For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गायत्री मराठेच्या खुनाचा अखेर छडा

12:35 PM May 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
गायत्री मराठेच्या खुनाचा अखेर छडा
Advertisement

आंध्र प्रदेशमधील दोघांना अटक : प्राथमिकदृष्ट्या चोरीसाठी खून

Advertisement

वास्को : वास्को शहराजवळच्या वस्तीत गायत्री मराठे या वृध्देच्या खूनाचा छडा लावण्यास वास्को पोलिसांना अखेर यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केलेली असून ते दोघेही आंध्र प्रदेश राज्यातील आहेत. हा खून चोरीच्या उद्देशातूनच झाल्याचे उघडकीस आले आहे. अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे विजय लक्ष्मण गोरली (35) व रवींद्र गोरेला श्रीनीवेंटू (25) अशी आहेत. या खून प्रकरणामागे अन्य काही षडयंत्र आहे काय, याचाही तपास पोलीस करीत आहेत. वास्को शहरानजीकच्या पिसे डोंगरी खारवीवाडा भागात राहणाऱ्या गायत्री रत्नाकर मराठे या वृध्द महिलेचा खून झाल्याचे 21 एप्रिलच्या संध्याकाळी उघडकीस आले होते. या खूनाचा तपास लागणार की नाही अशी भीती लोकांमध्ये पसरली होती. अखेर 25 दिवसांच्या पोलीस तपासानंतर या खून प्रकरणाचा छडा लागला आहे. यासंबंधी काल शुक्रवारी संध्याकाळी गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता व दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक सुनिता सावंत यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली. मयत वृध्द महिला रस्त्या शेजारच्या घरात एकटीच राहत होती. ही गोष्ट संशयित आरोपींच्या लक्षात आली होती. त्यामुळे त्या दोघांनी तिच्या घरात प्रवेश करून दागिने हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिने प्रतिकार केल्याने आरोपींनी तिचा खून केल्याचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी स्पष्ट केले.

चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार विजय व रवींद्र हे दोघे युवक आंध्र प्रदेशच्या कामुल या जिल्ह्यातील असून ते गोव्यात फिरण्यासाठी आले होते. 19 एप्रीलच्या सकाळी ते वास्को रेल्वे स्थानकावर उतरले. दिवसा फिरून रात्री खाणेपिणे झाल्यानंतर ते शहरातील पालिका इमारतीसमोरील फुटपाथवरच झोपले. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत शहरात इकडेतिकडे फिरले. दुपारी दारू पिल्यानंतर फिरत असताना त्यांना वृध्द महिला एकटीच घराबाहेर उभी असलेली दिसली. तिच्या अंगावर दागिने होते. ती घरात एकटीच असल्याचाही अंदाज त्यांना आला. त्यामुळे समोरच्या दरवाजातून त्यांनी तिच्या घरात प्रवेश केला. दागिने हिसकावण्यासाठी तिच्या अंगावर हात घालताच ती किंचाळल्याने तिचा आवाज बंद करण्यासाठी तिला बांधण्याचा प्रयत्न झाला. झटापटीत तिचा श्वास कोंडाला गेला. याचवेळी एकाने तिच्या मानेवर कटरने वार केला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. त्यामुळे घाबरून ते दोघेही मागच्या दारातून घराबाहेर पडले व आरामात चालत पुढे गेले. त्यामुळे त्यांच्याबाबत कुणालाही संशय आला नाही. त्यांचा चोरीचा प्रयत्न फसला. चोरीच्या उद्देशानेच हा खून करण्यात आल्याची कबुली एका आरोपीने दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी दिली.

