पुरोगामी विचार-वारसा जपणाऱ्या नेत्याची गरज
डॉ. यतिंद्र यांचे प्रतिपादन : सतीश जारकीहोळी वारसा चालविण्यास समर्थ
वार्ताहर/कुडची
मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे आपल्या राजकीय जीवनाच्या शेवटच्या वळणावर आहेत. त्यामुळे पुरोगामी विचार व वारसा जपणाऱ्या नेत्यांची गरज आहे. सतीश जारकीहोळी हे ही जबाबदारी पेलू शकतात, असे विधान परिषद सदस्य व सिद्धरामय्या यांचे चिरंजीव डॉ. यतिंद्र यांनी सांगितले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर कर्नाटकाचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. पुढचे मुख्यमंत्री सतीश जारकीहोळीच होणार का? अशी चर्चाही सुरू झाली आहे. रायबाग तालुक्यातील कप्पलगुद्दी येथे श्री संत कनकदास पुतळा अनावरण कार्यक्रमात बोलताना डॉ. यतिंद्र यांनी राजकीय बॉम्ब टाकला आहे. आपल्या वडिलांचा सामाजिक न्याय या सिद्धांतावर विश्वास आहे. सतीश जारकीहोळी यांची वाटचालही याच सिद्धांतावर सुरू आहे.
2028 च्या निवडणुकीत आपले वडील स्पर्धा करणार नाहीत. धर्मनिरपेक्ष तत्त्वावर चालणारे अनेक नेते आहेत. सतीश जारकीहोळी यांनी हा वारसा पुढे चालवावा. तत्त्वावर आधारित राजकारण करणाऱ्या नेत्यांमध्ये सतीश जारकीहोळी आघाडीवर आहेत, असेही त्यांनी सांगितले आहे. डॉ. यतिंद्र यांनी कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल होताच त्यांनी खुलासाही केला आहे. राजकीय जीवनाच्या शेवटच्या वळणावर याचा अर्थ ते उद्याच निवृत्त होणार, असा नाही. 2028 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपण असे वक्तव्य केले आहे. सतीश जारकीहोळी हे सिद्धरामय्या यांचे राजकीय उत्तराधिकारी आहेत, असे तुमचे म्हणणे आहे का? या प्रश्नावर आपण अशा अर्थाने बोललो नाही. केवळ त्यांनी पुढाकार घ्यावा, या उद्देशाने आपण बोलल्याचे डॉ. यतिंद्र यांनी स्पष्ट केले आहे.
कर्नाटकात नेतृत्वबदलाचा प्रश्नच येत नाही...
बहुचर्चित नोव्हेंबर क्रांतीबद्दलही डॉ. यतिंद्र यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा केवळ ऊहापोह आहे. कर्नाटकात नेतृत्वबदलाचा प्रश्नच येत नाही. पक्षांतर्गत चर्चाही झाली नाही. मुख्यमंत्रिपदासाठी अनेक पात्र नेते आहेत. पक्षाचे हायकमांड यासंबंधी निर्णय घेईल. सिद्धरामय्या वगळता त्यांची जागा भरण्याची ताकद सतीश जारकीहोळी यांना आहे. तेही आपल्या वडिलांच्या निवृत्तीनंतर, असेही डॉ. यतिंद्र यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने कर्नाटकातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.