इन्सुलीच्या सोनाली गावडे मृत्यू प्रकरणाचे गूढ कायम
प्रतिनिधी
बांदा
इन्सुली कोठावळेबांध येथील सोनाली प्रभाकर गावडे (वय. २५) मृत्यूप्रकरणी वेगवेगळ्या नाट्यमय घडामोडी बाहेर येत आहेत. मृतदेहा बाजूला मिळालेली दुसरी छत्री तिच्या चुलत भावाची असल्याचे उघड झाले आहे. तो बुधवारी सकाळी तेथे मृतदेह पाहण्यासाठी गेला असता छत्री तेथे विसरून गेल्याची माहिती त्याने बांदा पोलिसांना दिली.सीसीटीव्ही फुटेज मध्ये एक युवक त्या वाटेने रस्त्यावर येताना दिसत असल्याने तो युवक कोण याचा तपास करण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी बांदा पोलीस घटनास्थळी ठाण मांडून होते. त्यामुळे घटनास्थळी त्यांना काय पुरावा मिळाला की नाही हे आता पुढे समोर येईल. पोलिसांच्या कार्यपद्धती बाबत परिसरातून संताप व्यक्त होत आहे. इन्सुली कोठावळेबांध सोनाली प्रभाकर गावडे युवती मृत्यूप्रकरणी नाट्यमय घडामोडी पुढे येत आहेत. मंगळवारी कामासाठी निघालेली ही युवती घरी न परतल्याने तिची सर्वत्र शोधाशोध केल्यावर न मिळाल्याने ती बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. तर बुधवारी सकाळी पहाटे तिचा मृतदेह दोन फुट पाण्यात आढळून आला. दरम्यान वैद्यकीय अहवालात तिचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे म्हटले. मात्र ज्या ठिकाणी तिचा मृतदेह आढळून आला त्या ठिकाणी दोन फुटच पाणी असल्याने तिचा पाण्यात बुडून मृत्यू कसा होईल त्यामुळे घातपात असण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानंतर मृतदेहासोबत पहिल्या दिवशी एक छत्री आढळून आली. तर दुसऱ्या दिवशी मृतदेहापासून काही मीटर अंतरावर तिचा मोबाईल आणि छत्री आढळून आली. दोन दिवसानंतर तेथे आढळून आलेली छत्री तिच्या चुलत भावाची असल्याचे भावाने शुक्रवारी रात्री पोलिसांना सांगितले.त्यामुळे छत्री तिच्या घरच्यांची असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान मृतदेह सापडला त्या दिवशी शेकडो ग्रामस्थ त्या ठिकाणी आले होते त्यावेळी मृतदेहाच्या आसपास तिचा मोबाईल आढळून आला नव्हता मात्र दुसऱ्या दिवशी अचानक मृतदेह होता त्याच्या काही अंतरावर मोबाईल आणि छत्री आढळून आली. त्यामुळे शंका निर्माण होत आहे. मात्र ती छत्री तिचीच असल्याचे पोलिसांना घरच्यांनी सांगितले. त्यामुळे नेमके प्रकरण कुठे वळण घेईल हे सांगता येणार नाही. हा तपास करण्याचे मोठे आव्हान बांदा पोलिसांसमोर आहे.शुक्रवारी सायंकाळी बांदा पोलीस घटनास्थळी ठाण मांडून होते रात्री आठ पर्यंत ते त्याच परिसरात वावरत होते. तर तिच्या घरी जात पुन्हा विचारपूस करत होते. दरम्यान सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली असता. त्यात ती ज्या कंपनीत कामाला जात होती त्या कंपनीची गाडी गेल्यावर तब्बल अर्ध्या तासानंतर एक युवक वरून खाली येत आहे. स्थानिकांना विचारले असता तो अनोळखी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे तिथून जाणारा तो अनोळखी युवक नेमका कोण हे मात्र समजू शकले नाही.दरम्यान सोनाली घरी माघारी आली की त्याच युवकाने तिचे काय केले हे स्पष्ट होईल. त्यामुळे तो युवक कोण हे पोलिसांना शोधून काढावे लागणार आहे.