For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वणव्यामुळे डोंगररांगा काळवंडल्या

04:19 PM Feb 28, 2025 IST | Radhika Patil
वणव्यामुळे डोंगररांगा काळवंडल्या
Advertisement

तळमावले : 

Advertisement

डोंगरांना लावल्या जाणाऱ्या वणव्यांमुळे औषधी वनस्पती, दुर्मिळ कीटक, जनावरांच्या चाऱ्याचेही मोठे नुकसान होत आहे. सध्या सर्वत्र वणव्यांची धग पसरत आहे. त्यामुळे डोंगररांगा काळवंडलेल्या दिसत आहेत. पाटण तालुका सह्याद्रीच्या डोंगररांगा व कड्याकपारीत विखुरलेला आहे. वनक्षेत्र व खासगी क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर वनसंपदा आहे. त्याचबरोबर हिरडा, बेहेडा, अडुळसा, रक्तचंदन, डाडसांद्री, निर्गुडी, आवळा यासारख्या अनेक औषधी वनस्पती आहेत. शिवाय विविध जातींचे पक्षी, सर्व कीटक, सरडे, भुंगे, ससे अशा प्राण्यांचे वास्तव्य आहे.

जानेवारी ते मे या दरम्यान तालुक्यात डोंगरांना मोठ्या प्रमाणात वणवे लागतात. ग्रामीण भागात ग्रामदेवतांच्या यात्रेनिमित्त डोंगर पेटवण्याची प्रथा आहे. त्यामुळे वणव्याच्या भक्ष्यस्थानी सापडून वनसंपदा पूर्णपणे नष्ट होत असते. जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे वनसंपदा वाचवण्यासाठी सामुदायिक प्रयत्न होण्याची गरज आहे. केवळ हे काम वनविभागाचे आहे असे म्हणून चालणार नाही, तर वणवे लागू नयेत यासाठी सामाजिक व सेवाभावी संस्थांनी पुढे येण्याची गरज आहे. ग्रामीण भागात वणव्यामुळे होणारे दुष्परिणामांची माहिती देण्याची गरज आहे.

Advertisement

गावोगावी असणाऱ्या वन समित्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. वनसंपदा वाचवण्यासाठी ग्रामसभेतही त्याबाबतची माहिती दिली पाहिजे. यात्रा-जत्रानिमित्त डोंगर पेटविण्याची अनिष्ट प्रथा बंद केली पाहिजे. डोंगरकपारीत फिरायला येणाऱ्या पर्यटकांनीही वनाला आग लागणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तसे झाल्यास डोंगररांगा हिरव्यागार दिसतील. कीटक, पक्षी, प्राण्यांचे वास्तव्य वाढेल आणि निसर्गाचा डास थांबण्यास मदत होणार आहे. वनखात्यानेही गावोगावी वणवे रोखण्यासाठी नागरिकांना आव्हान करण्याची गरज आहे.

  • जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न

ग्रामीण भागात चार महिने जनावरे रानात असतात. मात्र डोंगराला लावलेल्या वणव्यामुळे गवत जळून खाक झाल्याने जनावरांना चरायलाच काही नसल्याने अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे.

  • लोकांकडून विनाकारण वणवे

वन विभागाच्या माध्यमातून वणवा रोखण्यासाठी जनजागृतीबरोबरच गावोगावी प्रबोधनही करण्यात आले. मात्र काही लोक विनाकारण वणवे लावत आहेत. त्यामुळे वनविभागाची धावपळ होत आहे.

                                                                                      - शशिकांत नागरगोजे, वनपाल, भोसगाव

  • अपुरी कर्मचारी संख्या

ढेबेवाडी वनविभागात वनविभागाचे कार्यक्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच कर्मचारी संख्या अपुरी असल्यामुळे वणवा ज्या ठिकाणी लागला आहे, त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी विलंब होत आहे. तरी सुद्धा कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचून वणवा विझवत आहेत.

                                                                                             - अमृत पन्हाळे, वनरक्षक, खळे

Advertisement
Tags :

.