चित्रपट महामंडळाची नूतन इमारत धूळ खात
कोल्हापूर / अहिल्या परकाळे :
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची 1984 साली सुधीर फडके अध्यक्ष असताना घेतलेली इमारत जुनी झाली. त्यामुळे रेल्वे स्टेशन समोरच्या इमारतीत दुसरा मजला कार्यालयासाठी जवळपास पावणेतीन कोटी रूपयांना खरेदी केला आहे. परंतू चार वर्षापासून ही इमारत धूळ खात पडली आहे. याला चित्रपट महामंडळातील अंतर्गत राजकारणच कारणीभूत आहे.
चित्रपट महामंडळाच्या संचालक मंडळाची मुदत 2021 ला संपली आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. 7 हजार 500 मतदारांची कच्ची यादी जाहीर केली. या यादीतील संख्येवर माजी अध्यक्ष मिलिंद अष्टेकर, बाळ जाधव यांनी हरकत नोंदवली. त्यानंतर 3 हजार 500 सदस्यांची पक्की यादी जाहीर केली. यावर विरोधी गटातील काही सदस्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.न्यायालयातील याचिकेला अष्टेकर, जाधव, सतीश बिडकर आणि बाबासाहेब लाड यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यामुळे चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीचे भिजत घोंगडे पडले आहे. महामंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालकांच्या अंतर्गत राजकारणात सदस्यांचे मोठे नुकसान होत आहे.निवडणूक झाली नसल्याने कोणत्याही प्रकारचा खर्च करण्याची परवानगी संचालक मंडळाला नाही. परिणामी रेल्वे स्टेशन समोरील महामंडळाच्या नवीन इमारतीत फर्निचर करता येत नाही. त्यामुळे ही कोट्यावधीची धूळ खात पडली आहे.
चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष व उपाध्यक्षांनी समझोता केल्याचे सहा महिन्यापुर्वी जाहीर केले होते. यासंदर्भात पुणे, मुंबईत बैठकाही झाल्या होत्या. परंतू या दोघांच्याही नजीकच्या लोकांमधील नकारात्मकता अद्याप दूर झालेली नाही. पुणे, मुंबई विरूध्द कोल्हापूर असाच सामना चित्रपट महामंडळात रंगला आहे. या सामन्यात संचालक मंडळामधील लोकांचाच समावेश आहे. या वादाशी सर्वसामान्य संचालकांचे काहीही देणे-घेणे नाही. संचालक मंडळाच्या वर्चस्ववादाचा फटका विनाकारण सदस्यांना सहन करावा लागत आहे. अनेक कार्यालयातील लोकांचे पगारही झालेले नाहीत. सदस्यांच्या वर्गणीतून जमा झालेल्या पैशातूनच कोल्हापूर, सोलापूर, पुणे, मुंबई आदी ठिकाणी कार्यालय घेतली आहेत. कोल्हापूरसह अन्य काही कार्यालयाचे अंतर्गत फर्निचरचे काम झालेले नाही. त्यात चार वर्षापुर्वी संचालक मंडळाची मुदत संपली. त्यामुळे वेळेत निवडणूक होणे अपेक्षित होते. परंतू सर्वसाधारण सभेत खर्चाचा लेखा-जोखा द्यावा लागेल म्हणून निवडणूकच घेतली नाही. धर्मदाय आयुक्त कार्यालयाने निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर केला. परंतू सदस्य संख्येच्या वादावरून दोन्ही विरोधकांकडून न्यायालयात याचिका दाखल केल्या. एखादा मोठा कार्यक्रम असला तर हेच विरोधक म्हणवणारे संचालक, अध्यक्ष, उपाध्यक्ष एकत्र दिसतात. त्यामुळे हेच सदस्यांना फसवत तर नाहीत ना? अशी शंका अनेक चित्रपट महामंडळाच्या सदस्यांकडून व्यक्त केली जात आहे. संचालक मंडळाच्या अंतर्गत वादामुळे तब्बल पावणेतीन कोटीची प्रॉपर्टी धूळ खात पडली आहे. ज्या सदस्यांच्या जिवावर ही प्रॉपर्टी घेतली त्यांना याचा काहीच फायदा होत नाही.त्यामुळे युवा कलाकारांनी चित्रपट महामंडळाचे सदस्य होण्याकडे पाठ फिरवली आहे. असाच वाद सुरू राहिला तर, भविष्यात चित्रपट महामंडळ अस्तित्वात राहील की नाही, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
- कोल्हापूरकर निवडणूक घेण्यास प्रयत्नशील
चित्रपट महामंडळाची निवडणूक घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. परंतू मेघराज राजेभोसले यांच्या जवळच्या लोकांनी उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घ्यावी. मग आम्ही निवडणूक घेण्यास तयार आहोत. यात सदस्यांचे हित आहेच. तसेच चित्रपट महामंडळाची कोट्यावधीची प्रॉपर्टीही डेव्हलप करण्यास वेग येईल.
- मिलिंद अष्टेकर (माजी अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ)
- कोल्हापुरातील चार लोकांमुळे नूतन कार्यालयाचे काम रखडले
कोल्हापुरातील नूतन कार्यालयाचे निम्मे फर्निचरचे काम अपूर्ण आहे. कोल्हापुरातील चार लोकांच्या आडमुठेपणामुळे निवडणूक प्रक्रिया रखडली आहे. सर्वाच्च न्यायालयातील याचिका मागे घेतल्यानंतर आठ दिवसात उच्च न्यायालयातील निकाल लागेल. त्यानंतर लगेच निवडणूक घ्यायला आम्ही तयार आहे. निवडणूक झाल्यावर रखडलेले नूतन कार्यालयाचे काम पूर्ण करता येईल. मी एकाही सभासदांना मतदानापासून वंचित राहू देणार नाही.
- मेघराज राजेभोसले (अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ)
- चित्रपट महामंडळाची प्रॉपर्टी
-15 कोटीची एफडी
-दीड कोटीचे पुणे कार्यालय
-साडेतीन कोटीचे मुंबई कार्यालय
-पावनेतीन कोटीचे कोल्हापूर नूतन कार्यालय
-दीड ते दोन कोटीचे कोल्हापूर जुने कार्यालय