महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मालगाडी चालकाचा निष्काळजीपणा ठरला जीवघेणा

07:00 AM Jun 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कांचनजंगा एक्स्प्रेस दुर्घटना : प्राथमिक तपासात रेल्वे अपघाताचे कारण उघड

Advertisement

वृत्तसंस्था /कोलकाता

Advertisement

पश्चिम बंगालमधील कांजनजंगा एक्स्प्रेस दुर्घटनेच्या प्राथमिक तपासात मालगाडीचा चालक आणि जलपाईगुडीस्थित सिग्नल ऑपरेशन विभागाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. मालगाडीच्या चालकाने नियम न पाळता धोकादायक पद्धतीने स्वयंचलित सिग्नल ओलांडला, तसेच टेनचा वेगही नियमापेक्षा जास्त ठेवल्यामुळे ही टक्कर झाली, असे तपास समितीतील बहुतांश सदस्यांचे मत आहे. पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिह्यात सोमवारी एका मालगाडीने कांचनजंगा एक्स्प्रेसला मागून धडक दिली. या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच पॅसेंजर टेनचा गार्ड आणि मालगाडीच्या एका इंजिनचालकाचाही मृत्यू झालेल्यांमध्ये समावेश आहे.अपघातानंतर मालगाडीच्या चालकाने सिग्नलकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा अपघात झाल्याचे रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षा जया वर्मा सिन्हा यांनी सांगितले होते. तसेच रेल्वे सुरक्षा आयुक्तांना या अपघाताची सखोल चौकशी करण्याची सूचना करण्यात आली होती.

अपघातानंतर रेल्वे विभागाने लगेचच तपासासाठी सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथकाकडे प्राथमिक तपासाची जबाबदारी सोपविली होती. या चौकशी समितीने आपला अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार, अपघातात मालगाडीच्या चालकाने सिग्नल तोडण्याबरोबरच वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे. पथकातील पाच अधिकाऱ्यांनी मालगाडी इंजिनचालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे म्हटले आहे. तर एका अधिकाऱ्याने न्यू जलपाईगुडी रेल्वे विभागाचा ऑपरेशन विभागही सदोष असल्याचा दावा केला आहे. अपघात घडलेल्या मार्गावरील जंक्शनचा मार्ग सुरक्षित करण्यासाठी वेळीच पुरेशी पावले उचलली गेली नसल्याचेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

सिग्नल ऑपरेटिंग विभागाचा निष्काळजीपणा

तपास अहवालानुसार, कांचनजंगा एक्स्प्रेस सकाळी 8.27 वाजता राणीपात्रा स्थानकातून निघाली होती. सिग्नल फेल झाल्यामुळे तिला टी/ए 912 आणि टी369 फॉर्म जारी करण्यात आले होते. टी/ए 912 फॉर्म जारी करणे म्हणजे टेन सर्व लाल सिग्नल ओलांडू शकते. दुसरीकडे, फॉर्म टी369 जारी करणे म्हणजे टेन ताबडतोब दोन सिग्नल ओलांडू शकते, परंतु त्याचा वेग ताशी 15 किलोमीटर असावा. एकीकडे कांचनजंगा एक्स्प्रेस मार्गस्थ झालेली असतानाच प्राधिकरणाने मालगाडीलाही अवघ्या 15 मिनिटांच्या अंतराने सकाळी 8.42 वाजता सदर फॉर्म जारी केल्याचे तपासात उघड झाले. याचदरम्यान पुढील सिग्नल न मिळाल्याने कांचनजंगा एक्स्प्रेस थांबली असताना मागून आलेल्या मालगाडीने तिला जोरदार धडक दिली. या धडकेत मालगाडीचे पाच डबे आणि 11 बोग्यांचे नुकसान झाले. मात्र, धडकेवेळी मालगाडीचा वेग किती होता याचा तपास अहवालात उल्लेख नाही.

रेल्वे सुरक्षा आयुक्तांचाही समांतर तपास

या अपघाताचा तपास रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडूनही करण्यात येत आहे. त्यांचा तपास प्रामुख्याने मालगाडीचा चालक निर्धारित वेग मर्यादेपेक्षा जास्त वेगाने इंजिन चालवत होता काय? या प्रश्नाभोवतीच केंद्रीत आहे. मानसिक चलबिचलतेमुळे किंवा अन्य कोणत्याही कारणांमुळे त्याने मालगाडी भरधाव वेगात चालवली असावी अशी भीती व्यक्त केली जात आहे. मात्र त्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या अपघातात मालगाडीचा सहचालक गंभीर जखमी झाला असून तो बरा झाल्यानंतरच त्याचे कारण समोर येईल. सहचालक बरा झाल्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्त त्याची जबानी नोंदवून योग्य निष्कर्षाप्रत पोहोचतील, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article