आरोपी बारमध्ये पीत बसले होते दारु

या खून प्रकरणाचा सर्व दृष्टीकोनातून तपास करण्यात आला. त्यात आतापर्यंत चोरीचा उद्देश उघड झालेला असला तरी अन्य काही कारण आहे काय याचाही तपास पोलीस करीत असल्याचे अधीक्षक गुप्ता व सुनिता सावंत यांनी म्हटले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी विविध ठिकाणच्या सी.सी.टी.वी. कॅमेरांची मदत घेण्यात आली. संशयित म्हणून अनेकजणांची चौकशी करण्यात आली. मात्र, दोघांवर दाट संशय निर्माण झाला होता. अखेर तेच खरे आरोपी ठरले. परप्रांतीय असे दिसणारे  हे दोघे युवक दुपारच्या वेळी त्या घरापासून जवळच असलेल्या एका बारमध्ये जवळपास दोन तास दारू पित बसले होते. त्या बारमधूनच त्या दोघांनी त्या वृध्द महिलेवर नजर ठेवली होती. त्यामुळेच त्या दोघांच्या हालचाली पोलिसांच्या नजरेत भरल्या व त्यांचा तपास सुरू झाला. ते दोघेही आंध्र प्रदेशमधील असल्याचे समजताच पोलिस रवाना झाले. बऱ्याच प्रयत्नानंतर ते तावडीत सापडले. एक आरोपी तामीळनाडूत नजरेत आला. मात्र, त्याने पोलिसांना हुलकावणी दिली. दुसऱ्यांदा आंध्र प्रदेशात शोध घेतल्यानंतर दोघेही पोलिसांच्या हाती लागले. विजय याला शुक्रवारी वास्कोत आणण्यात आले तर रवींद्र याला शनिवारी पहाटे आणण्यात आले. दोघांनाही सात दिवसांच्या रिमांडवर पोलीस कोठडीत ठेवण्यात आलेले आहे. दोघेही संशयित आरोपी एकमेकांचे नातेवाईक आहेत. विजय हा मजूरी करणारा आहे तर रवींद्र हा दारूची तस्करी करणारा आहे.

पोलिसांच्या प्रयत्नांना अखेर यश

या खून प्रकरणातील संशयित आरोपींच्या ठावठिकाणाचा अंदाज येताच वास्कोचे पोलीस निरीक्षक कपिल नायक यांच्या नेतृत्वाखाली तसेच गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक लक्षी आमोणकर यांच्या नेतृत्वाखाली व दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक तसेच वास्को पोलीस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली दोन तपास पथके तयार करण्यात आली. यात नवीन पालयेकर, सॅमुउल्ला मकांदार, प्रकाश उटकुरी, नितम खोत, संतोष भाटकर, रोहन गोवेकर, रवीकुमार कवली, आशिष आरोलकर यांचा समावेश होता. या पोलिसांच्या प्रयत्नांमुळे आरोपीना गजाआड करण्यात यश आले.

चोरी करण्यासाठी की खूनच करण्यासाठी आले होते?

गायत्री मराठे या महिलेचा खून चोरीच्या उद्देशानेच झाल्याचे व संशयित आरोपींनीही तशी कबुली दिली असली तरी या प्रकरणात अन्य काही काळेबेरे असावे असा संशय स्थानिक लोकांमध्ये पसरलेला आहे. ती एकटीच राहात असलेले ते घर काहींना अडचणीचे ठरले होते अशीही चर्चा आहे. शिवाय त्या वृध्द महिलेचा खून केल्यानंतर त्यांना तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने संशयितांना सहज काढता आले असते. परंतु त्यांनी ते दागिने किंवा घरातील कोणत्याच वस्तूंना हात लावलेला नाही. त्यामुळे ते चोरटे नव्हते. ते त्या वृध्द महिलेचा खून करण्यासाठीच आले असावेत असाही संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस या खून प्रकरणाचा सर्व दृष्टीने तपास करीत आहेत. या संशयित आरोपींवर त्यांच्या राज्यात व इतर कुठे नोंद आहेत काय व त्यांची पाश्वभूमी कशी आहे याबाबत पोलीस तपास करणार आहेत.

Advertisement
Tags :

.