ट्रम्प-पुतीन चर्चा झाल्याचे वृत्त खोटे !
वृत्तसंस्था / मॉस्को
अमेरिकेचे भावी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात दूरध्वनीवरुन चर्चा झाल्याच्या वृत्ताचा रशियाने इन्कार केला आहे. हे वृत्त धडधडीत खोटे असून ती केवळ एक रंजक कल्पना आहे, अशी प्रतिक्रिया रशियाने व्यक्त केली आहे. ट्रम्प यांच्याशी संवाद साधण्याची पुतीन यांची कोणतीही योजना नाही, असेही स्पष्टीकरण रशियाकडून या संदर्भात करण्यात आले.
ट्रम्प आणि पुतीन यांच्यात चर्चा झाल्याचे वृत्त वॉशिंग्टन पोस्ट या अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तसंस्थेने दिले होते. ट्रम्प यांनी पुतीन यांना दूरध्वनी केला आणि त्यांच्याशी चर्चा केली, असे या वृत्तपत्राचे म्हणणे आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या फ्लोरिडा प्रांतातील घरातून हा दूरध्वनी केला होता, असेही या वृत्तपत्राचे प्रतिपादन होते.
प्रचारकाळातील आश्वासन
अमेरिकेत नुकत्याच पार पडलेल्या अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारकाळात ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध त्वरित थांबविण्याचे आश्वासन दिले होते. आपली अध्यक्षपदी निवड झाल्यास हे युद्ध त्वरित थांबविण्यात येईल, असे प्रतिपादन त्यांनी केले होते. तथापि, हे कसे साध्य होणार, या प्रश्नावर मात्र त्यांनी भाष्य केले नव्हते. रशिया आणि युक्रेन यांच्यात करार घडवून आणण्याची ट्रम्प यांची योजना होती. रशियाने आतापर्यंत युक्रेनचा जितका भाग जिंकलेला आहे, तो रशियाकडेच राहू द्यावा आणि युद्ध थांबवावे, अशी ही योजना होती. या योजनेची माहिती ट्रम्प यांनी खासगी चर्चेत आपल्या काही निकटवर्तीयांना दिली होती, असाही गौप्यस्फोट वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राने केला होता. ट्रम्प आणि पुतीन यांच्यातील चर्चेची युव्रेनचे नेते झेलेन्स्की यांनाही माहिती होती. याच तथाकथित योजनेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांची चर्चा झाल्याचे वृत्त देण्यात आले होते.