14300 वर्षांपूर्वी धडकले होते सर्वात भयानक सौरवादळ
सुमारे 14,300 वर्षांपूर्वी पृथ्वीवर आतापर्यंतचे सर्वात शक्तिशाली सौरवादळ धडकले होते. फिनलंडच्या ओउलु विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी वृक्षांच्या जीवाश्मांमध्ये रेडिओकार्बनच्या प्रमाणाचे अध्ययन करत हा शोध लावला. हे वादळ सध्याच्या तंत्रज्ञानावर निर्भर असलेल्या जगासाठी मोठा धोका ठरू शकले असते. सूर्यातून निघणारी तीव्र ऊर्जा आणि चार्ज्ड कण जेव्हा पृथ्वीच्या वायुमंडळाला धडकतात, तेव्हा याला सौर वादळ म्हटले जाते. हे कण पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राला हादरवून टाकतात आणि रेडिओकार्बन (कार्बन-14) नावाच्या रेडिओत्सर्गी घटकाचे प्रमाण वाढवितात, वैज्ञानिक या रेडिओकार्बनच्या मदतीने जुन्या गोष्टींचे वयोमान शोधून काढतात. वैज्ञानिकांनी झाडांच्या जुन्या सालांमध्ये रेडिओकार्बनची असामान्य वृद्धी पाहिली. नव्या शोधातून ख्रिस्तपूर्व 12,350 साली आलेल्या एका सौरवादळामुळे हे घडल्याचे कळले. त्या काळात युरोपमध्ये मॅमथ शिकारी राहत होते, या लोकांनी त्या काळात बहुधा आकाशात चमकणारा औरोरा बोरियालिस पाहिला असावा, असे वैज्ञानिकांचे सांगणे आहे.
पूर्वीची सौरवादळं
वैज्ञानिकांनी यापूर्वीच्या आणखी 5 मोठ्या सौरवादळांचे अध्यन केले, जे 994 साली, 775 साली, ख्रिस्तपूर्व 5,259 साली आणि ख्रिस्तपूर्व 7,176 साली आले होते. यातील सर्वात शक्तिशाली सौरवादळ 775 साली धडकले होते. ज्याचा उल्लेख जुन्या चिनी आणि अँग्लो-सॅक्सन दस्तऐवजांमध्ये आढळून येतो. परंतु ख्रिस्तपूर्व 12,350 साली आलेले वादळ याहून 18 टक्के अधिक शक्तिशाली होते.
सद्यकाळासाठी धोका
सध्याचे आमचे जग उपग्रह, वीज ग्रीड आणि संचार सिस्टीमवर निर्भर आहे. अशास्थितीत इतके मोठे सौरवादळ मोठे नुकसान घडवून आणू शकते. 1859 च्या कॅरिंग्टन वादळाने टेलिग्राफच्या तारा जाळल्या होत्या. 2003 चे हेलोवीन वादळ याहून 10 पट कमी शक्तिशाली होते, तरीही उपग्रह कक्षेत बिघाड झाला होता. 2024 चे गॅनन वादळ उपग्रहांना हादरविणारे होते. ख्रिस्तपूर्व 12350 सालच्या वादळासारखे वादळ पुन्हा धडकले तर ते वीज अणि इंटरनेटला पूर्णपणे ठप्प करू शकते.
नवे मॉडेल, नवा शोध
पूर्वी वैज्ञानिकांकडे हिमयुगाच्या रेडिओकार्बन डाटाला समजून घेण्याची योग्य पद्धत नव्हती. परंतु ओउलु विद्यापीठाचे संशोधक क्षेनिया गोलुबेंको आणि त्यांच्या टीमने नवे केमिस्ट्री-क्लायमेट मॉडेल तयार केले आहे. याच्या मदतीने प्राचीन वादळाची शक्ती आणि कालावधीचा अचूक अनुमान लावता आला. हे संशोधन अर्थ अँड प्लॅनेटरी सायन्सेस लेटर जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.