For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तालुक्यात घुमला राम नामाचा जयघोष

10:34 AM Jan 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
तालुक्यात घुमला राम नामाचा जयघोष
Advertisement

अवघा तालुका बनला राममय : अनेक मंदिरांमध्ये श्री राम प्रतिमेचे पूजन, पालखी मिरवणूक, महाआरती, ठिकठिकाणी महाप्रसादाचे वाटप

Advertisement

वार्ताहर /किणये

अयोध्या येथे रामलल्लांच्या मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त बेळगाव तालुक्यात तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गावागावातील अनेक मंदिरांमध्ये श्री राम प्रतिमेचे पूजन, पालखी मिरवणूक, महाआरती, महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सर्वत्र श्री रामाचा जयघोष सुरू होता. यामुळे अवघा तालुका राममय बनला होता. काही गावांमध्ये रविवारी सायंकाळी टाळ, मृदंगाच्या गजरात श्री रामाची पालखी मिरवणूक काढण्यात आली. सोमवार दि. 22 रोजी तालुक्याच्या सर्रास गावांमध्ये रामलल्लांच्या मूर्ती स्थापनेचा सोहळा साजरा करण्यात आला. गावातील गल्ल्यांमध्ये आकर्षक रांगोळ्या घालण्यात आल्या होत्या. भगवे ध्वज व भगव्या पताका लावण्यात आल्या होत्या. संपूर्ण देशात प्रभू श्रीरामलल्लांच्या मूर्ती स्थापनेचा सोहळा जल्लोषात साजरा करण्यात आला. यामध्ये ग्रामीण भागातही अभूतपूर्व उत्साह दिसून आला. गावांच्या वेशीमध्ये प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे फलक लावण्यात आले होते. स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. अनेक गावातील मंदिरांसमोर केळीचे मोने बांधून फुलांची सजावट करण्यात आली होती. संतिबस्तवाड गावात मोठ्या जल्लोषात हा सोहळा झाला. संपूर्ण गावभर पालखी मिरवणूक काढण्यात आली. बालकलाकारांनी श्रीराम, लक्ष्मण, सीता यांच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या. हे कलाकार साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते. या मिरवणुकीत महिलांचा लक्षणीय सहभाग दिसून आला. वारकरी मंडळी तसेच हरे राम हरे कृष्ण भक्त व गावकरी मिरवणुकीत सहभागी झाले होते. गावात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

Advertisement

सावगावमध्ये श्रीरामलल्लांच्या प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त राम युवक मंडळ, रामदेव चौक सावगाव येथे अनेक कार्यक्रम झाले. गणपत पाटील, निंगाप्पा मोरे, आदींच्या हस्ते प्रभू राम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नारायण सावगावकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. नारायण कडलीकर यांच्या हस्ते विविध पूजा करण्यात आली. त्यानंतर महाआरती केली. यावेळी गावातील सर्व युवक मंडळे, श्रीराम सेना, बजरंग दल, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व श्री राम युवक मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गणेशपूर येथील ज्योती नगरात श्रीरामनामाचा जयघोष झाला. भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. बहाद्दरवाडी येथील ब्रह्मलिंग मंदिरात पहाटे काकडआरती झाली. दुपारी ब्रह्मलिंग भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम व सायंकाळी हरिपाठ व प्रवचन झाले. मंदिरात सायंकाळी दीपोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. महाआरतीनंतर तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले. किणये गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर सोमवारी पहाटे काकड आरती झाली. त्यानंतर श्रीराम प्रतिमेचे पूजन करण्यात आले. गावात कलश मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत वारकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सोमनाथ नगर, हिंडलगा येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने सोमवारी अयोध्या येथे झालेल्या श्री रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोमनाथ नगरमध्ये प्रभू श्री रामांची आकर्षक, भव्य प्रतिमा उभारण्यात आली होती. पुष्पहार अर्पण करून राम मूर्तीचे पूजन गौरीश चौगुले, जोतिबा गुरव, रामचंद्र पाटील, रणजीत लाड, रवि कोकितकर, मारुती नाईक, राजू चव्हाण आदींच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर महाआरती करण्यात आली. यावेळी नागरिकांना मिठाईचे वाटप करून जल्लोष साजरा करण्यात आला. सायंकाळी मनमोहक असा दीपोत्सव करण्यात आला. यावेळी गल्लीतील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. शुभम पाटील, लक्ष्मण पाटील, अनिल यळ्ळूरकर, प्रतिक पाटील, स्वयम पाटील, आदींसह कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या. नावगे गावातील रामलिंग मंदिरात दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. रविवारी गावात पालखी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत टाळ मृदंगाच्या गजरात वारकरी तल्लीन झाले होते. पालखीचे पूजन नावगेकर इनामदार जयसिंग देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. सायंकाळी प्रवचन व कीर्तनाचा कार्यक्रम झाला. सोमवारी सकाळी पूजा व अभिषेक करण्यात आले. त्यानंतर कीर्तन निरुपण झाले. दुपारी सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. काही गावांमध्ये मंगळवारीही पहाटे काकडारती, दिवसभर भजन, प्रवचन, कीर्तन असे कार्यक्रम झाले. अनेक गावांमध्ये झालेल्या कार्यक्रमामधून विविध प्रवचन व कीर्तनकारांनी प्रभू श्री रामचंद्र यांच्याबद्दल सविस्तर माहिती सांगितली.

Advertisement
Tags :

.