सर्वात सुंदर हस्ताक्षर...
‘स्वयमपि लिखितम्, स्वयम् न वाचयती’ अशी एक संस्कृत म्हण आहे. स्वत:च लिहिलेले स्वत:लाच वाचता न येणे, असा तिचा अर्थ आहे. अर्थातच हा हस्ताक्षराचा प्रश्न असतो. बऱ्याच जणांचे हस्ताक्षर अशा प्रकारचे असते, की या म्हणीसारखी स्थिती निर्माण होते. सुंदर हस्ताक्षर असणे हा एक महत्वाचा गुण मानण्यात येतो. सध्याच्या संगणकाच्या युगातही सुंदर हस्ताक्षराचे महत्व टिकून आहे, हे विशेष म्हणावे लागेल. नेपाळमधील एका विद्यार्थिनीच्या हस्ताक्षराने जगातील सर्वात सुंदर हस्ताक्षराचा मान मिळविला असून तिचे नाव प्रकृती मल्ल असे आहे. बालपणापासूनच ती सुंदर हस्ताक्षरासाठी प्रसिद्ध होती.
ती 14 वर्षांची आणि आठव्या यत्तेत शिकत असताना तिच्या हस्ताक्षर सोशल मिडियावर प्रसिद्ध झाले आणि तो जगभर चर्चेचा विषय झाला. 2017 मध्ये ही घटना घडली. तेव्हापासून सर्वत्र तिची प्रशंसा होत आहे. प्रथमत: अनेकांना ती संगणकावर केलेले लिखावट वाटली. तथापि, नंतरच्या काळात या विद्यार्थिनीने हस्ताक्षराचे प्रत्यक्ष कार्यक्रम केल्यानंतर ते तिचेच आहे, हे निश्चित झाले.
तिचे हस्ताक्षर पाहून सर्वसामान्य लोक तर थक्क होतातच. पण व्यावसयिक हस्ताक्षरतज्ञांनाही याचे आश्चर्य वाटते. तिचे हस्ताक्षर संगणकाचा फाँट असावा, ते संतुलित आहे. दोन अक्षरांमधले अंतर, दोन शब्दांमधले अंतर आणि दोन वाक्यांमधले अंतर, तसेच अक्षरांचे वळण अगदी संगणकाला शोभेल असे आहे. इतके अप्रतिम लेखन ती हाताने कसे करु शकते, हा कित्येकांना पडलेला प्रश्न आहे. तिच्या हस्तलेखनाचा वेगही चांगला आहे. या तिच्या गुणामुळे तिचा नेपाळ आणि नेपाळबाहेरच्या अनेक देशांमध्येही गौरव करण्यात आला आहे.
तिचा आजवर अनेक देशांमध्ये सत्कार झाला आहे. तिच्या हस्ताक्षराला जगभरातून पारितोषिके मिळाली आहेत. संयुक्त अरब अमिरातीच्या 51 व्या वर्धापन दिनानिमित्त त्या देशसमूहाच्या राजधानीत तिचा सत्कार करण्यात आला आहे. तिला नेपाळच्या सेनेद्वाराही सन्मानित करण्यात आले आहे. तिच्या हस्ताक्षराइतके सुंदर हस्ताक्षर आतापर्यंत तरी कोणाचे असल्याचे आढळलेले नाही, अशी प्रतिक्रिया जागतिक पातळीवरच्या अनेक हस्ताक्षरतज्ञांनी व्यक्त केली असून, सोशल मिडियावरही तिच्या हस्ताक्षराचे अनेक फॉलोअर्स निर्माण झाले आहेत. अशा प्रकारे या एका वैशिष्ट्यामुळे ही विद्यार्थिनी जगप्रसिद्ध बनली आहे.