गोल्याळी ग्रामपंचायतच्या नूतन इमारतीचे थाटात उद्घाटन
वार्ताहर/कणकुंबी
गोल्याळी ग्राम पंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते दिमाखात पार पडले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण उद्योग खात्री योजनेअंतर्गत सुमारे 20 लाख रुपये खर्च करून ग्रामपंचायतची नूतन वास्तू उभारलेली आहे. आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते फीत कापून नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्dयाचे पूजन आमदारांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रा.पं. अध्यक्ष नामदेव गुरव होते.
व्यासपीठावर ता.पं.सहाय्यक निर्देशक विजयकुमार कोतीन, ग्रामीण रोहयोच्या सहाय्यक निर्देशिका रूपाली बडकुंद्री, ग्रा. पं. उपाध्यक्षा राणी कांबळे, सदस्य हणमंत कोदाळकर व संतोष कुलम, सदस्या तनुजा गुरव, सारीका पाटील, शिवानी बळजी, गौतमी कांबळे व धोंडीबाई धनगर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. विस्तार अधिकारी आनंद भिंगे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.
प्रमुख वक्ते एस. जी. चिगुळकर यांनी, गोल्याळी ग्रा.पं.ने आठ महिन्यांमध्ये पंचायतीची नूतन इमारत उभा करून नवीन आदर्श निर्माण केल्याचे सांगितले. विश्व समितीचे अध्यक्ष विजय नंदिहळ्ळी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. ग्रा. पं. अध्यक्ष नामदेव गुरव यांनी इमारत उभी करण्यास तत्कालीन पीडीओ परशराम व्हलन्नवर यांनी पंचायतीच्या कामकाजाची सुरुवात केली होती. अशा पध्दतीने मदत केलेल्या सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी उपस्थित पीडीओ, ग्रा. पं. माजी अध्यक्ष व माजी सदस्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच इमारत उभारणीमध्ये सहकार्य केलेल्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कंत्राटदार भरतेश नांदणी, निंगोजी पार्लेकर, प्रभाकर भट उपस्थित होते. सूत्रसंचालन अर्जुन कांबळे यांनी केले.