लाथ मारुन न्याय मागण्याची पद्धत चुकीची
कोल्हापूर :
आहिल्यानगर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहळ यांच्यामध्ये झालेल्या लढतीमध्ये पंचांच्या निर्णयावरुन मल्ल शिवराज राक्षे आक्रमक झाला. पंचांनी पृथ्वीराज मोहळ याला विजयी घोषित केल्यानंतर डबल महाराष्ट्र केसरी यांने पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेतला. निर्णयाने चिडलेल्या राक्षेने पंचांची कॉलर धरत लाथ मारली. त्याच्या या कृतीवरुन कुस्ती क्षेत्रातील दिग्गज मल्लांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राक्षेने केलेली कृती कुस्ती क्षेत्रासाठी अशोभनिय आहे. त्याची न्याय मागण्याची पद्धत चुकीची आहे. पंचांना मारहाण होण्याची घटना निंदनीय असून राक्षे याने मॅटवर ठिय्या मारुन पंचांना व्हीडिओ बघून निर्णय घेण्यास भाग पाडणे अपेक्षित असल्याचे मत ही हिंदकेसरी दिनानाथ सिंह, हिंदकेसरी विनोद चौगले, महाराष्ट्र केसरी विष्णु जोशिलकर, राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेता राम सारंग यांनी व्यक्त केले.
- देवासमान पंचांना लाथ मारणे महापाप
कुस्तीच्या आखाड्यात पंच हा देवासमान असतो. त्यांचे निर्णय पक्षपाती नसतात. देवासमान पंचांना लाथ मारणे महापाप आहे. कोल्हापुरात आमच्यावर राजर्षी शाहूंच्या कुस्तीचे संस्कार आहेत. प्रत्येक मल्लामध्ये वस्तादांबाबत एक आद रयुक्त भीती आसायची. शाहू खासबाग मैदानात गामा, मारुती माने, गणपत आंदळकर, सादिक, हरिश्चंद्र, बिराजदार, सतपाल, दादू चौगले, युवराज पाटील अशा दिग्गज मल्लांच्या कुस्त्या झाल्या. प्रत्येक वेळी पंचांचा निर्णय अंतिम ठरला. एकादवेळेस पंचांचा निर्णय पटला नाही तर मैदानात आम्ही लाल रुमाल टाकायचो. त्यावर पंचमंडळी पुन्हा चर्चा करुन निर्णय देत असत. पराभूत मल्लाला निर्णय मान्य झाला नाही तर तो शांतपणे मैदान सोडायचा. पण शिवराजने पंचांना लाथ मारुन चुकीचा पायंडा पाडला. त्यांने मॅटवर ठिय्या मारत व्हिडिओद्वारे पंचांना निर्णय घेण्यास भाग पाडणे अपेक्षित होते.
- हिंदकेसरी दिनानाथ सिंह
- कॉलर धरुन, लाथ मारुन चुकीचे पाऊल उचलले
लाल आखाड्यात पाऊल ठेवणारा प्रत्येक मल्ल कठोर मेहनत घेत असतो. महाराष्ट्र केसरीची गदा उंचावणे प्रत्येक मल्लाचे स्वप्न असते. पंचांनी शिवराजला पराभूत घोषित केल्यावर त्याने पंचांकडे दाद मागणे अपेक्षित होते. त्याने पंचांची कॉलर धरुन आणि लाथ मारुन चुकीचे पाऊल उचलले. पंचांचा निर्णय हा अंतिम असतो. पण एखाद्या मल्लाची अन्याय झाल्याची भावना झाली असेल तर त्याला न्याय देण्यासाठी पंचांनी अत्याधुनिक साधनांचा वापर करुन निर्णय देणे अपेक्षित आहे.
- हिंदकेसरी विनोद चौगले
- पंचावर हात उगारणे चुकीची पद्धत
पंचानी चुकीचा निर्णय दिला तरी पैलवानांनी अन्याय पचवून न्याय मागितला पहिजे. पंचावर हात उगारणे ही चुकीची पद्धत आहे. डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेने चुकीचे कृत्य केले. पंचांचा निर्णय मान्य नसेल तर तीन पंच आणि मुख्य पंचाकडे दाद मागता येते. व्हिडिओचा वापर करुन पंचांना निर्णयही बदलता येतो, पण कालच्या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत या गोष्टी घडल्या नाहीत. काही वेळा पंच जाणूनबुजून पक्षपाती निर्णय घेतात असा संशय मल्ल व्यक्त करतात. पण अशावेळी संयमाने दाद मागितली पाहिजे. शिवराज मैदानात ठाण मांडुन बसला असता तर पंचाकडुन फेरविचार झाला असता.
- विष्णु जोशिलकर, महाराष्ट्र केसरी
- स्पर्धाप्रमुखांनी हस्तक्षेप करत निर्णय द्यायला हवा होता
कुस्तीमध्ये प्रत्येक मल्ल हा जिंकण्यासाठी लढत असतो. अनावधानाने एखाद्या वेळेस चुकीचे निर्णय होत असतात. पण त्याविरोधात दाद मागण्यासाठी अनेक मार्ग आहेत. कुस्ती वादग्रस्त झाल्यावर स्पर्धा प्रमुखाने हस्तक्षेप करत तांत्रिक समितीचा सल्ला घेत निर्णय बदलता येतो. यासाठी शिवराज आणि त्यांच्या मुख्य प्रशिक्षकांनी मुख्य पंच आणि आखाडा प्रमुख यांच्याकडे दादा मागायला हवी होती. महाराष्ट्र केसरीसाठी मल्ल त्यांची तपश्चर्या पणाला लावतात. त्यामुळे शिवराजने पंचांना मारहाण न करता स्पर्धा प्रमुखांकडे दाद मागायला हवी होती. स्पर्धाप्रमुखांनीही तांत्रिक समितीच्या सहाय्याने व्हिडीओ पाहुन निर्णय देणे अपेक्षित होते. असा कोणताही प्रकार न झाल्यामुळे कालच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत गेंधळ उडाला.
- राम सारंग, राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते