नवा वक्फ कायदा योग्यच
चिराग पास्वान यांच्याकडून समर्थन
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्र सरकारने केलेला नवा वक्फ कायदा योग्यच असून कालांतराने तो समाजाकडून स्वीकारला जाईल, असा विश्वास लोकजनशक्ती पक्षाचे नेते चिराग पास्वान यांनी व्यक्त केला आहे. एका वृत्तसंस्थेच्या ‘रायजिंग भारत’ परिषदेत ते भाषण करीत होते. राहुल गांधी हे भेदभावाचे राजकारण करतात, असा आरोप त्यांनी केला. नागरीकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात जे आंदोलन झाले, त्याला विरोधी पक्षांची फूस होती, असे स्पष्ट प्रतिपादनही त्यांनी या कार्यक्रमात केले.
नवा वक्फ कायदा कालसुसंगत आहे. त्यातील अनेक तरतुदींचा लाभ मुस्लीम समाजाला होणार आहे. तथापि, विरोधी पक्षाचे नेते नेहमी प्रत्येक बाबीकडे मतांच्या आणि निवडणुकांच्या दृष्टीकोनातून पहातात. केंद्र सरकारने केलेल्या कायद्यांसंबंधी ते लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. नागरिकत्व सुधारणा कायद्यासंबंधीही त्यांची अशीच भूमिका होती. या कायद्यामुळे भारतातील मुस्लीमांचे नागरिकत्व काढून घेतले जाईल, अशी भीती विरोधी पक्षांच्या नेत्यांनी विशिष्ट समाजात निर्माण केली. त्यामुळे या कायद्याला विरोध झाला. तथापि, गेल्या दोन वर्षांमध्ये एकाही भारतीय मुस्लीमाचे नागरिकत्व गेलेले नाही. आता नव्या वक्फ कायद्यासंबंधीही असाच अपप्रचार होत आहे. या कायद्यामुळे मुस्लीमांची मालमत्ता काढून घेतली जाईल, असा अपप्रचार होत आहे. तथापि, यावेळीही विरोधी पक्षनेने सपशेल अपयशी ठरणार असून ते उघडे पडणार आहेत. विरोधी पक्षांचा जनतेशी असलेला संपर्क तुटला आहे, असा गंभीर आरोप त्यांनी बोलताना केला.
धर्म ही खासगी बाब
धर्म ही प्रत्येकाची खासगी बाब आहे. कोणी कोणती वेषभूषा करावी, किंवा कोणत्या धर्माचे पालन करावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यात सरकार किंवा अन्य कोणीही लक्ष घालू नये. तसेच राष्टवादावर कोणीही राजकारण करु नये. राहुल गांधी फुटीचे राजकारण करीत आहेत. समाजात भेद निर्माण करुन आपला राजकीय स्वार्थ साधण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. नव्या वक्फ कायद्याला ते याच भूमिकेतून विरोध करीत आहेत, असे प्रतिपादनही पास्वान यांनी केले.
मित्रपक्षांना मिळतो सन्मान
केंद्रात सत्ताधारी असणाऱ्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्रपक्षांचा सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केला जातो. सर्व विषयांवर आघाहीत चर्चा केली जाते. प्रत्येक महत्वाच्या मुद्द्यावर मित्रपक्षांचे मत विचारात घेतले जाते. कोणताही निर्णय एकतर्फी पद्धतीने घेतला जात नाही. त्यामुळे वक्फ कायद्यासारख्या संवेदनशील विषयावरही सत्ताधारी आघाडीत योग्य समन्वय होता. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये हे विधेयक संमत झाले. ही मोठी कामगिरी होती, असेही पास्वान यांनी प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.
अद्याप जागावाटप चर्चा नाही
बिहारमध्ये या वर्षी नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी एकात्म भावनेने या निवडणुकीत सहभागी होणार आहे. मात्र, अद्याप आघाडीमधील मित्रपक्षांमध्ये जागावाटपासंबंधी कोणतीही चर्चा झालेली नाही. निवडणूक अद्याप बरीच दूर आहे. त्यामुळे योग्य वेळी योग्य पावले उचलली जातील. आत्ताच घाईची आवश्यकता नाही, असेही प्रतिपादन पास्वान यांनी केले.