणी हे नेटवर्क मार्पेट शोधू लागले आहे. अमली पदार्थांमधील काळा पैसा अधिक झटपट मिळत असल्याने अवैध दारू वाहतुकीत असलेल्या गुन्हेगारांचे लक्षही याकडे वळले गेले आहे. दारू वाहतुकीच्या तुलनेत अमली पदार्थ सहज लपवून आणता येत असल्याने त्यातील काहीजण यात उतरले. याशिवाय आधीपासूनच हे नेटवर्क चालविणाऱ्यांनी आपले मार्केट अगदी ग्रामीण भागापर्यंत पोहोचविले आहे. यातूनच काही वर्षांत रत्नागिरी-सिंधुदुर्ग दोन्ही जिल्ह्यांना याचा विळखा घट्ट होत चालला आहे. सध्या अगदी शाळकरी मुलांपर्यंत हे विष पोहोचले आहे. शहरी आणि ग्रामीण भागात नेटवर्क अधिक सक्रीय आहे. याचे ग्राहक आणि विक्री करणाऱ्यांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून सक्रीय ग्रुप तयार झाले आहेत. सोशल मीडियाचाही वापर केला जातो. पूर्वी फक्त गोव्यातून अमली पदार्थ यायचे, आता मुंबई, कोल्हापूर, बेळगाव या भागातूनही रेल्वे व इतर सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करून त्याचा पुरवठा होत आहे.
यावर नियंत्रण ठेवणारी पोलीस ही एकमेव सक्रीय यंत्रणा दोन्ही जिल्ह्यांत आहे. मात्र, नेटवर्क इतक्या वेगाने आणि छुप्या पद्धतीने चालविले जात असल्याने त्यांच्याही मर्यादा ठळक झाल्या आहेत. पोलिसांकडे मुळातच कामाचा व्याप जास्त आहे. अमली पदार्थांवर कारवाई करायची झाल्यास याबाबतचे नियम कडक आहेत. त्या चौकटीत राहून छापे टाकणे सोपे नसते. पूर्वी पोलीस डमी गिऱ्हाईक पाठवून खबऱ्यांच्या मदतीने छापे टाकायचे मात्र हे नेटवर्क चालविणाऱ्यांनी त्यातूनही मार्ग काढत सोशल मीडिया, व्यसनात अडकलेल्या गिऱ्हाईकांचा विक्रीसाठी वापर, कोड भाषा अशा गोष्टी नेटवर्क चालविण्यासाठी वापरायला सुरुवात केल्या. यातून अमली पदार्थ विक्री करणारे जिल्ह्यातील 20 ते 35 वयोगटातील तरुणांना जाळ्यात ओढत आहेत.
पालकांसाठीही हा सगळा प्रकार नवा आहे. मुळात आपले मूल अशा व्यसनात अडकले हे समजायलाच उशीर होतो. समजले, तरी लोक काय म्हणतील, या भीतीपोटी याबाबत मौन पाळले जाते. यातूनच हे विष आणखीनच धोकादायक बनत चालले आहे. कोकणात असे प्रकार वाढणे चिंतेचा विषय बनले आहे. हे व्यसन म्हणजे आजार असून दीर्घ उपचार करावे लागणार आहेत. यात पालकांची भूमिका सगळ्यात महत्त्वाची आहे.
लगतच्या गोव्यात पर्यटन आणि अमली पदार्थांचा व्यापार या दोन्ही गोष्टी एकमेकांना जोडल्या गेल्या आहेत. यामुळे तेथील पर्यटन बदनाम झाले. सिंधुदुर्ग - रत्नागिरी हे जिल्हे अलीकडच्या काळात महाराष्ट्रातील पर्यटनाचे हब बनत आहेत. कुटुंबवत्सल पर्यटक या ठिकाणी येतात. अमली पदार्थांचे हे नेटवर्क गोव्याप्रमाणे येथेही पर्यटनात घुसल्यास त्याचे मोठे दुष्परिणाम भोगावे लागणार आहेत. यात नव तरुण अडकणे अतिशय गंभीर आहे. हे रोखणे पोलिसांसाठी फार कठीण असल्याने अमली पदार्थ रोखण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी लागेल.
एकूणच पर्यटन म्हणून ओळख बनलेल्या कोकणात अमली पदार्थांचा हा धोका कमी होण्यासाठी पोलीस यंत्रणांसह लोकप्रतिनिधी, पालक, सामाजिक संस्था या सर्वांनी अमली पदार्थ उच्चाटनासाठी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. तरच हा गंभीर प्रश्न सुटू शकेल. अन्यथा कोकणातील पर्यटन अमली पदार्थांमुळे बदनाम होईलच पण नव्या पिढीला नशेचा फास अधिक घट्ट आवळला जाईल.
संदीप गावडे