सर्वात अनोखे माकड, केवळ आवाजाने हादरते जंगल
5 किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू येतो आवाज
जंगलातील सृष्टी बाहेरून जितकी शांत दिसते, तितकेच आतून रंजक असते. येथील प्रत्येक प्राण्याचा स्वत:चा भाग अन् स्वत:ची शैली असते. कुणी जमिनीवर धावते, तर कुणी झाडांनाच स्वत:चे घर करतो. याचपैकी एक असे माकड आहे, जे झाडांवर इकडे तिकडे फिरत राहते आणि स्वत:च्या तीव्र आवाजाने दूरपर्यंत स्वत:च्या उपस्थितीची जाणीव करून देते. या माकडाला हॉलर मंकी म्हटले जाते. याची सर्वात मोठी ओळख याचे शरीर नव्हे तर याचा अत्यंत तीव्र आवाज आहे. शांत जंगलात हे जेव्हा हे माक जोरात आवाज काढते तेव्हा तो अनेक किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू येतो. अनेकदा याचा आवाज ऐकून जंगलात मोठा प्राणी गर्जना करत असल्याचे वाटू लागते.
हॉलर मंकीचा आवाज इतका वेगळा अन् तीव्र असतो की जेव्हा तो जोरात ओरडू लागतो, तेव्हा आसपासचे पूर्ण जंगल त्याच्या आवाजाने खडबडून जागे होते. अनेकदा एका समुहाचे माकड एकत्रितपणे आवाज काढू लागतात. अशास्थितीत जंगलात चहुबाजूने तीव्र आवाज ऐकू येतो. दूरवरून ऐकल्यास एखादा मोठा आणि धोकादायक प्राणी जंगलात फिरत असल्याचे वाटू शकते. हॉलर मंकीला त्याच्या तीव्र आवाजामुळेच हे नाव मिळाले आहे. हॉलरचा अर्थ जोरात आवाज काढणारा असतो. याचा आवाज शांत परिस्थितीत अनेक किलोमीटरपर्यंत ऐकू येऊ शकतो.
मोठ्या आवाजाची आवश्यकता का?
हॉलर मंकीचा तीव्र आवाज केवळ गोंगाटासाठी नसतो, हा त्याच्यासाठी संभाष्घ्ण करण्याची एक पद्धत आहे. जंगलात वेगवेगळ्या समुहांची माकडं परस्परांपासून अत्यंत दूरवर असू शकतात. अशास्थितीत प्रत्येकवेळी त्यांच्यासाठी नजीक जाऊन संपर्क साधणे सोपे नसते. याचमुळे माकड तीव्र आवाजाद्वारे इतर समुहांपर्यंत स्वत:चा संदेश पोहोचवतात. यामुळे आसपास इतर माकडांचा समूह आहे की नाही हे समजून घेण्यास मदत मिळू शकते. हॉलर मंकीच्या आवाजाचा संबंध त्याच्या भागाशी देखील असतो. जेव्हा एखादा समूह जोरजोरात आवाज काढू लागतो, तेव्हा तो इतर समुहांना स्वत:च्या उपस्थितीचा संकेत देत असतो.
छोट्या शरीरात शक्तिशाली आवाज कसा
हॉलर मंकीचे शरीर एखाद्या मोठ्या शिकारी प्राण्यासारखे नसते. तरीही त्याचा आवाज तीव्र असतो. याचा गळा आणि आवाज निर्माण करणारी शारीरिक रचना यात मोठी भूमिका बजावतात. हॉलर मंकीमध्ये वाढलेले हायॉइड हाड आणि खास वोकल संरचना असते. हे त्याच्या आवाजाला अधिक मोठा करण्यास मदत करतात. म्हणजेच निर्सगाने या माकडाला मोठ्या शरीराशिवायच असा आवाज दिला आहे, जो त्याच्या उपस्थितीची जाणीव दूरपर्यंत करून देऊ शकतो.
पानं-फळ खाऊन वृक्षांवर वास्तव्य
हॉलर मंकीचे जीवन पूर्णपणे झाडांशी जोडलेले आहे. तो झाडांची पानं, फळे आणि इतर वनस्पती खातो. वृक्षांच्या फांद्यावरच तो आराम करतो. फिरतो आणि स्वत:च्या समुहासोबत वेळ घालवितो. याचमुळे जंगलात वृक्षांची कमतरता त्यांच्यासाठी मोठी समस्या ठरू शकते. जंगलतोड झाल्यास त्यांच्यासमोर अधिवासासोबत भोजनाची समस्याही उभी राहू शकते.
आवाजाने कळतो वावर
हॉलर मंकीची सर्वात मोठी ओळख त्याचा आवाज आहे. जंगलात जर वृक्षांदरम्यान तो लपलेला असेल तरीही त्याच्या जोरदार आवाजामुळे त्याच्या उपस्थितीचा अंदाज बांधता येतो. एका वृक्षावरून दुसऱ्या वृक्षापर्यंत फिरताना आणि सातत्याने स्वत:च्या समुहासोबत संपर्क राखत हे माकड जंगलात स्वत:ची वेगळी ओळख राखून असते. आकारात सामान्य दिसणारे हे माकड जोरात आवाज काढू लागताच त्याचे अस्तित्व दूरपर्यंत जाणवू लागते. याचमुळे हॉलर मंकीला जंगलातील सर्वात अनोख्या आणि तीव्र आवाज असलेल्या माकडांपैकी एक मानले जाते.