राज्यात आजपासून शैक्षणिक नववर्षारंभ
विद्यार्थ्यांच्या गर्दीने गजबजणार शाळा : साहित्य खरेदीसाठी विद्यार्थी ,पालकांची लगबग
पणजी : राज्यात आजपासून शैक्षणिक नववर्ष प्रारंभ होत असून सर्व शाळा, हायस्कूल्स विद्यार्थ्यांच्या आगमनाने गजबजणार आहेत. एरव्ही परंपरेने गोव्यात दरवर्षी जून महिन्यापासून शैक्षणिक नववर्ष प्रारंभ होत असे. मात्र यंदापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि सीबीएसई पाठ्याक्रम स्वीकारल्यामुळे त्या परंपरेला छेद दिला होता. त्यानुसार यंदाचे शालेय वर्ष (2025-26) हे 7 एप्रिलपासूनच प्रारंभ झाले होते व सहावी ते दहावी आणि बारावीपर्यंतचे नियमित वर्ग सुरू करण्यात आले होते. तर पहिली ते पाचवी आणि अकरावीचे वर्ग 4 जूनपासून सुरू होणार होते.
सहावी ते दहावी आणि बारावीपर्यंतचे नियमित वर्ग 7 एप्रिलपासून प्रारंभ करण्यात आल्यानंतर 1 मे ते 3 जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आता आजपासून सर्व वर्ग एकाचवेळी सुरू होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शाळा खऱ्या अर्थाने गजबजणार आहेत. शाळा सुरू होणार असल्याने गेल्या आठवडाभरापासून विविध शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांचीही बाजारात गर्दी दिसत होती. गणवेश, कॅन्व्हस बूट, पुस्तकांची बॅग, वह्या, कंपास, पेन-पेन्सील, पाण्याची बाटली, माध्यान्ह डबा, रेनकोट, यासारख्या साहित्याचा त्यात समावेश होता.
रेडीमेड युनिफॉर्मचा जमाना
पूर्वी गणवेशासाठी कापड खरेदी करून नंतर शिलाईसाठी शिंप्याकडे द्यावे लागत होते. आता तो ट्रेंड बदलला आहे. गेल्या काही वर्षांपासून प्रत्येक शाळेची पद्धत आणि गरजेनुसार त्या त्या रंगाचे आणि आकाराचे तयार गणवेश बाजारात उपलब्ध झाले आहेत. पालकांसाठी ते फार सोयीचे बनले आहे. मात्र हे गणवेश प्रत्येक ठिकाणी केवळ एक-दोन ठिकाणीच मिळत असल्याने अशा दुकानांवरही पालकांची मोठी गर्दी दिसत होती.
बॅगांच्या किंमतीत किंचित वाढ
पणजीत बाजारात काही साहित्याच्या दरांचा अंदाज घेतला असता गतवर्षीच्या तुलनेत केवळ शाळांच्या बॅगांच्या किंमती काही प्रमाणात वाढल्याचे जाणवले. या बॅगांच्या किंमती आकार आणि दर्जानुसार रु. 400 ते 600 पर्यंत होत्या. रेनकोटच्या किंमती रु. 350 पासून 500 पर्यंत तर छत्री रु. 150 ते 550 पर्यंत मिळत आहेत.
पुस्तके, वह्या, छत्र्यांसाठी गर्दी
पुस्तके, वह्या, पेन, आदी स्टेशनरी विक्री दुकानांमध्येही अशीच गर्दी दिसून येत होती. 200 पानी वही 80 रुपये, 172 पानी वही 60 रुपये, तर 300 पानी वहीसाठी 171 रुपये प्रमाणे किंमत होती. कंपासच्या किंमती रु. 200 ते 350 होत्या, वह्यांची कव्हर रु. 250 ते 350 आणि पेन्सीलचे बंडल दर्जानुसार 40 ते 60 रुपये प्रमाणे उपलब्ध आहे.