अल्पावधीच्या युद्धांसाठी सज्ज राहण्याची गरज
वायुदल प्रमुख चौधरी यांचे प्रतिपादन : रायसीना डायलॉगमध्ये सहभाग
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पाकिस्तान आणि चीन यासारख्या देशांसोबत सुरू असलेल्या तणावांमुळे निर्माण झालेल्या भू-राजनयिक स्थितींच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याला अल्प तसेच दीर्घकालीन संघर्षांसाठी तयारी करावी लागणार आहे. कमी कालावधीचे युद्ध आणि पूर्व लडाखसारख्या दीर्घकाळ चालणाऱया तणावाला हाताळण्यासाठी वायुदलाला सज्ज राहण्याची गरज असल्याचे वायुदलाचे प्रमुख व्ही. आर. चौधरी यांनी गुरुवारी म्हटले आहे. भारत आणि चीनदरम्यान सुमारे दोन वर्षांपासून पूर्व लडाखमध्ये तणाव आहे. परंतु दोन्ही देशांनी अनेक फेऱयांमधील सैन्य तसेच राजनयिक चर्चेनंतर अनेक भागांमधून स्वतःचे सैनिक हटविले आहेत.
भारतीय वायुदल अलिकडील अनुभव तसेच भू-राजनयिक स्थिती पाहता सदैव मोहिमात्मक आणि शस्त्रसामग्रीच्या दृष्टीकोनातून तयार राहण्याच्या गरजेवर भर देत आहे. कमीत कमी वेळेत उच्च तीव्रतेच्या माहिमांच्या नव्या पद्धतींकरता व्यवस्थेत मोठे बदल करण्याची आवश्यकता भासणार असल्याचे ते म्हणाले. वायुदल प्रमुखांनी दिल्लीत आयोजित 7 व्या रायसीना डायलॉगमध्ये गुरुवारी भाग घेतला.
रशिया-युक्रेन युद्धाचे साइड इफेक्ट
वायुदलप्रमुखांनी भू-राजनयिक स्थितीवर विस्तृत स्वरुपात माहिती दिली नसली तरीही त्यांच्या वक्तव्याला रशिया-युक्रेन युद्ध आणि याच्या संभाव्य प्रभावांच्या संदर्भाच्या स्वरुपात पाहिले जात आहे. अशा स्थितीमध्ये शस्त्रसामग्रीची मदत करणे आव्हानात्मक काम असेल. अशाप्रकारच्या मोहिमांसाठी ‘साधनसामग्री जमविणे’ आणि त्यांच्या वाहतुकीला शक्य करण्याची आवश्यकता असल्याचे वायुदल प्रमुख चौधरी यांनी म्हटले आहे.
देशाची ‘आत्मनिर्भर भारत’ ही घोषणा अंमलात आणण्यासाठी महत्त्वपूर्ण घटकांच्या स्वदेशीकरतासाठी एक केंद्रीत कार्ययोजना विकसित करण्याची गरज आहे. सेवा क्षमतेला ‘इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टीम’ जोडण्यासाठी पुढील काळात काम करावे लागणार असल्याचे विधान त्यांनी केले.
रशियावरील निर्भरतेचा उल्लेख
सैन्य उपकरणांच्या सुटय़ा भागांच्या उपलब्धतेच्या समस्येला तोंड देण्यासाठी आम्हाला गरजांचा शोध घेण्याच्या पद्धती आणि साठवणुकीच्या धारणेचे पुनर्मूंल्याकन करण्याची गरज आहे. भारत सुटय़ा भागांसह सैन्य सामग्रीच्या पुरवठय़ासाठी रशियावर मोठय़ा प्रमाणात निर्भर आहे. युक्रेन युद्धामुळे रशियाकडून महत्त्वपूर्ण सुटे भाग आणि अन्य उपकरणांच्या पुरवठय़ात मोठा विलंब लागण्याची शक्यता आहे.
लॉजिस्टिकचे महत्त्व
प्रसिद्ध सैन्य रणनीतिकार सन त्जु यांचा दाखला यावेळी वायुदल प्रमुखांनी दिला आहे. ‘अव्यवस्था आणि व्यवस्थेदरम्यान अंतर हे लॉजिस्टिकचे आहे’ असे त्जु यांचे प्रसिद्ध वाक्य आहे. स्लॉजिस्टिकचा अर्थ सैन्य नागरिक दृष्टीकोनात वेगवेगळा असतो. लॉजिस्टिक म्हणजे साधनसामग्री किंवा सेवा गरज भासल्यास योग्य प्रमाणात योग्य ठिकाणी आणि योग्य वेळेत पोहोचविणे आहे. लॉजिस्टिकचे महत्त्व जाणणारा कमांडर सैन्यसामग्रीला जोखिमीशिवाय सीमेपर्यंत पोहोचवू शकतो असे वायुदल प्रमुखांनी नमूद केले आहे.