गृहनिर्माण प्रकल्पासाठी आमदाराने मागितले दहा लाख रूपये
सावियो रॉड्रिग्जचा पोस्ट व्हायरल
प्रतिनिधी/ मडगाव
गृहनिर्माण प्रकल्पासाठी भाजपच्या एका पदाधिकाऱ्याकडे दक्षिण गोव्यातून प्रथम निवडून आलेल्या एका आमदाराने 10 लाख ऊपयांची लाच मागितल्याची पोस्ट भाजपचे पूर्वीचे पदाधिकारी सावियो रॉड्रिग्ज यांनी सोशल मीडियावर टाकल्याने राज्यात खळबळ माजली आहे.
यावर प्रतिक्रीया व्यक्त करताना प्रदेश अध्यक्ष दामू म्हणाले की, सावियो रॉड्रिग्ज हे सध्या भाजपचे पदाधिकारी नाहीत. ते प्राथमिक सदस्य आहेत की नाही, ते मला माहिती नाही. कुणीही कसलेही आरोप करू शकतात. या आरोपात तथ्य नसते.आरोप केले म्हणून किती विश्वास ठेवायचा. पैसे मागितल्याच्या आरोपाची चौकशी होणार, असे वाहतूकमंत्री आणि भाजप आमदार माविन गुदिन्हो यांनी सांगितले. या विषयावर आपण पक्षाच्या वरिष्ठांकडे चर्चा केली आहे. मात्र, त्या वरिष्ठांचे नाव सांगण्यास माविन गुदिन्हो यांनी नकार दिला. गृहनिर्माण प्रकल्पाला मान्यता मिळण्यासाठी दक्षिण गोव्याच्या एका पदाधिकाऱ्याकडे पहिल्याच वेळी निवडून आलेल्या एका आमदाराने 10 लाख ऊपये मागितले. हे पैसे संबंधित मंत्र्याला द्यावे लागतील असे आमदाराने सांगितले. काही काळानंतर हा पदाधिकारी पक्षाच्या मोठ्या पदावर पोचला तेव्हा त्यांनी थेट यावरून मंत्र्याला जाब विचारला. त्यावेळी मंत्र्याने पैसे मागितलेच नसल्याचे सांगितले. आमदाराला बोलावून आणले आणि 10 लाख ऊपये दोन हप्त्यांनी दोन आठवड्यांच्या आत परत केले. जर पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडे आमदार पैसे मागतो तर सर्व सामान्य जनतेचे काय असा सवाल ही सावियो रॉड्रिग्ज यांनी आपल्या ट्वीटरवरील पोस्टात उपस्थित केला आहे.
आपण या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले असून गृहमंत्री अमित शहा तसेच भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे ही पत्रव्यवहार करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच भाजप सरकारमधील आणखीन भ्रष्टाचार उघडा पाडणार असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, प्रदेश अध्यक्ष दामू नाईक यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, सावियो रॉड्रिग्ज हे पक्षाचे आता पदाधिकारी नाहीत. मात्र, ते पक्षाचे सदस्य आहे की नाही याची कल्पना नाही. तसेच कुणी ही आरोप करू शकतात. आपला काही गृहनिर्माण प्रकल्प कुठेच येत नाही. तसेच आपल्या घराचे काम सुरू आहे. त्याला तीन वर्षापूर्वी मान्यता मिळाली होती. त्यासाठी कुणाला पैसे द्यावे लागले नव्हते.