रखवालदार वानर
प्रत्येक संस्थेत सुरक्षेसाठी आणि देखरेखीसाठी माणसांची नियुक्ती केली जाणे, ही सर्वसामान्य बाब आहे. तथापि, उत्तर प्रदेश राज्यातील अलिगढ जिल्ह्यात असणाऱ्या ‘धर्म समाज महाविद्यालय’ नामक संस्थेने रखवालदार म्हणून चक्क एका वानराची नियुक्ती केली आहे. इतकेच नव्हे, तर साधारणत: 12 वर्षे वयाच्या या वानराचे नामकरण ‘गोलू’ असे करण्यात आले असून त्याला महिन्याला 12 हजार रुपयांचे वेतनही दिले जाते. एका वानराची अशी नियुक्ती करण्याचे कारणही तसेच महत्वाचे आहे. या भागात वानरे आणि माकडे यांचा उपद्रव प्रचंड प्रमाणात होत असतो. त्यांना मारण्याची अनुमती कायदा देत नाही. त्यामुळे त्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. ही माकडे महाविद्यालयात उच्छाद करत असतात. त्यांच्याकडून विद्यार्थ्यांवर हल्ला केला जातो. शिकवले जात असताना माकडे वर्गांमध्ये शिरतात आणि विद्यार्थ्यांना, तसेच प्राध्यापकांना त्रास देतात. त्यांच्या वह्या आणि पुस्तके हिसकावून फाडून टाकतात. माणसांना ती मुळीच बधत नाहीत. त्यामुळे मानवी रखवालदारांचा त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही.
या गंभीर समस्येवर आता या महाविद्यालयाने हा प्रभावी उपाय शोधून काढला आहे. एका मोठ्या आकाराच्या वानराचीच नियुक्ती रखवालदार म्हणून करण्यात आली आहे. हाच तो गोलू आहे. तो प्रतिदिन सकाळी आठ वाजता आपल्या कामाला प्रारंभ करतो. महाविद्यालयाच्या संपूर्ण परिसरात तो चकरा मारत राहतो. तो मोठ्या आकाराचा असल्याने त्याला पाहून इतर मोकाट माकडे जवळपासही फिरकत नाहीत. त्यामुळे महाविद्यालयाचे सर्व व्यवहार सुरळीत चालतात. आता माकडांचा त्रास जवळपास पूर्णत: बंद झाला आहे. जे काम मानवी रखवालदारांना जमत नव्हते, ते या वानररुपी रखवालदाराने करुन दाखविले आहे. ‘काट्याने काटा काढणे, अशी एक म्हण आहे. तिचे प्रत्यंतर या घटनेतून सर्वांना दिसून येत आहे.
आता हा ‘गोलू’ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा मित्रही झाला आहे. विद्यार्थी त्याला फळे किंवा काही खाण्याचे पदार्थ देतात. त्याच्यासमवेत ‘सेल्फी’ काढतात. त्यालाही विद्यार्थ्यांचा सहवास आवडू लागल्याचे दिसत आहे. अशा प्रकारे त्याने एक प्राणी असूनही आपली उपयुक्तता चांगल्या प्रकारे सिद्ध केल्याचे स्पष्ट होते.