शक्ती योजनेचा आरोग्य सेवेसाठी सर्वाधिक उपयोग
सर्वेक्षणातून माहिती समोर : मोफत बसप्रवासामुळे महिलांच्या पैशांची बचत
बेळगाव : महिलांना मोफत बसप्रवास करता यावा यासाठी राज्य सरकारने शक्ती योजना जारी केली. या योजनेचा राज्यातील महिलांनी लाभ घेत विविध ठिकाणी प्रवास केला. एका सर्वेक्षणातून राज्यातील महिलांनी मोफत बस योजनेचा सर्वाधिक लाभ आरोग्य सेवेसाठी घेतल्याची माहिती समोर आली आहे. महिलांनी डॉक्टर, हॉस्पिटल व औषधे यासाठी बस सेवेचा उपयोग केल्याचे दिसून आले आहे. ताराकृष्ण स्वामी यांच्या नेतृत्वाखाली लोकनिती-सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलोपिंग सोसायटीज (सीएसडीएस), इंडस अॅक्शन इनिसिएटीव्हज, बेंगळूर विद्यापीठ व तुमकूर विद्यापीठाच्या सहकार्याने सर्वेक्षण व क्षेत्रिय संशोधन करण्यात आले. महिला व त्यांच्या कुटुंबावर या योजनेचा सामाजिक, आर्थिक परिणाम यावर लक्ष केंद्रित करणारा हा अभ्यास आहे.
बागलकोट, बेळगाव, बेंगळूर ग्रामीण, बेंगळूर शहर, हासन, दक्षिण कन्नड, दावणगेरी, बिदर, गुलबर्गा, कोलार, मंड्या, तुमकूर, विजयनगर, चिक्कमंगळूर व विजापूर आदी 15 जिल्ह्यांमध्ये घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये सहा हजार महिलांनी सहभाग घेतला होता. सर्वेक्षणातून या योजनेचा लाभ कमी उत्पन्न असलेल्या 90 टक्क्यांहून अधिक महिलांनी घेतला आहे. 80 टक्क्यांपेक्षा जास्त महिलांनी प्रत्येक आठवड्याला या योजनेचा लाभ घेत 500 रुपयांची बचत केली आहे. 19 टक्के महिलांनी या योजनेचा नोकरी शोधण्यासाठी उपयोग केला आहे. बेंगळूर शहरी भागातील 34 टक्के महिलांनी सुधारित रोजगार मिळविला असून 26 टक्के महिलांनी नव्या नोकऱ्या शोधल्या आहेत. शहरातील जवळजवळ दोन तृतीयांश महिला दररोज मोफत प्रवास करून आपल्या कामावर ये-जा करत असल्याचेही सर्वेक्षणातून समोर आले आहे.
95 टक्के महिलांची पैशांची बचत
या योजनेचा लाभ घेत 95 टक्के महिलांनी पैशांची बचत करत आर्थिक प्रगती केली आहे. मोफत प्रवासामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या महिलांनी एकतृतीयांश पैशांची बचत केली आहे. त्याचबरोबर राज्यातील महिलांनी विविध ठिकाणच्या पर्यटन स्थळांना भेट दिली आहे. तसेच सणासुदीच्या काळात अनेक मंदिरांना भेट देऊन दर्शन घेतले आहे. एकंदरीत शक्ती योजनेचा लाभ महिलांनी मोठ्या प्रमाणात घेतल्याचे समोर आले आहे.