इराणसोबत शस्त्रसंधीची मिडनाइट स्टोरी
नेतान्याहू अन् इराणी अधिकाऱ्यांसोबत ट्रम्प यांचे संभाषण : कतारच्या पीएमओच्या संपर्कात होते वेन्स
‘आम्ही शांतता प्रस्थापित करणार आहोत’ असे ट्रम्प यांनी रविवारी स्वत:च्या अधिकाऱ्यांना सांगितल्यावर ते चकित झाले हेत. अमेरिकेच्या बी-2 बॉम्बर्सनी इराणच्या तीन आण्विक केंद्रांवर विध्वंसक बंकर बस्टर बॉम्ब पाडविल्यावर हा प्रकार घडला होता. परंतु ट्रम्प हे सार्वजनिक स्वरुपात इराण विरोधात कठोर वक्तव्यं करत होते आणि इराणमध्ये सत्तापरिवर्तनाच्या शक्यतेचे संकेत देत होते. तर दुसरीकडे अमेरिकन अधिकाऱ्यांनी इराणी अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू केली, तर ट्रम्प यांनी स्वत: इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांना फोन करत शस्त्रसंधीवर चर्चा सुरू केली होती.
‘चला इराणींना फोनवर घेत बोलुया’ असे ट्रम्प यांनी म्हटल्याचे एका अधिकाऱ्याचा दाखला देत रॉयटर्सकडून सांगण्यात आले. याचदरम्यान ट्रम्प यांनी शस्त्रसंधीसाठी नेतान्याहू यांना तयार करण्याचा विडा उचलला होता, कारण या संघर्षाने पूर्ण मध्यपूर्व क्षेत्राला स्वत:च्या विळख्यात घेण्याचे संकेत दिले होते.
‘बीबी’ला फोनवर घ्या, आम्ही...
बीबीला फोनवर घ्या, आम्ही शांतता प्रस्थापित करणार आहोत असे ट्रम्प यांनी शस्त्रसंधी जाहीर करण्यापूर्वी स्वत:च्या अधिकाऱ्यांना सांगितले होते. बेंजामीन नेतान्याहू यांना ‘बीबी’ या टोपणनावाने संबोधिले जाते. यानंतर ट्रम्प आणि ‘बीबी’ यांच्यात दीर्घ चर्चा झाली. अखेर नेतान्याहू यांनी शस्त्रसंधीची वेळ आल्याचे मान्य केले. परंतु इराणने इस्रायलवर आणखी हल्ले करू नयेत तरच ही शस्त्रसंधी टिकेल असे त्यांनी स्पष्ट केले. इस्रायलने इराणवरील स्वत:चे हल्ले लवकर समाप्त करू इच्छित असल्याचा संदेश अमेरिकेला दिला आहे.
चर्चेत कतारची एंट्री
चर्चेदरम्यान इस्रायलला शस्त्रसंधीसाठी तयार करणे अवघड नव्हते. परंतु इराणसोबत चर्चा करणे कठिण काम ठरले, कराण अमेरिकेकडुन त्याची तीन महत्त्वपूर्ण आण्विक केंद्रे फोर्डो, नतांज आणि इस्फहानवर बॉम्बवर्षाव करण्यात आले होते. यामुळे इराण सूड घेण्यासाठी आतूर होता. याचवेळी कतारने पुढाकार घेतल्याने समस्या दूर झाली. नेतान्याहू यांच्याशी चर्चेनंतर ट्रम्प यांनी कतारच्या राजाशी संपर्क साधला आणि शस्त्रसंधीसाठी इराणला तयार करण्यास सांगितले होते. याचबरोबर उपाध्यक्ष जेडी वेन्स यांनी कतारच्या पंतप्रधान कार्यालयासोबतच्या चर्चेत समन्वय राखला. इराणसोबतच्या चर्चेत वेन्स आणि विदेश मंत्री मार्को रुबियो तसेच अमेरिकेचे प्रतिनिधी स्टीव विटकॉफ देखील सामील झाले होते. कतारच्या पंतप्रधानांशी चर्चा झाल्यावर इराणने शस्त्रसंधी प्रस्तावावर सहमती दर्शविली. यानंतर मंगळवारी सकाळी ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर पोस्ट करत ‘इस्रायल आणि इराणदरम्यान पूर्ण शस्त्रसंधीबद्दल सहमती झाली’ असल्याचे म्हटले.
परंतु इराणने प्रारंभी शस्त्रसंधीच नाकारली, अशाप्रकारचा कुठलाही करार झाला नसल्याची भूमिका इराणने घेतली होती. परंतु नंतर इराणचे विदेशमंत्री अब्बास अराघची यांनी युटर्न घेत शस्त्रसंधी ‘शत्रूवर लादली जात’ असल्याचे म्हटले आहे.
ट्रम्प यांची घोषणा, अधिकारी चकित
इस्रायल आणि इराण परस्परांवर क्षेपणास्त्रांनी हल्ले करत असताना ट्रम्प यांच्याकडून शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आल्याने अमेरिकन प्रशासनाचे काही अधिकारीही चकित झाले. इराणने कतार आणि इराकमधील अमेरिकेच्या वायुतळांवर क्षेपणास्त्रs डागल्याने क्षेत्रात व्यापक आणि दीर्घकाळापर्यंत चालणाऱ्या संघर्षाची शक्यता निर्माण झाली असताना शस्त्रसंधीची घोषणा झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. कतार येथील अल-उदीद तळाला इराणने लक्ष्य केले होते. हा पश्चिम आशियातील अमेरिकेच्या सैन्याचा सर्वात मोठा रणनीतिक तळ आहे. परंतु इराणने या हल्ल्यांपूर्वी कळविल्याचे सांगत ट्रम्प यांनी इराण हा संघर्ष रोखू पाहत असल्याचे संकेत दिले होते. पूर्वसूचना दिल्याबद्दल मी इराणचे आभार मानतो, यामुळे कुठलीच जीवितहानी झाली नसल्याचे उद्गार ट्रम्प यांनी काढले आहेत. 13 जून रोजी इस्रायलने इराणच्या आण्विक कार्यक्रमाला नष्ट करण्याच्या उद्देशाने ‘ऑपरेशन राइजिंग लायन’ सुरू केल्यावर हा संघर्ष पेटला होता. इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये इराणचे वरिष्ठ सैन्याधिकारी आणि 10 अणुशास्त्रज्ञ देखील मारले गेले होते.