देशवासियांच्या अर्थसंकल्पाकडे नजरा
अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज मांडणार सलग नववे बजेट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन रविवार, 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. जागतिक स्तरावर वाढती अनिश्चितता आणि नाजूक व्यापार परिस्थिती दरम्यान अर्थमंत्री सलग नववे बजेट सादर करणार आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प 2026 चे सादरीकरण आज सकाळी 11 वाजता संसद भवनात वेळेवर सुरू होईल. यावर्षीचे सादरीकरण रविवारी होत असले तरी, ही वेळ परंपरेनुसार ‘1 फेब्रुवारी’ या पूर्वनियोजित दिवशी होत आहे.
राष्ट्रीय अर्थसंकल्प सादरीकरणापूर्वी देशाचे लक्ष त्यातील महत्त्वाच्या घोषणांकडे लागलेले आहे. अर्थमंत्री आता आर्थिक सर्वेक्षणात रंगवलेले चित्र किती मजबूत करतात किंवा पुन्हा आकार देतात हे अर्थसंकल्पातून स्पष्ट होईल. आर्थिक सर्वेक्षणात जीडीपी वाढ, महागाई, रोजगार आणि राजकोषीय तूट या आघाड्यांवरील सरकारच्या कामगिरी आणि आव्हानांचा आढावा देण्यात आला असला तरी, पायाभूत सुविधा, उत्पादन, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि कल्याणकारी योजनांवर खर्च वाढविण्याचे संकेत देखील देण्यात आले आहेत. या सर्वेक्षणाच्या आधारे अर्थसंकल्पात सामान्य माणूस, शेतकरी, मध्यमवर्ग, उद्योग आणि राज्यांसाठी कोणत्या नवीन गोष्टी मांडल्या जातील याच्यासह काय महाग होईल आणि कोणता दिलासा मिळेल याची उत्सुकताही सर्वसामान्यांना आहे.
निवडणूक होणाऱ्या राज्यांसाठी वरदान
या वर्षी पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी आणि आसाममध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता, या राज्यांमधील क्षेत्रीय वाटप आणि विकास-केंद्रित घोषणांवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल अशी अपेक्षा आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात विशेषत: निवडणुका नजरेसमोर ठेऊन विशेष घोषणा करण्याची प्रथा असल्यामुळे यावेळीही या राज्यांच्यादृष्टीने सकारात्मक विचार केला जाऊ शकतो.
प्रत्येक वर्गाला अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा
मध्यमवर्ग : या वर्गाच्या सर्वात मोठ्या अपेक्षा म्हणजे उत्पन्न कर सवलती आणि कर स्लॅबमध्ये बदल असतो. त्यांना गृहकर्जाच्या व्याजकपात मर्यादेत वाढ करून घर खरेदी अधिक परवडणारी बनवण्याची देखील आशा आहे.
महिला : उज्ज्वला योजनेसारख्या योजनांचा विस्तार आणि महिला उद्योजकांसाठी परवडणाऱ्या कर्जांची तरतूद करण्याची महिलांना आशा आहे. तसेच नोकरदार महिलांसाठी विशेष कर सवलतींची देखील मागणी अपेक्षित आहे.
युवक : युवा वर्ग प्रामुख्याने नवीन रोजगाराच्या संधी आणि स्टार्टअप्ससाठी सरकारी मदत यावर लक्ष केंद्रित करतात. त्यांना शैक्षणिक कर्जावरील व्याजदरात कपात आणि कौशल्य विकासासाठी मोठ्या सवलतींची अपेक्षा आहे.
शेतकरी : शेतकऱ्यांना पंतप्रधान-किसान योजनेत वाढ आणि खते आणि बियाण्यांवरील अनुदान सुरू ठेवण्याची अपेक्षा आहे. पिकांसाठी ‘एमएसपी’ हमी देण्यासाठी आणि सिंचन सुविधांचा विस्तार करण्यासाठी त्यांना ठोस पावले उचलावीत असे वाटते.
करदाते : अधिकाधिक करदात्यांना जुनी व्यवस्था सोडून नवीन करप्रणाली स्वीकारण्यास प्रोत्साहित करण्यासाठी सरकार नवीन करप्रणालीमध्ये काही महत्त्वाच्या कपातींचा समावेश करू शकते. विशेषत: गृहकर्ज व्याज आणि आरोग्य विमा प्रीमियमवर कर सवलतीची मागणी वाढत आहे.
शेअर बाजार सुरू राहणार
रविवारी नेहमी शेअर बाजारातील व्यवहार बंद असतात. मात्र, 1 फेब्रुवारी 2026 रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार असल्यामुळे बीएसई आणि एनएसई या दोन्हींचे व्यवहार खुले राहतील. बाजार त्यांच्या सामान्य वेळेत उघडतील असे एक्स्चेंजेसनी स्पष्ट केले आहे. सकाळी 9:15 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत व्यवहार होतील. अर्थसंकल्प सकाळी 11 वाजता सादर केला जाणार असल्यामुळे बाजारातील अस्थिरता वाढू शकते.