पुढचा हल्ला विनाशकारी असेल
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा इराणला इशारा : अमेरिकेची युद्धनौका इराणच्या आखातात
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव आता चिघळला आहे. अमेरिकेने आपल्या नौदलातील युद्धनौका इराणच्या आखातात आणली असून अमेरिकेचा हल्ला या देशावर होऊ शकतो. इराणने चर्चेसाठी सज्ज व्हावे, असे आवाहन अमेरिकेने केले आहे. मात्र, इराणने चर्चा करण्यास नकार दिला आहे. अमेरिकेने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ, असे प्रतिपादन इराणच्या प्रशासनाने केले आहे.
‘आमचे मोठे नौदल इराणच्या दिशेने जात आहे. या नौदलात अमेरिकेची जगप्रसिद्ध विमानवाहू नौका ‘युएसएस अब्राहन लिंकन’ही आहे. या नौकेसमवेत अनेक युद्धानौका आणि इतर नौका आहेत. हे नौदल अत्यंत वेगाने त्याची उद्दिष्ट्यो पूर्ण करण्यास सज्ज असून इराणला ही शेवटची संधी आहे, असा संदेश डोनाल्ड ट्रंप यांनी त्यांच्या ‘ट्रूथ सोशल’ या वेबसाईटवर पोस्ट केला आहे. त्यांनी इराणला निर्वाणीचा इशारा दिला आहे, असा या संदेशाचा अर्थ काढला जाऊ लागला आहे.
चर्चेसाठी सज्ज व्हा
अमेरिकेने अद्याप इराणवर हल्ला करण्याचा निर्णय घेतलेला नाही. इराणने चर्चेला सज्ज व्हावे. चर्चा करण्यास इराणची सज्जता असल्यास त्याच्यावर हल्ला केला जाणार नाही. इराणच्या अणुकार्यक्रमासंबंधी ही चर्चा असेल. इराणने अणुबाँब बनविण्याचा आपला कार्यक्रम सोडून द्यावा, अशी अमेरिकेची मागणी आहे. इराणचा अणुकार्यक्रम आता अणुबाँब बनविण्याच्या अगदी जवळ पोहचला आहे, अशी आंतरराष्ट्रीय राजकीय वर्तुळात चर्चा आहे. येत्या सहा महिन्यांमध्ये इराण अणुबाँब बनवू शकतो, असेही बोलले जाते. मात्र काही तज्ञांच्या मते अद्याप इराणची इतकी सज्जता नाही. अणुबाँबसाठी आवश्यक संपृक्त युरेनियम बनविण्यासाठी इराण प्रयत्नशील आहे. मात्र, त्याची अद्याप इतकी प्रगती झालेली नाही. ही पातळी गाठण्यासाठी इराणला आणखी काही वर्षे लागतील. मात्र, तो निश्चितपणे त्या दिशेने प्रवास करीत आहे, अशीही चर्चा करण्यात येत आहे.
अमेरिका हल्ल्यासाठी सज्ज
इराणने अमेरिकेचा चर्चेचा प्रस्ताव फेटाळला आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रंप नाराज झाले असून त्यांनी इराणला मोठा इशारा दिला आहे. इराणने त्याचा अणुकार्यक्रम थांबविला नाही, तर त्या देशावर मोठा हल्ला केला जाईल, असे स्पष्ट संकेत ट्रंप यांनी बुधवारी दिले आहेत. दोन्ही देशांमधील तणाव आता मोठ्या प्रमाणात आहे.
सहा हजारांहून अधिक आंदोलक ठार
काही दिवसांपूर्वी इराणमध्ये तेथील धार्मिक प्रशासनाविरोधात मोठे जनआंदोलन झाले होते. इराणच्या प्रशासनाने ते सैनिकी आणि इतर बळाचा उपयोग करुन दडपले हेते. त्यासाठी अन्य इस्लामी देशांमधून दहशतवादी आणण्यात आले होते, असा आरोप आहे. या दमनचक्रात 6 हजार 200 हून अधिक आंदोलकांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती काही जागतिक मानवाधिकार संघटनांनी दिली आहे. मात्र, आंदोलकांच्या मृत्यूचा खरा आकडा यापेक्षा कितीतरी पटींनी मोठा असावा, असे अनुमान आहे. 42 हजार आंदोलकांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती इराणने दिली आहे. हजारो आंदोलक बेपत्ता असून त्यांचा मृत्यू झाला असावा, असे मानले जात आहे. अमेरिकेने या जनआंदोलनाला पाठिंबा दिला होता. ट्रंप यांनी इराणला जो निर्वाणीचा इशारा दिला आहे, त्यामागे या आंदोलनाची पार्श्वभूमीही आहे, अशी चर्चा आहे. इराणची जनता प्रशासनाला कंटाळली आहे, असे तज्ञांचे म्हणणे आहे. इराणमध्ये महागाई मोठ्या प्रमाणात वाढली असून बेरोजगारीनेही कळस गाठला आहे. प्रारंभी हे आंदोलन या दोन बाबींच्या विरोधात होते. मात्र, नंतर ते राजकीय स्वरुपाचे झाले, असा आरोप आहे. या आंदोलनामुळे इराणमध्ये प्रशासन आणि जनता अशी फूट पडली आहे.
अमेरिकेचा इशारा, इराणचा नकार
ड अमेरिकेचा इराणला निर्वाणीचा इशारा, मध्यपूर्वेवर पुन्हा युद्धाचे ढग
ड अमेरिकेशी चर्चा करण्यास इराणचा नकार, अणुकार्यक्रमावर मतभेद
ड अमेरिकेची एक मोठी विमानवाहू नौका पोहचली इराणच्या नजीक