ओसरगाव येथील ''त्या'' महिलेच्या मृतदेहाचे गूढ अखेर उलगडले
ती महिला सावंतवाडी तालुक्यातील, संशयितही ताब्यात
कणकवली / प्रतिनिधी
ओसरगाव येथे सोमवारी उत्तर रात्री महिलेचा जळालेल्या स्थितीत आढळलेल्या मृतदेहाचा अखेर उलगडा झाला आहे. सदरची महिला सावंतवाडी तालुक्यातील किनळे येथील सुचिता सुभाष सोपटे (५५) असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी वेंगुर्ले तालुक्यातील आरवली टाक येथील इतोरीन रुजाय फर्नांडिस (४२) या संशयीताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे समजते.सिंधुदुर्ग सारख्या जिल्ह्यात मानव जातीला काळीमा असणाऱ्या अशा या तीव्र घटनेमुळे खळबळ उठण्यासोबतच महिला सुरक्षिततेचा प्रश्नही पुढे आला होता. एकीकडे कुणकेश्वर यात्रेत पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात असतानाही जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अतिरिक्त पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासात हे मोठे यश मिळविले आहे.तसे पाहिल्यास ओसरगाव येथील मृतदेहाचे गुढ उकलने पोलिसांसमोर आव्हान होते. स्थानिक गुन्हा अन्वेषण व कणकवली पोलिसांनी हे आव्हान पेलत दोन दिवसात या प्रकरणाचा छडा लावण्यात यश मिळविले. प्राप्त माहितीनुसार सावंतवाडी तालुक्यातील अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असलेली सदरची महिला याच संशयित आरोपीच्या गाडीतून कोल्हापूर येथे गेली होती. तेथून परत येत आंबोली मार्गे येऊन पुढे ओसरगाव पर्यंत येत आरोपीने हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. संशयिताने अगोदर खून करून नंतर मृतदेह त्या ठिकाणी जाळण्याचे समजते. उपलब्ध माहितीनुसार संशयिताने हा सर्व प्रकार प्रीप्लॅन केला असण्याची शक्यता आहे. त्याबाबतची प्राथमिक कबुली ही त्याने पोलिसांना दिली असल्याचे समजते. गुरुवारी रात्री संशयीताला स्थानिक गुन्हा अन्वेषण च्या पथकाने ताब्यात घेतले. आज त्याला न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे सूत्रांकडून समजते.