पर्वताला मानवाचा दर्जा
एका पर्वताला माणसाचा दर्जा देण्यात आला आहे. न्युझीलंडमधील मूळ रहिवासी माओरी समुदाय एका पर्वताला पूर्वज मानतात. हा पर्वत महत्त्वपूर्ण असल्याने नव्या कायद्याच्या अंर्तत याला कायदेशीर व्यक्तीचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. या कायद्याच्या अंतर्गत आता या पर्वताला मनुष्यासमान सर्व अधिकार अन् कर्तव्यं प्राप्त होणार आहेत. तारानाकी पर्वताला आता माओरी नाव ‘तारानाकी मौंगा’ नावाने ओळखले जाणार आहे. तारानाकी हा 2518 मीटर उंच निष्क्रीय ज्वालामुखीय पर्वत आहे. उत्तर बेटावरील दुसरा सर्वात उंच पर्वत असून पर्यटक, गिर्यारोहक आणि स्नो स्पोर्ट्स प्रेमींदरम्यान लोकप्रिय आहे. याला कायदेशीर ओळख दिल्याने न्युझीलंडमध्ये वसाहतवादाच्या काळात माओरी समुदायाकडून हा पर्वत बळजबरीने हिसकावून घेण्याच्या ऐतिहासिक घटनेची कबुली देण्यात आली आहे. समुदायाच्या झालेल्या हानीची भरपाई आणि न्याय देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचा हिस्सा म्हणजे हा निर्णय आहे.
सर्वसंमत कायदा
पर्वताला कायदेशीर व्यक्तीचा दर्जा देणारे विधेयक न्युझीलंडच्या संसदेत सर्वसंमतीने संमत करण्यात आले आहे. यावेळी संसदेत उपस्थित माओरी समुदायाच्या लोकांनी आनंदाला पारंपरिक वाइता गाऊन आनंद व्यक्त केला. नव्या कायद्याच्या अंतर्गत तारानाकी मौंगाला कायदेशीर स्वरुपात ‘ते काहुई तुपुआ’ नावाची जिवंत आणि अविभाज्य संपूर्ण शाखा मानले जाईल. यात याचे भौतिक आणि अध्यात्मिक दोन्ही पैलू सामील असतील. आता एक नवी संस्था स्थापन केली जाईल, जी पर्वताचा ‘आवाज अन् चेहरा’ असेल. यात माओरी समुदायाचे चार सदस्य आणि संरक्षण मंत्र्यांकडून नियुक्त चार अन्य सदस्य सामील असतील.
इंग्रजांनी मिळविले होते नियंत्रण
1840 मध्ये माओरी समुदाय आणि ब्रिटिश क्राउनदरम्यान वेटांगी करारावर स्वाक्षरी करण्यात आली. ज्यात माओरी लोकांना स्वत:ची भूमी अन् साधनसामग्रीवर अधिकार मिळेल असे आश्वासन होते. परंतु करार इंग्रजी अन् माओरी भाषेत भिन्न अर्थाचा असल्याने वसाहतवाद्यांनी याचे उल्लंघन केले आणि 1865 मध्ये तारानाकी क्षेत्राच्या विशाल भूमीवर ज्यात हा पर्वतही सामील होता, नियंत्रण मिळविले. यानंतर एका शतकापर्यंत या पर्वताच्या व्यवस्थापनाचा अधिकार शिकारी अन् क्रीडासमुहांकडे राहिला, तर माओरी समुदायाला यापासून वंचित ठेवण्यात आले.
ऐतिहासिक महत्त्व
न्युझीलंडचे मूळ रहिवासी माओरी लोक तारानाकी पर्वताला स्वत:च्या पूर्वजाच्या रुपात पूजतात आणि याला सांस्कृतिक, अध्यात्मिक आणि भौतिक जीवनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानतात. ब्रिटिश वसाहतवाद्यांनी 18 व्या आणि 19 व्या शतकात न्युझीलंडवर कब्जा केला होता, तेव्हा त्यांनी या पर्वताचे नाव बदलून ‘माउंट एगमॉन्ट’ ठेवले होते.