आत्मविश्वासाचा नवा चेहरा
वेस्ट इंडिजविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या कसोटी सामन्यात रवींद्र जडेजानं पुन्हा एकदा आपल्या अष्टपैलू कामगिरीनं सोनं केलं. पहिल्या डावात नाबाद शतक आणि दुसऱ्या डावात चार बळी घेत त्यानं भारताचा विजय निश्चित केला. कसोटी क्रिकेट हा क्रिकेटमधला सर्वात कठीण आणि परिपक्वतेचा फॉरमॅट मानला जातो. या कसोटीत यश मिळवण्यासाठी फक्त कौशल्य नव्हे, तर मानसिक स्थैर्य, शिस्त आणि सहनशक्तीचीही आवश्यकता असते. जडेजा या कसोटीत तावूनसुलाखून निघालेला खेळाडू आहे. 86 कसोट्यांत त्याने 3990 धावा आणि 334 विकेट्स घेतल्या आहेत म्हणजेच एकाच वेळी फलंदाज आणि गोलंदाज या दोन्ही भूमिकांत तो निर्णायक ठरला आहे. हा आकडा केवळ सांख्यिकी माहिती नाही, तो भारतीय संघाला गेल्या दशकभर दिलेल्या स्थैर्याचं प्रतीक आहे. रवींद्र जडेजाचा प्रवास या देशातील लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. सौराष्ट्रातील खेड नावाच्या गावात 6 डिसेंबर 1988 रोजी जन्मलेला हा मुलगा अत्यंत साध्या परिस्थितीत वाढला. वडील सैन्यात जाण्याचं स्वप्न पाहत होते, पण जडेजाचं मन क्रिकेटच्या हिरव्या पटांगणात हरवलेलं होतं. वडिलांनी क्रिकेटला विरोध केला, पण आईनं त्याचा हात धरला. “तो शाळेत जातो” असं सांगून ती मुलाला सरावाला पाठवायची. आणि याच आईच्या विश्वासावर तयार झाला भारताचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू. लहानपणीच त्याच्या कोच महेंद्रसिंग चौहान यांनी त्याच्यात फिटनेस आणि शिस्तीचं बीज पेरलं. 10 ते 14 वर्षांचा असताना रोज 12 ते 15 किलोमीटर धावायचा सराव आणि पावसात चिखलात खेळण्याची तयारी यानं त्याला फक्त खेळात नव्हे तर जीवनातही कणखर बनवलं. आज मैदानावर जडेजा ज्या वेगानं चेंडू पकडतो, ती झेप म्हणजे त्या कठोर प्रशिक्षणाचं फळ आहे. 2008 मध्ये आयपीएल सुरू झालं तेव्हा राजस्थान रॉयल्सच्या संघात शेन वॉर्ननं जडेजाला संधी दिली. तो अनुभव त्याच्या करिअरमधला निर्णायक टप्पा ठरला. वॉर्ननं त्याला “रॉकस्टार” म्हटलं आणि एक भाकीत केलं “तू भारतासाठी खेळशील आणि यशस्वी होशील.” हे वॉर्नचं भाकीत शब्दश: खरं ठरलं. पुढे धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना जडेजा केवळ खेळाडू राहिला नाही, तर संघाचा विश्वास बनला. धोनीनं त्याला ‘सर’ म्हटलं आणि आज ते नाव भारतीय क्रिकेटमधल्या गौरवाचं प्रतीक बनलं आहे. जडेजाची कसोटीतील कामगिरी ही भारताच्या दीर्घकालीन क्रिकेट धोरणाचं फळ आहे. अशा खेळाडूंमुळे संघाला संतुलन मिळतं जो 8व्या क्रमांकावर फलंदाजी करतो आणि 30 ओव्हर्स टाकतो, तोच कसोटीतील बदल घडवतो. इंग्लंडविरुद्ध 2024 च्या राजकोट कसोटीत त्यानं एकाच सामन्यात शतक आणि पाच विकेट्स घेतल्या; ही कामगिरी त्याच्या अष्टपैलूपणाचा शिखरबिंदू होती. अशा क्षणांनी भारतीय क्रिकेटचा आत्मविश्वास उंचावला आहे. वन डे आणि टी-20 फॉरमॅटमध्येही जडेजाचं योगदान कमी नाही. 