भारतातून आलेला संदेश अत्यंत महत्त्वाचा
तारिक रहमान यांच्या पक्षाने मानले आभार
वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने (बीएनपी) भारताचे विदेशमंत्री एस. जयशंकर यांचे बेगम खालिदा जिया यांच्या निधनावर संवेदना व्यक्त केल्याबद्दल आभार मानले आहेत. जयशंकर यांनी 31 डिसेंबर रोजी ढाका दौरा केला होता. यादरम्यान त्यांनी बीएनपीचे अंतरिम अध्यक्ष आणि खालिदा जिया यांचे पुत्र तारिक रहमान यांची भेट घेतली होती. तसेच जयशंकर यांनी तारिक यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वतीने एक व्यक्तिगत पत्रही सोपविले. बीएनपीने जयशंकर, नरेंद्र मोदी आणि भारत सरकारच्या या कृतीचे कौतुक केले आहे.
एस. जयशंकर, भारत सरकार आणि भारताच्या लोकांकडून संवेदना व्यक्त करण्यात आल्याप्रकरणी आभार मानतो. आम्ही तुमचा संदेश आणि सद्भावाचे कौतुक करतो असे बीएनपीने म्हटले आहे. तसेच बीएनपीने जयशंकर आणि तारिक यांचे छायाचित्र जारी केले आहे. या छायाचित्रात जयशंकर हे तारिक यांना संवेदना पत्र सोपवित असताना दिसून येतात.
जयशंकर यांचा दौरा महत्त्वपूर्ण
जयशंकर यांचा ढाका दौरा आणि बीएनपीकडून आलेला संदेश दोन्ही देशांच्या संबंधांच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा आहे. भारत आणि बांगलादेशचे संबंध ऑगस्ट 2024 पासून तणावपूर्ण राहिले आहेत. शेख हसीना यांना पंतप्रधानपद सोडावे लागल्यावर बांगलादेशातील मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारची भूमिका भारतविरोधी राहिली आहे. ऑगस्ट 2024 मध्ये मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वात अंतरिम सरकार स्थापन केल्यावर कुठल्याही भारतीय मंत्र्याचा हा पहिलाच ढाका दौरा होता. या दौऱ्याकडे दोन्ही देशांमधील कटूता दूर करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले गेले आहे. बांगलादेशातील आगामी निवडणुकीत बीएनपी आघाडीवर राहणार असल्याचे मानले जात असल्याने देखील जयशंकर यांचा ढाका दौरा महत्त्वपूर्ण आहे.
खालिदा जिया यांचे निधन
खालिदा जिया यांचे दीर्घ आजारानंतर 30 डिसेंबर रोजी निधन झाले होते. तीनवेळा बांगलादेशच्या पंतप्रधान राहिलेल्या खालिदा यांच्यावर राजकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. खालिदा जिया यांच्या योगदानाला भारत महत्त्वपूर्ण मानत असल्याची टिप्पणी जयशंकर यांनी बांगलादेश दौऱ्यादरम्यान केली होती.