म्यानमारमध्ये सैन्यसमर्थक पक्षाची सरशी
पहिल्या टप्प्यात 96 पैकी 87 जागा जिंकल्या
वृत्तसंस्था/ नेपीडा
म्यानमारच्या सत्तेवर असलेले सैन्यशासन जुंटाच्या समर्थक पक्षाने मोठी आघाडी मिळविली आहे. जुंटाच्या देखरेखीत पार पडलेल्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात त्याचे समर्थनप्राप्त युएसडीपीने आतापर्यंत कनिष्ठ सभागृहाच्या 90 टक्के जागा जिंकल्या आहेत. म्यानमारमध्ये 2021 मध्ये सत्तापालट करत सैन्याने देशाची सत्ता स्वत:कडे घेतली होती. तेव्हापासून देश गृहयुद्धाला सामोरा जातोय. देशभरातील बंडखोर गट जुंटा दलांच्या विरोधात लढत आहेत. या पार्श्वभूमीवर जुंटाने म्यानमारमध्ये ही निवडणूक करविली आहे.
म्यानमारमध्ये एक आठवड्यापूर्वी टप्पाबद्ध स्वरुपात महिनाभर चालणाऱ्या निवडणुकीसाठी मतदान सुरु झाले. जुंटाने याला देशात लोकशाही प्रस्थापित करण्याचा मार्ग ठरविले आहे. दुसरीकडे मानवाधिकार कार्यकर्ते आणि पाश्चिमात्य देशांनी याला केवळ देखावा आणि मार्शल लॉचे नवे रुप संबोधिले आहे. निवडणुकीत विरोधी पक्षांबद्दल अत्यंत कठोर भूमिका घेण्यात आली होती.
सरकारचे समर्थन प्राप्त पक्ष
म्यानमारच्या युनियन इलेक्शन कमिशनने जाहीर केलेल्या निकालानुसार सैन्य समर्थक युनियन सॉलिडेरिटी अँड डेव्हलपमेंट पार्टीने (युएसडीपी) 96 सदस्यीय कनिष्ठ सभागृहातील 87 जागा मिळविल्या आहेत. तर 6 वांशिक अल्पसंख्याक पक्षांनी 9 जागा जिंकल्या आहेत. युएसडीपीने पहिल्या टप्प्यात घोषित 15 प्रादेशक आणि राज्य मतदारसंघांपैकी 14 जागांवर यश मिळविले आहे. मतदानायच पहिल्या टप्प्यातील आणखी 6 टाउनशिपच्या विजेत्यांची घोषणा शिल्लक आहे. आणखी दोन टप्पे 11 आणि 25 जानेवारी रोजी होणार आहेत. तर नॅशनल लीग फॉर डेमोक्रेसीच्या लोकशाहीवादी नेत्या आंग सान सू की यांचे मतदारयादीत नाव नव्हते. सत्तापालटापासून त्या तुरुंगात आहेत. या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 50 टक्के मतदान झाले आहे. 2020 च्या 70 टक्के भागीदारीच्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी आहे.
सैन्याने 2020 च्या मागील निवडणूक निकालांना नाकारले होते. तेव्हा एनएलडीने युएसडीपीला मोठ्या बहुमताने पराभूत केले होते. यानंतर सैन्य आणि युएसडीपीने मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप केला होता. तर सैन्याने सत्तापालट घडवून आणत स्वत:च्या हाती सूत्रे घेतली होती. तेव्हापासून देशात मोठ्या प्रमाणावर उलथापालथ सुरू आहे.