बहुचर्चित घरपट्टीवाढीला अखेर स्थगिती !
सांगली :
महापालिकेच्या बहुचर्चित घरपट्टीवाढीला अखेर स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिका मुख्यालयात गुरूवारी झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत आमदार सुधीर गाडगीळ यांनी मनपा आयुक्त शुभम गुप्ता यांना याबाबतचे स्पष्ट निर्देशच दिले. मनपा क्षेत्रातील नागरी समस्या व त्यावरील उपाययोजना याबाबत पालिकेत आयोजित केलेल्या बैठकीत गाडगीळ यांनी घरपट्टीवाढीचा प्रस्ताव आगामी सहा महिन्यासाठी स्थगित ठेवून त्यानंतर फेरमूल्यांकन करत कमीत कमी घरपट्टी लावण्याची सुचना आयुक्तांना केली.
दरम्यान, घरपट्टीवाढीला स्थगिती देण्याबाबत गाडगीळ यांनी घेतलेल्या निर्णयाचे शहरवासियांतून जोरदार स्वागत करण्यात येत आहे. महापालिका क्षेत्रातील नागरी प्रश्न व समस्या बाबत आमदार गाडगीळ यांच्यावतीने माजी नगरसेवक, विविध संघटना, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यासह पालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली. पालिकेच्या डॉ. वसंतदादा पाटील सभागृहात आयोजित केलेल्या बैठकीत अन्य प्रश्नासह गाडगीळ यांनी घरपट्टीवाढीच्या प्रस्तावाला हात घातला. आयुक्त शुभम गुप्ता, अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख, रविकांत अडसूळ, उपायुक्त वैभव साबळे यांच्यासह अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
घरपट्टीवाढीचा प्रस्ताव काय आहे, याबाबत गाडगीळ यांनी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. लोकांना विश्वासात घेवून त्यांच्यावर फार बोजा न टाकता घरपट्टीवाढ केली असती तर लोकांनी आनंदाने ती भरली असती. पण अचानक दुप्पट, तिप्पट व चौपट अशा पध्दतीने घरपट्टीवाढ करून प्रशासनाने काय साध्य केले. यामुळे लोक घरपट्टी भरतील का बाल्कनी, टेरेस, पार्कींग असे मुद्दे समाविष्ट करून घरपट्टीवाढ करणे चुकीचे आहे. मुळातच लोकांनी त्यांच्या जागेत पार्कींग करत त्यांच्या गाड्या स्वत:च्या जागेत उभ्या केल्या असतील त्यांना कर कशासाठी लावता. रस्त्यावरील वाहनांची कोंडी कमी केली म्हणून मनपाने त्यांना उलट प्रोत्साहनपर द्यायला हवे.
लोकांना तांत्रिक मुद्याशी काहीही देणेघेणे नाही. अचानक मोठा भार टाकून घरपट्टीवाढ करू नका, कमीत कमी वाढ केली तर लोक खुशीने घरपट्टी भरतील. दुप्पट चौपट कर वाढवून कोणीही पैसे भरणार नाही. यातून काहीही साध्य होणार नाही. त्यामुळे घरपट्टीवाढ सहा महिन्यांसाठी स्थागित ठेवा. सहा महिन्यांनी मालमत्तांचे फेरमूल्यांकन करून कमीत कमी दराने घरपट्टीची आकारणी करा. घरपट्टीवाढीबाबत लोकांच्या भावना तीव्र आहेत. लोक संताप व्यक्त करत आहेत. त्यामुळे मनपाने सहा महिने हा प्रस्ताव स्थगित ठेवावा, असे गाडगीळ यांनी सांगितले.
बैठकीत माजी आमदार दिनकर पाटील, माजी नगरसेवक हणमंतराव पवार, युवराज गायकवाड, माजी उपमहापौर मोहन जाधव, उर्मिला बेलवलकर, इरफान शिकलगार, आयुब पटेल, श्रीकांत शिंदे, विश्वजीत पाटील, शैलेश पवार, राजेंद्र पुंभार, अतुल माने यांनी घरपट्टीवाढीबाबत मुद्दे मांडले.
अचानक घरपट्टी वाढ करणे अन्यायकारक
लोकांना तांत्रिक मुद्याशी देणेघेणे नाही, दुप्पट तिप्पट, चौपट घरपट्टीवाढ करण्याचा प्रस्ताव चुकीचा आहे. मनपाचे उत्पन्न जरूर वाढले पाहिजे. पण अचानक मोठा भार टाकून घरपट्टीवाढ करणे अन्यायकारक आहे. शहरातील लोकांच्या भावना तीव्र आहेत. आगामी सहा महिन्यासाठी घरपट्टीवाढीचा प्रस्ताव स्थगित ठेवून फेरमूल्यांकन करावे व त्यानंतर कमीत कमी दराने नवीन आकारणी करावी.