नौदल पश्चिम बंगालमध्ये तळ स्थापणार
चीन आणि बांगला देश यांच्यावर लक्ष ठेवले जाणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली, कोलकाता
भारताच्या पूर्व सागरी सीमेवर निर्माण होणारा वाढता धोका लक्षात घेऊन नौदलाने पश्चिम बंगालमधील हल्दिया येथे नौदलाचा मोठा तळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पावर लवकरच कामाला प्रारंभ केला जाणार आहे. चीन आणि बांगला देश या दोन्ही देशांकडून भारताला धोका असल्याने या धोक्याला रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती दिली गेली.
बंगालच्या उपसागरात आपले नाविक बळ वाढविण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून हा नाविक तळ स्थापन केला जाणार आहे. बंगालच्या उपसागरात चीनच्या हालचाली वाढल्या आहेत. चीनच्या काही युद्धनौका आणि पाणबुड्याही या क्षेत्रात काहीवेळा संचार करताना दिसून येतात. भारताचा भूभाग ताब्यात घेण्याची बांगला देशचीही महत्वाकांक्षा आहे. त्यामुळ हे दोन देश एकत्र येऊन भारतासमोर आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात भारताचे प्राबल्य टिकून रहावे, हा हेतू या तळाच्या स्थापनेपाठी आहे, असे प्रतिपादन भारताच्या नौदलाकडून करण्यात आले.
आधुनिक शस्त्रव्यवस्था आणणार
या तळावर अत्यधुनिक नाविक आणि शस्त्र व्यवस्था नियुक्त करण्याची योजना आहे. वेगाने कार्यवाही करणाऱ्या युद्धनौका, क्षेपणास्त्रे, पाणबुडीविरोधी विमाने आणि हेलिकॉप्टर्स, तसेच अत्याधुनिक इंटरसेप्टर शस्त्रास्त्रेही या तळावर आणण्यात येणार आहेत. भारताच्या पूर्व सागरी सीमेचे संरक्षण आणि भारताच्या सागरी कार्यकक्षेचे संरक्षण ही दोन्ही उद्दिष्ट्यो साध्य करण्यासाठी हा तळ अतिशय उपयोगी असेल.
हिंदी महासागरावरही लक्ष
या तळामुळे भारताला हिंदी महासागरात चाललेल्या चीनच्या हालचालींवरही लक्ष ठेवता येणार आहे. बांगला देशात आता राजकारणाची दिशा पालटली असून भारत विरोधी शक्तींच्या हातात हा देश जाताना दिसत आहे. तसेच या देशाची धोरणे आता पाकिस्तानच्या बाजूने होताना दिसून येत आहेत. त्यामुळे या देशाच्या साहाय्याने पाकिस्तानही बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर येथपर्यंत पोहचू शकतो. ही भविष्यकालीन शक्यता असली, तरी आतापासूनच या शक्यतेला नियंत्रित करण्यासाठी हा तळ महत्वाचा ठरणार आहे. सध्या हल्दिया येथे नौदलाचा छोटा तळ आहे. त्याचा आता विस्तार केला जाणार असून हा तळ भारताचा पूर्वभागातील सामरिक आधारस्तंभ म्हणून विकसीत करण्याची योजना आहे.
100 अधिकाऱ्यांची नियुक्ती होणार
नव्या तळावर 100 हून अधिक नौदल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. हा तळ परिपूर्ण नियंत्रण कक्ष किंवा कमांड म्हणून विकसीत केला जाणार नसला, तरी या तळामुळे भारताला बंगालच्या उपसागराशी थेट सामरिक संपर्क प्रस्थापित करता येणार आहे. सध्या भारताच्या पूर्वेला भारताचे दोन मोठे नौदल तळ आहेत. त्यातील एक आंध्र प्रदेशातील विशाखापट्टण येथे, तर दुसरा अंदमान आणि निकोबार येथे आहे. आता हल्दियाची त्यांच्यात भर पडणार आहे. येथे काही वर्षांपूर्वीच भूमीचे आरेखन करण्यात आले होते. तथापि, तळाचे निर्मितीकार्य मागे पडले होते. आता या निर्मितीकार्यावर भर देण्यात येणार असून येत्या चार ते पाच वर्षांमध्ये हा तळ बांधून पूर्ण केला जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.