सर्वात धोकादायक स्पा
दूधात मिरची मिसळून स्नान करतात लोक
स्पाचे नाव ऐकताच मनात आल्हाददायक चित्र उभे राहेत. पूर्वीच्या काळात स्पा लक्झरी अनुभव मानला जायचा. परंतु आता स्पा सेंटर्स आता सर्वत्र दिसून येतात. सध्या चीनचा एक अनोखा स्पा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चीनच्या हरबिन शहरातील एक स्पा रिलॅक्सेशनपेक्षा अधिक अंगाची लाही लाही करून टाकणार आहे. मॅपल लीफ व्हिलेज हॉट स्प्रिंग रिजॉर्टमध्ये ‘हॉटपॉट स्पा’ नावाचा अनोखा स्पा ट्रेंड वेगाने व्हायरल होतोय. येथे लोक दूधात मिरची, जलपीनो आणि अन्य भाज्या मिसळून स्नान करत आहेत.
स्पा यिन-यांग शेपमध्ये निर्माण केला जातो, यात एकीकडे लाल पाण्यात जलपीनो आणि मिरची तरंगत असतात, दुसरीकडे दूधात लाल खजूर, गोजी बेरीज आणि अन्य भाज्या दिसून येतात. लोक दोन्ही बाजूने डुबकी घेताना दिसून येतात. मिरचीयुक्त हिस्सा रक्ताभिसरण वाढवितो आणि त्वचेला लकाकी देतो, दर दूधयुक्त हिस्सा त्वचेला मुलायम करत असल्याचा दावा करण्यात येतो. परंतु मिरचीमुळे जळजळ आणि तीव्र वेदना होण्याचाही धोका आहे. हरबिनला ‘चायना आइस सिटी’ म्हटले जाते. जेथे हिवाळा अत्यंत तीव्र असतो, अशास्थितीत हॉट स्प्रिंग्स आणि स्पा येथील पर्यटनाचे आकर्षण ठरते. हॉटस्पॉट स्पा याचा नवीन प्रकार असून ज्यात पारंपरिक चायनीज हॉटपॉटला (मसालेदार सूप) स्पामध्ये बदलण्यात आले आहे.