नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आजपासून
सहावीचा ‘ब्रिज’ अभ्यासक्रमाने होणार प्रारंभ
पणजी : राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (एनईपी) कार्यवाही करण्यासाठी प्रथमच गोव्यात आज सोमवार दि. 7 एप्रिलपासून नवीन शैक्षणिक वर्ष 2025-26 सुरु होत आहे. सहावी इयत्तेसाठी ‘ब्रिज’ अभ्यासक्रमाने नवीन वर्षाचा प्रारंभ होणार आहे. सहावी ते दहावी आणि बारावीचे वर्ग आजपासून चालू होणार आहेत. ‘ब्रिज’मध्ये पाठ्यापुस्तके सोडून इतर कलात्मक विषयाचे प्रशिक्षण मुलांना मिळणार आहे. ‘ब्रिज’ अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण सहावीतील सर्व शिक्षकांना देण्यात आले असून मुलांना कुशलतेच्या आधारित कलात्मक विषय आवडतील अशी अपेक्षा करण्यात आली आहे. त्यामुळे सहावीच्या मुलांकडे पाठ्यापुस्तके नसली तरी अडचण होणार नाही असे सांगण्यात आले. एनईपीमध्ये सहावीपासून माध्यमिक स्तरावरील शिक्षण चालू होणार असून ‘ब्रिज’ अभ्यासक्रम मुले आणि शिक्षक अशा दोघांसाठी महत्त्वाचा आहे. सहावी इयत्तेसाठी इतर पुस्तके बदलली असून मराठी / कोकणी भाषेची पुस्तके तीच आहेत. बदललेली पुस्तके उपलब्ध असून ती जर नसतील तरी विद्यार्थ्यांची अडचण होणार नाही. कारण ‘ब्रिज’ अभ्यासक्रमात प्रात्यक्षिक, कलात्मक यावर अधिक भर देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी नमूद केले. काही विषय प्रात्यक्षिकांनी शिकवले जाणार असून मुलांना त्यातून लवकर शिकायला मिळेल, असे शिक्षण खात्याचे म्हणणे आहे.