कुलभूषण यांचे अपहरण करणाऱ्या मुफ्तीची हत्या
बलुचिस्तानमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या :
वृत्तसंस्था/ क्वेटा
भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या अपहरणात मदत करणाऱ्या मुफ्ती शाह मीर याची पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये हत्या करण्यात आली आहे. अज्ञात बंदूकधाऱ्यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. कुलभूषण जाधव यांचे इराणमधून अपहरण करण्यात मुफ्ती मीर याने पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयला मदत केली होती.
मानवी तस्करी आणि शस्त्रास्त्र तस्करीमध्ये सहभागी असलेला मुफ्ती शाह मीर हा इस्लामिक कट्टरपंथी पक्ष जमियत उलेमा-ए-इस्लामचा सदस्य होता. शुक्रवारी रात्रीच्या नमाजानंतर मुफ्ती शाह मीर मशिदीतून बाहेर पडत असताना दुचाकीस्वार हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला. त्याच्यावर अनेक गोळ्या झाडल्या. पाकिस्तानी वृत्तपत्र ‘डॉन’च्या वृत्तानुसार, गोळी लागल्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याला मृत घोषित करण्यात आले.
हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना खोट्या आरोपात अडकवले होते. पाकिस्तानी लष्कराने 3 मार्च 2016 रोजी कुलभूषण जाधव यांना बलुचिस्तान प्रांतातून अटक केली. पाकिस्तानने त्याच्यावर हेरगिरी आणि देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप केला. पाकिस्तानने एक व्हिडिओ जारी करत जाधव यांनी कथितपणे भारतीय गुप्तचर संस्था रॉसाठी काम करत असल्याची कबुली दिल्याचा दावा करण्यात आला होता. तथापि, भारताने हा दावा नाकारत ते जबरदस्तीने केलेले विधान म्हटले होते. पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थांनी जाधव यांचे इराणमधून अपहरण केले. निवृत्तीनंतर जाधव इराणमध्ये व्यवसाय करत होते.
जाधव यांना मृत्युदंडाची शिक्षा, सध्या तुरुंगात
कुलभूषण जाधव यांच्यावर पाकिस्तानी लष्करी न्यायालयात खटला चालवण्यात आला. 10 एप्रिल 2017 रोजी लष्करी न्यायालयाने त्यांना हेरगिरी, दहशतवाद आणि देशविरोधी कारवायांच्या आरोपाखाली मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. भारताने या निर्णयाचा तीव्र निषेध करत सरकारवर या प्रकरणात पारदर्शकता न ठेवल्याचा आरोप केला. मे 2017 मध्ये भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजी) धाव घेत पाकिस्तानवर व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. त्यानंतर ‘आयसीजे’ने जाधव यांच्या फाशीला स्थगिती देत अंतिम निर्णय येईपर्यंत त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे आदेश दिले. जुलै 2019 मध्ये ‘आयसीजे’ने भारताच्या बाजूने निकाल देत पाकिस्तानला जाधव यांच्या शिक्षेचा पुनर्विचार करण्याचे निर्देश दिले. तेव्हापासून आतापर्यंत पाकिस्तानने यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. सध्या कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत.