‘छोरी 2’ चित्रपट लवकरच झळकणार
नुसरत भरुचा मुख्य भूमिकेत
छोरी या चित्रपटाचा सीक्वेल आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 2021 मध्ये प्रदर्शित छोरी या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. सामाजिक मुद्दे आणि लोककथांवर आधारित चित्रपटाचे कौतुक झाले होते. आता दीर्घ प्रतीक्षेनंतर छोरीचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
छोरी 2 या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. प्राइम व्हिडिओने हा टीझर सादर केला असून तो पाहिल्यावर चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढणार आहे. टीझरची सुरुवात स्वत:च्या आईला शेतात शोधणाऱ्या एका मुलीने होते, एक शक्ती तिला विहिरीत ओढून नेते, या मुलीला शोधत तिची आई म्हणजेच नुसरत तेथे पोहोचत असल्याचे टीझरमध्ये दाखविण्यात आले आहे. रहस्यमय शक्ती आणि सामाजिक कुप्रथांच्या विरोधात एका आईच्या संघर्षाची कहाणी यात दाखविण्यात आली आहे. यात सोहा अली खान देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल फुरियाने केला आहे. हा चित्रपट 11 एप्रिलपासून प्राइम व्हिडिओर पाहता येणार आहे. चित्रपटात नुसरत भरुचा, सोहा अली खानसोबत सौरभ गोयल, पल्लवी पाटील यासारखे कलाकार दिसून येणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती टी-सीरिजने केली आहे.