For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युवा शक्तीचा नवा आत्मविश्वास!

06:22 AM Aug 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
युवा शक्तीचा नवा आत्मविश्वास
Advertisement

ही स्पर्धा भारतासाठी केवळ पदकांची कमाई नाही, तर नव्या भारताच्या क्रीडा सामर्थ्याची घोषणा आहे. प्रीती पवार, जॅस्मिन लंबोरिया, दिलीप गावित, मीराबाई चानू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवून दिले आहे की भारताची खरी ताकद त्यांच्या तरुणाईत दडलेली आहे.

Advertisement

स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे सुरू असलेल्या 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी अखेरच्या टप्प्यात दमदार मुसंडी मारत जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेषत: महिला बॉक्सिंगमध्ये प्रीती पवार आणि जॅस्मिन लंबोरिया यांनी जिंकलेली सुवर्णपदके ही केवळ पदकांची भर नसून भारतीय क्रीडाक्षेत्रात उभ्या राहत असलेल्या नव्या युवा पिढीच्या आत्मविश्वासाची साक्ष आहेत. त्याचबरोबर पॅरा-अॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्राच्या दिलीप महादू गावितने सुवर्ण, तर मोहम्मद बासिलने रौप्यपदक जिंकत भारताला ऐतिहासिक दुहेरी यश मिळवून दिले. तिहेरी उडीत प्रवीण चित्रवेलचे रौप्य आणि सेल्वा प्रभूचे कांस्य, तसेच मीराबाई चानूचे सलग तिसरे राष्ट्रकुल सुवर्ण या कामगिरीमुळे भारतीय संघाने पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध केली आहे. ग्लासगो स्पर्धेच्या सुरुवातीला भारताची पदकगती अपेक्षेइतकी वेगवान नव्हती. नेमबाजी, कुस्ती, बॅडमिंटन आणि हॉकीसारखे भारताचे पारंपरिक पदकविजेते खेळ यंदाच्या स्पर्धेत नसल्याने पदकसंख्या कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र भारतीय खेळाडूंनी हार न मानता अखेरच्या टप्प्यात जोरदार पुनरागमन केले. बॉक्सिंगमध्ये प्रीती पवार आणि

जॅस्मिन लंबोरिया यांनी सुवर्णपदके पटकावत भारतीय महिला बॉक्सिंगची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित केली. विशेष म्हणजे या दोन्ही खेळाडू नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे आगामी ऑलिम्पिक स्पर्धांसाठीही भारताच्या आशा अधिक बळकट झाल्या आहेत. ग्रामीण आणि सर्वसामान्य कुटुंबांतून आलेले खेळाडू आता जागतिक स्तरावर न घाबरता लढताना दिसत आहेत. दिलीप गावितसारखा पॅरा-अॅथलीट असो किंवा प्रीती पवारसारखी युवा

Advertisement

बॉक्सर, त्यांच्या यशामागे कठोर परिश्रम, आधुनिक प्रशिक्षण आणि स्वत:वरचा विश्वास आहे. ‘खेळो इंडिया‘ आणि ‘टार्गेट ऑलिम्पिक पोडियम‘ यांसारख्या योजनांमुळे देशभरात क्रीडा संस्कृतीला चालना मिळाली असून त्याचे परिणाम आता आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये स्पष्टपणे दिसू लागले आहेत. राष्ट्रकुल स्पर्धांमधील भारताचा प्रवासही सातत्याने उंचावत गेला आहे. 2014 च्या ग्लासगो स्पर्धेत भारताने 15 सुवर्णांसह 64 पदके जिंकली होती. 2018 मध्ये गोल्ड कोस्ट येथे 26 सुवर्ण आणि 66 पदकांसह सर्वोत्तम कामगिरी केली. 2022 मध्ये बर्मिंगहॅम येथे 22 सुवर्णांसह 61 पदके भारताच्या खात्यात जमा झाली. यंदा खेळांची संख्या कमी असतानाही भारताने 2 ऑगस्टपर्यंत 13 सुवर्णांसह 39 पदके जिंकत पदकतालिकेत वरची मजल मारली आहे. त्यामुळे पदकांची संख्या कमी असली तरी गुणवत्तेच्या दृष्टीने ही कामगिरी अत्यंत महत्त्वाची ठरते. समारोपापूर्वी ज्युदो, ट्रॅक सायकलिंग आणि पॅरा सायकलिंगमध्ये भारताला आणखी पदकांची आशा आहे. काही भारतीय खेळाडूंनी अंतिम फेरी गाठली असून अखेरच्या दिवशी भारताच्या पदकसंख्येत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्लासगो मोहिमेचा शेवटही सुवर्णमयी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भारताच्या युवा खेळाडूंनी या स्पर्धेत दिलेला संदेश अत्यंत स्पष्ट आहे. योग्य प्रशिक्षण, आधुनिक सुविधा आणि सातत्यपूर्ण पाठबळासह संधी मिळाल्यास भारतीय युवक कोणत्याही जागतिक स्पर्धेत सर्वोच्च यश मिळवू शकतात. महिलांनी, पॅरा-अॅथलीट्सनी आणि नवोदित खेळाडूंनी मिळवलेले यश हे भारतीय क्रीडाक्षेत्रातील बदलत्या वास्तवाचे प्रतीक आहे. आज भारत फक्त क्रिकेटपुरता मर्यादित राहिलेला नाही. बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग,अॅथलेटिक्स, पॅरा क्रीडा आणि अनेक वैयक्तिक स्पर्धांमध्येही तिरंगा अभिमानाने फडकताना दिसत आहे. ग्लासगो 2026 ही स्पर्धा भारतासाठी केवळ पदकांची कमाई नाही, तर नव्या भारताच्या क्रीडा सामर्थ्याची घोषणा आहे. प्रीती पवार, जॅस्मिन लंबोरिया, दिलीप गावित, मीराबाई चानू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवून दिले आहे की भारताची खरी ताकद त्यांच्या तरुणाईत दडलेली आहे. हीच युवा शक्ती आगामी ऑलिम्पिक आणि जागतिक स्पर्धांमध्ये भारताला अधिक उंचीवर नेईल, असा विश्वास आता अधिक दृढ झाला आहे.

Advertisement
Tags :

.