एका फोनकॉलचा चमत्कार निराश आणि हताश
मन:स्थितीत असताना एखादी घटना अशी घडते, की जिच्यामुळे उभारी प्राप्त होते आणि आयुष्य सकारात्मकरित्या परिवर्तित होते, असा अनुभव एक महिलेला आला आहे. गेल वुड असे या महिलेचे नाव असून ती ब्रिटनमधील आहे. तिचे वय 54 वर्षांचे असून काही महिन्यांपूर्वी तिच्या प्रकृतीत गंभीर समस्या उद्भवल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आले. तिच्यावर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेमुळे तिच्या प्रकृतीत केवळ मर्यादित सुधारणा झाली. त्यामुळे आपले पुढचे आयुष्य असे निष्क्रीय अवस्थेत आपल्याला घालवावे लागणार, या चिंतेपोटी ती निराश आणि हताश झाली. आपले सर्वकाही गमावले गेले अशी अतितीव्र नकारात्मक भावना तिच्या मनात निर्माण झाली आणि तिने धीर सोडला.
तिची शस्त्रक्रिया झाल्यानंतर ती विश्रांती घेत असताना तिला एक व्हाइसमेल आला. तिने ‘पीपल्स पोस्टकोड लॉटरी’ जिंकली आहे, असा तो संदेश होता. या लॉटरीच्या माध्यमातून तिला मोठी रक्कम मिळाली. ही रक्कम महिन्याला 12 हजार पौंड किंवा भारतीय चलनात साडेबारा लाख रुपये इतकी होते. अशी रक्कम तिला संपूर्ण वर्षभर मिळणार होती. याचाच अर्थ असा की, ती या लॉटरीच्या माध्यमातून 1 लाख 44 हजार पौंड किंवा जवळपास 1.5 कोटी रुपये इतकी आहे. हा संदेश वाचल्यानंतर तिला प्रथम कोणीतरी आपली चेष्टा करत आहे, असे वाटले. 54 वर्षांच्या गेल या 2009 पासून लॉटरी खेळत आहेत. पण आतापर्यंत त्यांना कधी ती लागली नव्हती. आता त्यांच्या ऐन आवश्यकतेच्या वेळेला ती लागल्याने त्यांना मोठाच आधार मिळाला आहे. एक अवघड शस्त्रक्रिया करुन घेण्यासाठी त्यांना बराच खर्च आला होता. त्यांचा आरोग्य विमा होता. तरीही शस्त्रक्रियेनंतर बरे होण्यासाठी त्यांना बराच पैसा खर्च करावा लागणार होता. आता या खर्चाची त्यांची सोय झाली आहे. प्रथम चेष्टा वाटलेला हा फोनकॉल खरोखरचा आहे, हे नंतर त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे आता त्यांच्या मोठी मानसिक उभारी मिळाली आहे. अर्थात, प्रत्येक रुग्णाच्या संदर्भात असे घडत नाही. हा लक्षावधींमधून घडणारा दुर्मिळ प्रसंग आहे. पण ज्याच्या संदर्भात तो घडतो, त्याचा आत्मविश्वास वाढविण्यास तो कारणीभूत ठरतो, ही बाब निश्चितच सत्य आहे.