मोठ्या युद्धाच्या छायेत मध्यपूर्व
हिजबुल्लाहच्या रॉकेट हल्ल्यांमुळे इस्रायलमध्ये खळबळ : लेबनॉनमध्ये प्रत्युत्तराबद्दल धास्ती
वृत्तसंस्था/ हायफा
मध्यपूर्वेत इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील तणाव वाढत चालला आहे. याचदरम्यान रविवारी लेबनॉनमधील हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर 100 हून अधिक क्षेपणास्त्रs डागली आहेत. हिजबुल्लाहच्या या हल्ल्यानंतर उत्तर इस्रायलमधील शाळा बंद कराव्या लागल्या तर हजारो लोकांना सुरक्षितस्थळी आश्रय घ्यावा लागल्याचे आयडीएफने सांगितले आहे. तर इस्रायलकडून तितकेच ठोस प्रत्युत्तर दिले जाणार असल्याने लेबनॉनमधील नागरिकांची धास्ती वाढली आहे.
इस्रायलमधील तिसऱ्या क्रमांकाचे शहर असलेल्या हायफासमवेत उत्तर इस्रायलमध्ये आता मोठ्या सोहळ्यांवर बंदी घालण्यात आली आहे. रविवारी इस्रायलमध्ये झालेल्या हल्ल्यांमुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. हिजबुल्लाहने इस्रायलच्या उत्तर क्षेत्रातील सैन्य तळाला लक्ष्य केले आहे. या हल्ल्यासोबतच पूर्ण क्षेत्रात आणि गोलन हाइट्स तसेच गलीलच्या विविध क्षेत्रांमध्ये सायरन वाजू लागला. या हल्ल्यामुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे.
इस्रायलचा इशारा
इस्रायलने अलिकडच्या काळात लेबनॉनमधील सशस्त्र समूह हिजबुल्लाहर अशाप्रकारचे हल्ले केले आहेत, ज्याची कल्पनाही तो करू शकत नव्हता असे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी म्हटले आहे. तर इस्रायलचे संरक्षणमंत्री योआव गॅलेंट यांनी उत्तर इस्रायलमधील रहिवासी सुरक्षित स्वत:च्या घरी परतत नाही तोवर हिजबुल्लाह विरोधातील कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा दिला आहे. यापूर्वी लेबनॉनमध्ये पेजर अटॅक झाला होता. या हल्ल्यात हिजबुल्लाहचे हजारो सदस्य गंभीर जखमी झाले होते. तर 32 सदस्यांचा मृत्यू झाला होता.