पालिकेचा अर्थसंकल्प 642 कोटी 99 लाखाचा
सातारा :
2025-26 च्या नवीन विकास आराखड्यात रिंगरोड, रस्ते विकास प्रकल्प, पथदिवे, सीसीटीव्ही, राजवाडा येथील सेंट्रल पार्क, बहुमजली पार्किंग, शिवतीर्थ विकास, शाहुपूरी येथे व्यापारी केंद्र, भाजी मंडई व स्टेडियम उभारणी, अजिंक्यतारा किल्ला विकसित करणे आदी बाबींची विकासात्मक तरतूद करत सातारा पालिकेचा 2025-26चा 642 कोटी 99 लाखाचा सातारा पालिकेचा अर्थसंकल्प छ. शिवाजी महाराज सभागृहात मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी सादर केला. त्यास सर्व खातेप्रमुखांनी मंजुरी दिली. तसेच गोडोली तलाव सुशोभीकरण मार्च 2025 पर्यंत पूर्ण होईल, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी 50 उद्याने निर्धारित करण्यात आलेली आहेत. वाहन खरेदीसाठी 1 कोटी 20 लाखांची तरतूद केली आहे.
प्रशासकीय अर्थसंकल्पीय सभेला उपमुख्याधिकारी श्रीमती नाईक, मुख्य अभियंता दिलीप चिद्रे, पाणीपुरवठा अभियंता शहाजी वाठारे, आरोग्य विभाग प्रमुख प्रकाश राठोड, अतिक्रमण हटाव विभाग प्रमुख प्रशांत निकम यांच्यासह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते. मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात 2020 मध्ये हद्दवाढ झाली आहे. त्या भागातील कर मागणी देयके आली आहेत. मालमत्ता कर भरण्यास नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. वसूल होणारा मालमत्ता कर हा हद्दवाढ क्षेत्रातील विकासकामांसाठी वापरण्यात येणार आहे.
2025-26 मध्ये उर्वरित कामांसाठी भरीव निधीची तरतूद केली आहे. नगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचारी आणि कार्यरत कर्मचाऱ्यांचा 7 व्या वेतन आयोगाच्या फरकापोटी संपूर्ण रक्कम अदा केली आहे. शहर कार्बन न्यूट्रल सिटी बनवण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचा संकल्प करण्यात आला होता. त्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. वीज निर्मितीमध्ये स्वयंपूर्ण बनवण्यासाठी 1.5 मेगॉवॅट क्षमतेच्या सौरउर्जा प्रकल्पाचे काम अंतिम टप्यात आले असून कास योजनेवर 1 मेगॉवॅटचा जलविद्युत प्रकल्प उभारणीचे कार्याद्देश देण्यात आले आहेत. मार्च 2026 अखेर हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. त्यामुळे पालिकेस पथदिवे, जलशुद्धीकरण प्रकल्प, एसटीपी यासाठी लागणारी वीज पालिका स्वत: बनवणार आहे. यामुळे सातारा शहर हे शाश्वत वीज निर्मिती व वीज वापराबाबत आदर्श शहर ओळखले जाणार आहे. गोडोली तलावाच्या सुशोभीकरणाचे काम मार्च 2025 पर्यंत पूर्ण होणार आहे. 2025-26 आर्थिक वर्षात किमान 50 उद्याने निर्धारित केलेली आहेत. ते कामही लवकरच पूर्णत्वास येणार आहे. तसेच पालिकेच्या नवीन इमारतीचे काम डिसेंबरअखेर पूर्णत्वास येणार आहे. वाहतूक विभाग सक्षम करण्यासाठी वाहन खरेदीसाठी 1 कोटी 20 लाखाची तरतूद करण्यात आली आहे. सातारकर नागरिकांसाठी ‘माय सातारा’ हे अॅप विकसित केले आहे. तसेच मार्च 2025 पासून व्हॉट्सअॅप चॅटबूट सुरु केला जाणार आहे. शासनाने परवानगी दिली तर शहर बससेवा सुरु करण्यास पालिका सक्षम आहे, असेही मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी सांगितले.
तपशील जमा
आरंभीची शिल्लक 47 कोटी 16 लाख
कर महसूल 36 कोटी 40 लाख
अभिहस्तांतरित महसूल आणि भरपाई 48 कोटी 3 लाख
महसुली अनुदाने 25 लाख 30 हजार
एकूण उत्पन्न 132 कोटी 73 लाख
भांडवली जमा 463 कोटी 10 लाख
एकूण जमा 642 कोटी 99 लाख
तपशिल खर्च
आस्थापना 56 कोटी 54 लाख
प्रशासकीय खर्च 15 कोटी 52 लाख
राखीव निधी 1 कोटी 45 लाख
स्थिर व जंगम मालमत्ता 479 कोटी
शिल्लक 3 कोटी 60 लाख
एकूण खर्च 642 कोटी 95 लाख