For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वेध नारायणीच्या नवरात्रोत्सवाचे

12:39 PM Sep 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
वेध नारायणीच्या नवरात्रोत्सवाचे
Advertisement

मंदिरांमध्ये मखरे सजविण्यास जोर, दांडियांचीही तयारी : बाजारपेठेतही विविध साहित्याची रेलचेल

Advertisement

प्रज्ञा मणेरीकर/पणजी

सर्वांचा आवडता गणेशोत्सव नुकताच उत्साहाने, धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. पितृपंधरवडाही संपत आला आहे. त्यामुळे आता चाहूल लागली आहे ती नवरात्रीची. शारदीय नवरात्र 22 रोजीपासून सुरू होत आहे. सर्वांकडे तयारी सुरू झाली आहे. देशभरात दुर्गा देवीच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू आहे. घराच्या स्वच्छतेपासून ते देवीच्या पूजनाची पूर्वतयारी तर मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. प्रमुख सणांपैकी एक नवरात्रीला खूप महत्त्व आहे. आदिमाया आदिशक्ती देवीचा नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे देवीच्या मंदिरांमध्ये साफसफाई आणि रंगरंगोटीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. बाजारपेठेतही विविध साहित्याची रेलचेल दिसून येत आहे. सार्वजनिक नवरात्र मंडळाचे पदाधिकारीही देवीच्या स्वागताच्या तयारीला लागले आहेत.

Advertisement

नवरात्रोत्सव काहीच दिवसांवर येऊन ठेपला असल्यामुळे बाजारपेठेत नवरात्रीनिमित्त करण्यात येणाऱ्या खरेदीसाठी लगबग दिसून येत आहे. दरम्यान नवरात्रीचे मुख्य आकर्षण असलेला तरुण वर्ग दांडियासाठी विविध वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत. एकंदर सर्वत्र नवरात्रीचे वेध सुरू झाले आहेत, काही ठिकाणी दांडियासाठी मंडप सजू लागले आहेत. नवरात्र म्हणजे शक्तिदेवतेला आवाहनाचा काळ. या काळाच्या आगमनाची चाहूल निसर्ग तर देतोच, परंतु गोव्यातील मंदिरांच्या प्राकारात एक लगबग सुरू होते. प्राकाराची साफसफाई, रोषणाई, सजावट, मखराला नवा साज, वाद्यसंगीताची सुरावट, भक्तिसंगीताचे सादरीकरण, अहोरात्र चाललेले धार्मिक विधी, नवसपूर्ती, कीर्तनच्या बारी, भाविकांची भाऊगर्दी यामुळे गोव्याचे ग्रामीण वातावरण पार बदलून जाते. काही काळापर्यंत गोव्यात नवरात्रोत्सव म्हणजे फक्त दांडिया, गरबा एवढ्यापुरते माहिती होते. मंदिरात होणारा मखरोत्सव, कीर्तन ही क्वचितच कुणाला माहिती असतील. परंतु सध्या नवरात्रोत्सवातील मखरोत्सव हा सर्वांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

गोव्यात नवरात्रोत्सव म्हटले की कीर्तन ही आलीच. नवरात्र आणि कीर्तने  असे समीकरण कित्येक वर्षांपासून तयार झालेले आहे. गोव्यात नवरात्रोत्सव जवळ येऊ लागला की कीर्तन कार्यक्रमांच्या आयोजनाबाबत मंडळे, देवस्थानात नियोजन करायला सुरूवात होते. यात गोमंतकीय कीर्तनकारांबरोबरच गोव्याबाहेरील कीर्तनकारांना आमंत्रित केले जाते. सध्या गोव्यातील विविध मंदिरांतील नवरात्रोत्सवाचे कार्यक्रम जाहीर करण्यात आले आहेत. नवरात्रोत्सवात काही प्रमुख मंदिरात मखरोत्सवाचा सोहळा दिसून होतो. गोव्यातील काही मंदिरात मखरोत्सव हा अनोखा उत्सव असतो. मखरोत्सव हा शिव आणि शक्तीचा सोहळा मानला जातो. आंवळी भोजन, नौकारोहण, मखरोत्सव, ही गोव्यातील मंदिरांची वैशिष्ट्यो आहेत. गोव्यातील नवदुर्गा बोरी आणि मडकई, शिरोडा कामाक्षी, म्हार्दोळची महालसा, बांदोडेची महालक्ष्मी, रामनाथीचा रामनाथ, म गेशीचा मंगेश आणि नागेशीचा नागेश याठिकाणचे मखरोत्सव हे डोळ्यांचे पारणे फेडणारे असतात. घंटानाद, चौघडा, ढोल ताशे या वाद्यांच्या गजरात मखरात बसलेल्या देवदैवतांचे विशिष्ट पद्धतीने झोके घेतानाचे दृश्य विहंगम, नयनरम्य असते. हे दृश्य पाहण्यासाठी लहानांपासून ते थोरापर्यंत अनेकजण मंदिरात गर्दी करतात.

Advertisement
Tags :

.