पूर्वकर्मानुसार सध्याच्या जन्मातील स्वभाव प्राप्त होत असतो
अध्याय नववा
बाप्पा राजाला त्याचा उद्धार होण्याच्या दृष्टीने सत्वगुणी हो असा उपदेश ज्या श्लोकातून करत आहेत तो श्लोक आपण अभ्यासत आहोत. श्लोक असा आहे, एषु त्रिषु प्रवृद्धेषु मुक्तिसंसृतिदुर्गतीऽ। प्रयान्ति मानवा राजंस्तस्मात्सत्त्वयुतो भव ।। 34 ।। त्यानुसार सत्व, रज, तम ह्या गुणांपैकी कोणता गुण वाढला की, माणसाला कशाची प्राप्ती होते हे समजते. सत्वगुण वाढला असता माणसाला मुक्ती मिळते, रजोगुण वाढला असता तो मृत्यूनंतर संसारात परततो तर तमोगुणी माणसाला दुर्गति प्राप्त होते. हे लक्षात घेऊन बाप्पा म्हणतात की, माणसाने सत्वयुक्त व्हावं कारण असा मनुष्य संयमी, लोककल्याणकारी कार्ये करणारा असल्याने त्याला मरणोत्तर चांगली गती मिळते.
रजोगुणी माणसालाही कर्मे करणे आवडत असते पण त्याचा स्वभाव लोभी असतो. एखादी वस्तू हवी वाटली की, ती सर्व प्रयत्न करून मिळवायचीच असा मोह त्याला होतो. ती मिळवल्यानंतर आणखीन हवी असा लोभ त्याला सुटतो. थोडक्यात कोणत्याही परिस्थितीत तो समाधानी असत नाही. एक झाले की, दुसरे अशी त्याची अपेक्षा वाढत जाते आणि त्यासाठी तो सतत कर्मे करत राहतो. त्यामुळे त्याचा पाप पुण्याचा संचय होत राहिल्याने तो त्याच्या पुनर्जन्माची तरतूद करून ठेवतो.
तमोगुणी माणसाची प्रवृत्ती पापाचरण करण्याकडे व तो करतोय तेच बरोबर आहे असे समजण्याकडे अधिक असते. त्याची बुद्धी विपरीत काम करण्याचा सल्ला देत असल्याने, दुराचरण करण्याकडे त्याचा कल असतो. दिवसेंदिवस त्यात वाढ होत जाऊन मृत्यूनंतर तो नीच योनीत जन्म घेतो.
माणसाला पूर्वकर्मानुसार सध्याच्या जन्मातील स्वभाव प्राप्त होत असतो. त्यामुळे ह्या जन्मी कोणता स्वभाव मिळावा ह्यावर त्याचे नियंत्रण नसते. मात्र प्रयत्नाने तो स्वभावात बदल घडवून आणू शकतो. सध्याच्या जन्मातील स्वभाव जर राजसी किंवा तामसी असेल तर उद्धार होण्यासाठी त्यात बदल होऊन तो सात्विक होणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वभावातील सत्वगुण प्रयत्नपूर्वक वाढवणे आवश्यक आहे.
आता सत्वगुण वाढवण्यासाठी काय करावं ते पाहू. सत्वगुणाची वाढ होण्यासाठी साधकाने शास्त्र वाचन करावे, खाणेपिणे सात्विक ठेवावे, सात्विक माणसाच्या संगतीत राहावं. तो करतोय त्यानुसार साधना करावी. तीर्थयात्रा कराव्यात. सकाळ आणि सायंकाळची वेळ सात्विक मानली जाते. त्या वेळेचा सदुपयोग करावा. हा काळ भजन, ध्यान अशा ईश्वर चिंतनात घालवावा. शास्त्राला धरून शुभ कर्मे अत्यंत श्रद्धेने करावीत. कुटूंबाविषयी, समाजाविषयी असलेली कर्तव्ये निरपेक्षतेनं पार पाडावीत. आयुष्यात जे जे घडत आहे ते ईश्वरी इच्छेनुसार घडत असून ते आपल्या हिताचे आहे ह्या सद्गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवून विपरीत परिस्थितीतही देवभक्ती करत रहावी. अशा पद्धतीने जीवनात वागत गेल्यास जुने संस्कार नष्ट होऊन पूर्वकर्मानुसार मिळालेला राजसी किंवा तामसी स्वभाव बदलत जाऊन सात्विक प्रवृत्तीत वाढ होते. वाल्या कोळी माणसांची हत्या बिनदिक्कत करत होता. एकदा त्याची आणि नारदमुनींची गाठ पडल्यावर त्यांनी त्याला उपदेश केला आणि त्या उपदेशानुसार रामाच्या नावाचे स्मरण करत राहिल्याने त्याचे वाल्मिकी ऋषित रुपांतर झाले. त्यांची योग्यता एव्हढी विकसित झाली होती की, त्यांनी रामायण आधी लिहिले आणि त्याबरहुकूम श्रीरामांनी अवतारकाळात वागून दाखवले. एखाद्या तमोगुणी माणसाचे सत्वगुणी व्यक्तीत रुपांतर होऊ शकते ह्याचे ह्यापेक्षा उत्तम उदाहरण दुसरे नसेल. सात्विक मनुष्य सर्व कर्मे निरपेक्षतेने करत असल्याने, त्याचे नवीन प्रारब्ध तयार होत नाही आणि मरणोत्तर त्याला उत्तम गती मिळते.
क्रमश: