Kolhapur News | इचलकरंजीच्या विपुल पोद्दार यांची सूक्ष्म शिल्पकला ठरतेय लक्षवेधी;पेन्सिलच्या टोकावर उमटली कलात्मक झेप
२४ वर्षीय विपुल पोद्दार यांची सूक्ष्म शिल्पकला ठरली लक्षवेधी
इचलकरंजी -एका साध्या पेन्सिलच्या टोकावर तलवार, शिवलिंग, गणपती किंवा अगदी थॉरचा हातोडाही साकारता येऊ शकतो, यावर सहज विश्वास बसणार नाही. मात्र, विक्रमनगर येथील २४ वर्षीय विपुल विनोदकुमार पोद्दार यांनी ही अशक्यप्राय वाटणारी गोष्ट प्रत्यक्षात उतरवली आहे. पेन्सिलच्या ग्रेफाइटवर सूक्ष्म कोरीव काम करत त्यांनी इचलकरंजीत वेगळी कलात्मक ओळख निर्माण केली आहे.
एमबीएपर्यंत शिक्षण घेतलेल्या विपुल यांना बारावीमध्ये असताना यूट्यूबवरील एका व्हिडिओतून या कलेची प्रेरणा मिळाली. सुरुवातीला पेन्सिलवर तलवार कोरण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. मात्र अपयशाने खचून न जाता त्यांनी इंग्रजी ‘एल’ अक्षर कोरून नव्याने सुरुवात केली. त्यानंतर स्वतःचे नाव साकारत पहिली यशस्वी कलाकृती पूर्ण झाली. येथूनच म्हणजे २०१९ पासून त्यांच्या सूक्ष्म शिल्पकलेचा प्रवास सुरू झाला.
ही कला त्यांनी पूर्णपणे स्व-अभ्यासातून आत्मसात केली आहे. जागतिक पातळीवरील सूक्ष्म शिल्पकार सलावत फिदाई आणि दया यांच्या कामाचा अभ्यास करून त्यांनी स्वतःची शैली विकसित केली. विशेष म्हणजे, केवळ पेन्सिल, क्राफ्टिंग चाकू, ब्लेड सेट आणि रंगसामग्री या मर्यादित साधनांवर ते काम करतात.
कौटुंबिक सेंद्रिय खत व्यवसायात वडिलांना मदत करतानाच विपुल कलेसाठी वेळ काढतात. सध्या हा छंद असला तरी भविष्यात बुद्ध मूर्ती, आयफेल टॉवर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पेन्सिलवर साकारण्याचे त्यांचे ध्येय आहे. राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर प्रदर्शन व लिलावापर्यंत ही कला नेण्याचा त्यांचा मानस आहे.
याकामी वडील विनोद पोद्दार, आई उषादेवी पोद्दार, संजय पोद्दार, बनवारीलाल पोद्दार, आदित्य पोद्दार, अशोक पाटणी, अनिल गोयल आदींचे सहकार्य लाभत आहे.