‘त्या’ युवतीच्या मृत्यूचे गूढ कायम
ऋषभवर हल्ला करण्यामागच्या रागाचे कारण काय? प्रकरणाचा उलघडा करण्याचे पोलिसांसमोर आव्हान
पेडणे : धारगळ येथे सोमवारी ऋषभ शेट्यो या युवकावर झालेल्या अॅसिड हल्लाप्रकरणाने गोव्यासह सिंधुदुर्गातील दोडामार्गपर्यंत खळबळ उडाल्याच्या पार्श्वभूमीवर या हल्ल्याशी निगडित युवतीच्या मृत्यूचे नेमके कारण काय होते? याचे गूढ उलगडण्याची जबाबदारी पेडणे पोलिसांवर आली आहे. त्या युवतीच्या मृत्यूशी ऋषभचा काही संबंध होता काय? नीलेश गजानन देसाई याने ऋषभवर अॅसिड हल्ला करण्यामागच्या रागाचे नेमके कारण काय असावे? हे शोधण्यासाठी पेडणे पोलिसांना कसून शोध घ्यावा लागणार आहे. कळणे येथील नीलेश गजानन देसाई याने सोमवारी सकाळी धारगळ येथे बस स्टॉपवर उभ्या असलेल्या वृषभ उमेश शेटये याच्यावर अॅसिड फेकले होते. आपल्या मुलीच्या मृत्यूला ऋषभ कारणीभूत असल्याच्या रागातून पिता नीलेश देसाईने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र या हल्ल्यासोबतच सदर युवतीचा मृत्यू महिन्याभरापूर्वी नेमका कशामुळे झाला होता? याचाही शोध घेण्याची जबाबदारी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पेडणे पोलिसांची आहे.
ऋषभ व मुलीचे व्हाट्सअप चॅटिंग
संशयित नीलेशला करासवाडा म्हापसा येथून पेडणे पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याने पोलिसांसमोर बोलताना सांगितले की आपल्या मुलीसोबत ऋषभची झालेली व्हाट्सअप चॅटिंग तसेच काही फोटो, यासंदर्भातील माहिती दोडामार्ग येथील पोलिसांना दिली होती.
ऋषभ शेट्योचे नेमके वय किती?
ऋषभ शेट्यो हा म्हापसा येथील महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. त्याचे वय 17 वर्षे सांगण्यात आले आहे. मात्र ऋषभ शेट्यो यांचे नेमके वय किती याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रथम वर्ष शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचे वय 18 किंवा त्यापेक्षा जास्त असते. मग या वयाबाबत नेमकं काय गुपित आहे हे समजणे गरजेचे आहे. याबाबत पेडणे पोलिस निरीक्षक सचिन लोकरे यांना याबाबत विचारले असता त्यांनी ऋषभ शेट्यो यांचे जन्म वर्ष 2007 असल्याची माहिती दिली. त्यानुसार ऋषभचे वय 17 वर्षे होतात. मात्र महाविद्यालयात प्रथम वर्ष शिक्षण घेणाया विद्यार्थ्याचे वय अठरा वर्षेपेक्षा जास्त असायला पाहिजे, असा तर्क मांडला जात आहे.
जखमी ऋषभ अजूनही व्हेंटीलेटरवर...
अॅसिड हल्ल्यात जखमी झालेले ऋषभ उमेश शेट्यो हा अजूनही व्हेंटीलेटरवरच आहे. तो उपचारांना प्रतिसाद देऊ लागला आहे. त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी केली आहे, अशी माहिती गोवा वैद्यकय महाविद्यालय हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश पाटील यांनी दिली. डॉ. युरी डायस यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टारांचे खास पथक त्याच्यावर उपचार करत आहेत. तो जरी शुद्धीवर आला असला तरी तो अद्याप बोलण्याच्या स्थितीत नाही. त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर पुढील उपचार केले जातील. अॅसिड फेकल्याप्रकरणी संशयित नीलेश गजानन देसाई याला न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे. उद्या 3 जुलै रोजी पणजी येथील बाल न्यायालयात त्याला हजर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.