उदे गं आई उदेच्या जयघोषात यल्लम्मा डोंगर दुमदुमला
बुधवारी लाखो भाविकांच्या उपस्थितीत कंकणमंगळसूत्र विधी संपन्न : महाराष्ट्र राज्यातील भाविकांची उपस्थिती लक्षणीय
वार्ताहर/ बाळेकुंद्री
उदे गं आई उदे च्या गजरात व भंडाऱ्याच्या उधळणीत कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीच्या कंकणमंगळसुत्राचा विधी लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पाडला. मंगळवारी व बुधवारी या दिवशी सुमारे तीन लाखांहून अधिक भाविकांनी देवीचे दर्शन घेतल्याची माहिती देवस्थान प्राधिकरण कार्यदर्शी अशोक दुरगुंटी यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, महानवमीनंतर प्रारंभ होणाऱ्या या यात्रेला भक्तांची गर्दी लक्षणीय ठरली. हुली गावचे हिरेमठ यांच्या उपस्थितीत देवीला अभिषेक, होम, विशेष पूजा, आरती आदी धार्मिक विधी पार पडल्यानंतर देवीच्या दर्शनाला सुरुवात झाली. मार्गशीर्ष पौर्णिमेला भरणाऱ्या या यात्रेला महाराष्ट्र राज्यातील भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती. आज गुरुवारी सकाळी 9 नंतर होमहवन पार पडणार आहे.
भाविकांची एकच गर्दी
यात्रेच्या मुख्य दिवशी बुधवारी परराज्यातील विविध ठिकाणाहून भाविकांनी बस वा खासगी वाहनातून हजेरी लावल्याने डोंगर फुलून गेला होता. स्थानिक भाविकही सायकली, दुचाकी वाहने, टेम्पो पायवाटचा आधार घेत लोंढेच्या लोढे डोंगर गाठल्याने सुमारे दोन कि. मी. अंतरापर्यंत गर्दी फुलून गेली होती. मंदिरापासून तीन कि. मी. वरील खुल्या जागेत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान, देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लावल्या होत्या. महिला व पुरुष अशा स्वतंत्र रांगा केल्याने भक्तांना दर्शन घेणे सुलभ झाले होते. यात्रेनिमित्त डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जोगुळभावी पुंडात भाविकांनी स्नानासाठी एकच गर्दी केली होती.
बुधवारी सायंकाळच्या सुमारास हुली गावचे हिरेमठ यांच्या उपस्थितीत पूजा झाल्यानंतर उत्सवमूर्तीची पालखी मिरवणूक काढण्यात आली. सदर मिरवणूक मौनेश्वर मंदिरापर्यंत नेण्यात आली. त्या ठिकाणी उद गं आई उदे च्या जयघोषात कंकण मंगळसूत्र विसर्जनचा विधी पार पाडला. या मिरवणुकीत भाविक ढोल, ताशांच्या तालात व अबीर भंडाऱ्यांची उधळण करत यल्लम्मा डोंगर परिसर अक्षरश: उधळून सोडला. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, गडहिंग्लज, आजरा, पुणे, चंदगड व कर्नाटकातील विजापूर, बागलकोट, धारवाड, हुबळी या भागातील भाविकांचे लोंढे गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या या देवीच्या यात्रेत महाराष्ट्रातील भाविक मोठ्या संख्येने आले होते.
पोलिसांचा बंदोबस्त
यात्राकाळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बैलहोंगल डीएसपी, 7 सीपीआय, 12 पीएसआय व शंभरहून अधिक पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला होता.