204 वन डे सामन्यांत 2806 धावा आणि 231 विकेट्स घेत त्यानं भारताच्या अनेक विजयांत मोलाची भूमिका बजावली आहे. 2024 मध्ये भारतानं टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर त्यानं या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली, पण त्याची उपस्थिती भारतीय संघाच्या मानसिकतेत कायम राहिली. मैदानाबाहेर जडेजाचा स्वभाव शांत स्वरुपाचा आहे. घोडेस्वारीचा छंद असलेला हा खेळाडू म्हणतो, “क्रिकेटर नसतो तर जॉकी झालो असतो.” या शिस्तबद्ध जीवनशैलीमुळेच तो आज 36 वर्षांचा असूनही तितक्याच उर्जेने खेळतो. धोनीनंतरच्या काळात भारताला जे काही खेळाडू आत्मविश्वासानं पुढे जात आहेत, त्यात जडेजाचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागतं. तो संघात जिथे असतो, तिथं स्थैर्य निर्माण होतं. त्याचं बॉलिंग धोरण, फलंदाजीतली धडाडी आणि फिल्डिंगमधली विजेची झेप हे सगळं त्याला ‘टीम इंडिया’चा आवश्यक घटक बनवतं. आज भारतीय क्रिकेट एका संक्रमण काळातून जात आहे. तरुण खेळाडूंची नवीन पिढी उदयास येते आहे, तर अनुभवी खेळाडू तर निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. अशा वेळी जडेजा हे दोन्ही काळ जोडणारा दुवा ठरला आहे. तो जुन्या पिढीच्या मेहनतीचा वारसा पुढे नेत असतानाच नव्या खेळाडूंना शिस्त, स्थैर्य आणि समर्पणाचं उदाहरण दाखवतो. ‘सर रवींद्र जडेजा’ या नावात फक्त क्रिकेटपटू नाही, तर भारतीय क्रीडासंस्कृतीचं प्रतिक दडलेलं आहे. एका सामान्य घरातून उभा राहून देशासाठी गौरव मिळवणारा तरुण वेस्ट इंडिजविरुद्धच्या विजयाचं श्रेय त्याच्या शतकाला आणि चार विकेट्सना जरी मिळालं, तरी या कामगिरीच्या मागं वर्षानुवर्षांचा संघर्ष आणि निर्धार आहे.
महेंद्रसिंग धोनी ते रवींद्र जडेजा हे भारतीय क्रिकेटचे उन्नत रूप आहे. महेंद्रसिंग धोनीने भारतीय क्रिकेटला नवे तेज दिले. 2007 मध्ये टी-20 विश्वचषक, 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक आणि 2013 ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून त्याने भारताला जागतिक विजेता बनवले. त्याच्या शांत नेतृत्वाने आणि सामना पूर्ण करण्याच्या कौशल्याने खेळ आक्रमक झाला. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जला पाच वेळा विजेता बनवून त्याने संघटीत खेळाला नवे परिमाण दिले. धोनीच्या निवृत्तीनंतर रवींद्र जडेजाने त्याचा वारसा पुढे नेला. ‘सर जडेजा’ म्हणून ख्यातनाम, जडेजाने सर्वगुणसंपन्न खेळाडू म्हणून स्वत:ला सिद्ध केले. यंदाच्या कसोटी मालिकेत जडेजाने धोनीच्या षट्काराचा विक्रम मोडला आणि सहा कसोटी शतके व पाच बळींसह कपिल देव, अश्विन यांच्यापाठोपाठ तिसरा भारतीय ठरला. जडेजाच्या नेतृत्वात भारताने 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. धोनीची शांत शैली आणि जडेजाची तलवारबाजी यांनी भारतीय क्रिकेटला उन्नत केले. त्यांची कामगिरी भविष्यातही भारताला चमकत ठेवील.