ज्यांनी इंद्रियांना ताब्यात ठेवलेले असते त्यांचे मन बाह्य विषयाकडे ओढ घेत नाही
अध्याय आठवा
जे घोकिती अक्षर वेद-वेत्ते । विरक्त यत्ने मिळती जयास? जे ब्रह्मचर्ये पद इच्छिताती । ते सांगतो मी तुज तत्त्व-सार ।।11 ।। ह्या श्लोकातून भगवंत परब्रह्माबद्दल बोलताना म्हणाले, परब्रह्म ही सांगायची आणि ऐकायची गोष्ट नसून प्रत्यक्ष अनुभवायची गोष्ट आहे. भगवंतांचे बोल अर्जुनाने नीट ऐकले परंतु परब्रह्म हा विषयच असा आहे की, त्याबद्दल कितीही ऐकले तरी कान तृप्त होत नाहीत, म्हणून अर्जुनाला असे वाटले की, भगवंत ह्याबद्दल अधिक काही सांगतील तर बरे होईल. भगवंतांनी अर्जुनाचे मनोगत जाणले आणि ते परब्रह्माबद्दल अधिक सांगू लागले. ते म्हणाले, माणसाचे मन सतत समोर दिसणाऱ्या बाह्य गोष्टींच्या आकर्षणाला बळी पडत असते. त्याबद्दल सातत्याने त्याच्या मनात विचार येत असतात. तरी या मनाच्या ह्या सवयीला नाहीसे करून ते हृदयाच्या डोहात बुडेल असे करावे. थोडक्यात माणसाने त्याच्या स्वभावाला मुरड घालावी असे भगवंतांचे सांगणे आहे. अर्थात स्वभावाला मुरड घालणे हे आकाशाला गवसणी घालण्याइतकेच कठीण आहे हे जाणणारे लोकमान्य टिळक त्यांच्या गीतारहस्य ग्रंथात त्यासाठी उपाय सुचवताना म्हणतात, ज्याला आपल्या स्वभावात बदल करून ते ईश्वरचरणी लावायचे आहे त्याने प्रथम पूर्वकर्मानुसार त्याला मिळालेल्या स्वभावाचा स्वीकार करावा. मन ईश्वराच्या भजन, पूजनात, नामस्मरणात गुंतवण्याचा प्रयत्न करावा. सुरवातीला मन ऐकणार नाही पण माणसाने केलेल्या निश्चयाने हळूहळू ते त्यात रमू लागेल. हातून सत्कार्य करत जावे. कार्याला सुरवात करण्यापूर्वी, ते करताना आणि संपल्यावर ईश्वराचे नाव घेत रहावे. कार्य झाल्यावर ते त्याला अर्पण करावे. असा क्रम नित्य पाळत गेल्यास हळूहळू मूळ स्वभावात फरक पडून तो सात्विक होत जाईल. भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे स्वभावला मुरड घालणे हे प्रमुख उद्दिष्ट ठेवावे म्हणजे उरलेल्या गोष्टी आपोआप साध्य होतील.
भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे जे मन आणि बुद्धी ईश्वराला अर्पण करून निर्विचार होतात त्यांनी इंद्रियांना त्यांच्या ताब्यात ठेवलेले असते. त्यामुळे त्यांचे मन बाह्य विषयाकडे बिलकुल लक्ष देत नाही. ते ईश्वरस्मरणात सदैव दंग असतात. ज्यांच्या हातून अधियज्ञ घडत असतो त्यांच्या मनात ईश्वराशिवाय अन्य विचार नसल्याने त्यांना जिवंतपणीच सर्व विश्व ब्रह्मव्याप्त असल्याचा साक्षात्कार झालेला असल्याने ते ब्रह्मस्वरूप झालेले असतात. त्यामुळे अंत्यसमयी त्यांना त्याचेच स्मरण होते. त्याचा परिणाम म्हणून त्यांची प्राणज्योत ब्रह्मात विलीन होते. ह्या अधियज्ञाची सुरवात मनाला अंतर्मुख करण्यापासून होते.
मन अंतर्मुख झाल्यावर सर्व इंद्रियांचे नियमन करून हृदयाचे ठिकाणी मन एकाग्र करून, प्राण मस्तकामध्ये ठेऊन योगाचरणामध्ये स्थित व्हावे असे भगवंत पुढील श्लोकात सांगत आहेत.
लावूनि सगळी द्वारे कोंडूनि मन
अंतरी । मस्तकी प्राण राखूनि चढला धारणेवरी ।। 12 ।।
क्रमश: