खुनातील संशयिताने पोलिसांचा केला पचका..!
सांगली :
इस्लामपूर येथील शेतमजूर महिलेच्या खुनातील संशयित पोलिसांच्या ताब्यातून पळाला. शुक्रवारी सायंकाळी हा प्रकार घडला. सांगलीतील अगदी गर्दीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने पोलीसांचा चांगलाच पचका झाला. राजवाडा चौकात ही थरारक घटना घडली. यामुळे इस्लामपूरसह जिल्ह्यात खळबळ उडाली. पोलिसांची विविध पथके धावली आणि तासाभराने त्याला रेल्वे स्टेशनवर पकडले.
मुवाज मुलाणी (रा. इस्लामपूर) असे पलायन केलेल्या संशयितचे नाव आहे. हाफिनजी मुल्ला (वय ६५, रा. इस्लामपूर) या महिलेचा मंगळवारी मुवाज याने दागिन्यांसाठी कापूरवाडी येथील ओढ्यात डोक्यात दगड घालून खून केला होता. त्याला तात्काळ अटकही करण्यात आली होती. त्याच्याकडील तपास पूर्ण झाल्यावर न्यायालयाच्या आदेशानुसार शुक्रवारी त्याला सांगलीतील जिल्हा कारागृहात दाखल करण्यासाठी सांगलीत आले होते.
मात्र कारागृहात दाखल करण्यासाठी अडथळा आल्याने त्याला घेऊन जात असताना त्याने पोलिसांच्या ताब्यातून पलायन केले. त्याचा पोलिसांनी पाठलाग केला. हा थरार शुक्रवारी सायंकाळी राजवाडा चौक परिसरात घडला. त्यानंतर पोलिसांची विविध पथके त्याच्या शोधासाठी पाठवण्यात आली.
सांगली शहर पोलीस ठाण्यातून तात्काळ पथक पाठवून त्याचा शोध सुरु करण्यात आला. दरम्यान स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाकडूनही शोध सुरु करण्यात आला. पोलीसांची धावपळ पाहून नागरिकांच्यात चर्चेला उधाण आले होते. सुमारे तासाभराच्या शोधानंतर संशयित रेल्वे स्टेशनवर पोलिसांच्या हाती लागला.
- तासानंतर मुवाजला रेल्वे स्टेशनवर पकडलं
मुवाज मुलाणी याने राजवाडा चौकातून पळून गेल्यानंतर तात्काळ पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली. त्यांनी त्याचा विविध मार्गानी पाठलाग सुरु केला. अखेर तो तासानंतर रेल्वे स्टेशनवर सापडला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चांगलेच फैलावर घेतले. थोडा जरी वेळ झाला असता तर तो रेल्वेने पसार झाला असता. आता त्याच्यावर पळून गेल्याचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. दरम्यान त्याच्या पलायनाने इस्लामपूरसह जिल्ह्यात खळबळ उडाली होती.