सूर आभाळाला भिडे
मुळात गाणं आणि सूर यासंबंधी विचार करताना कलाकारांची नजर ही फार वेगळी असते आणि तरीही स्वरांचं अस्तित्व हे कुठे कुठे आहे याबाबतीतल्या बऱ्याच जणांच्या कल्पना फारच ठोकळ असतात की काय असाही प्रश्न माणसाला पडेल. अर्थात भारतीय संगीत विशेषत: शास्त्राrय संगीत म्हणजे केवढं तरी स्वरभांडार आहे. त्यातून तुम्हाला हवी ती चीज बाहेर काढता येते.
सरसरून वाढता
सूर आभाळाला भिडे
ओसंडती अखंडित
चिरंजीवी फूलसडे
सूर म्हणजे आयुष्याला लागलेलं असं वळण आहे की ज्या वळणावरून आपल्याला फार वेगळ्या वाटा खुल्या होतात. हा प्रवास असा असतो की पुढे काय होईल आपल्याला माहीत नसतं. पण तो करताना चांगल्या गोष्टी अखंड पेरत जाणे, वाईट गोष्टी अखंड झाडून बाजूला करत जाणे, आपण ज्या पायवाटेवरून चालणार आहोत त्या पायवाटेसाठी आपणच मशागत करणे आणि अधिक सुंदर ठिकाणी येण्याच्या ओढीने अखंड चालत राहणे म्हणजे स्वरसाधना असते. जशी या जगात सुरांशिवाय जगू न शकणारी माणसं असतात. त्याचप्रमाणे जगात ज्यांना कुठलाही सूर आवडतच नाही अशाही व्यक्ती असू शकतात. खरंतर आपले पूर्वज असं म्हणून गेले आहेत की अशी या जगात कोणतीही वस्तू नाही की तिच्यामध्ये स्पंदनं नसतात. त्याचप्रमाणे असं म्हणता येईल की असा कोणताही ध्वनी नाही ज्यात नादच नसेल. प्रश्न एवढाच आहे की त्या ध्वनीची वारंवारिता, त्या ध्वनीची तीव्रता, यावर तो ध्वनी आपण संगीतात वापरू शकतो की नाही हे ठरतं. आणि याची असंख्य उदाहरणं आपण रोज बघतो. पूर्वी अगदी सकाळीच उठून बायका ताक घुसळायच्या. त्यात घुसळण्याच्या रवीचा आणि घुसळत जाणाऱ्या ताकाचा मिळून असा काही सुरेख नाद निर्माण व्हायचा! तो खरंच ऐकत राहण्यासारखा असे. किंवा ब्राह्ममुहूर्तावर पहिलं जागं जर कोण होत असेल तर ते म्हणजे अरण्य! आपण आता अंधारातून प्रकाशाकडे चाललोय हे पशुपक्ष्यांना सगळ्यात आधी कळतं. खरं तर पक्ष्यांना अधिक कळतं आणि त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे कलरव, किलबिलाट सुरू होतात. हळूहळू जंगलाला जाग यायला लागते. पक्ष्यांच्या आवाजाचे नमुने इतके सुंदर आणि इतके वैविध्यपूर्ण असतात की निसर्गाने सूर कुठे कुठे पेरून ठेवले आहेत त्याचं नवल वाटावं! आता अजून एक. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पक्ष्यांच्या आवाजाच्या व्हरायटी आपण ऐकू शकतो. त्या शेकडो प्रकारच्या असतात. ते एक अद्भुत जग आहे. त्याचप्रमाणे प्राण्यांचे आवाज! ते सगळेच आवाज सारख्या वारंवारितेचे नसतात. उदाहरणार्थ वाघाचा सूर ही एक मोठी डरकाळी असते. वांद्राचं ओरडणं वेगळं, सांबराचं ओरडणं वेगळं. छोट्या छोट्या प्राण्यांनी आपल्या कंठातून काढलेले आवाज वेगळे! ही पूर्ण ‘आवाज की दुनिया’ वसलेली असते महाराज जंगलात! वनमहर्षी मारुती चितमपल्ली यांनी अनेक पुस्तके लिहिलेली आहेत. त्यात त्यांनी जंगलातल्या अद्भुत वाटाव्या अशा कित्येक गोष्टींचं वर्णन केलेलं आहे. प्राण्यांचे आवाज हा त्यातला अर्थातच एक अविभाज्य भाग आहे. वनं वाचत ज्या माणसाने संपूर्ण आयुष्य व्यतीत केलं त्यांना नकळतच केवढी मोठी सूरसंगत लाभली होती याचं आश्चर्य वाटतं.
मुळात गाणं आणि सूर यासंबंधी विचार करताना कलाकारांची नजर ही फार वेगळी असते आणि तरीही स्वरांचं अस्तित्व हे कुठे कुठे आहे याबाबतीतल्या बऱ्याच जणांच्या कल्पना फारच ठोकळ असतात की काय असाही प्रश्न माणसाला पडेल. अर्थात भारतीय संगीत विशेषत: शास्त्राrय संगीत म्हणजे केवढं तरी स्वरभांडार आहे. त्यातून तुम्हाला हवी ती चीज बाहेर काढता येते. काही चाकोऱ्या ठरवून घ्याव्या लागतात हे खरं आहे. परंतु त्या चाकोरीवर नवनिर्मिती, संशोधन, कल्पनाविलास ह्याला अपरिमित वाव असतो. त्यामुळे प्रत्येकाने निर्माण केलेलं स्वरांचं जग अर्थातच वेगळं असतं. वैशिष्ट्यापूर्ण असतं. आणि हे सगळं गृहीत धरूनही आपल्याला असं म्हणावं लागेल की सूर केवळ वाद्य, कंठ आणि रूढार्थाने असलेलं संगीत यातच बंदिस्त असतात हे मात्र खरं नाही. देवाचं अस्तित्व जसं चराचरात असतं हे ज्यांना जाणवायला लागतं त्याला आत्मज्ञान झालं असं म्हणतात. त्याचप्रमाणे सुरांचं अस्तित्व हे जगभरात सांडलेलं असतं. ज्याला वस्तुमात्रात दृश्य किंवा अदृश्य स्वरूपात असलेले सूर वेचता येतात, दिसतात, त्याला स्वरज्ञान खऱ्या अर्थाने होतं असं म्हणावं लागेल. यात जराही अतिशयोक्ती नाही. कुमार गंधर्वांसारखा एखादा सव्यसाची गायक ही किमया सहजच घडवू शकत होता.
अर्थात या सहजाच्या पोटी प्रचंड प्रमाणात घेतलेली मेहनत, मृत्यूशय्येवर पडून असताना सुद्धा सतत केलेले चिंतन, विचार, मांडणी परिष्करण या सर्व गोष्टी अर्थातच होत्याच. परंतु संगीत हे चराचरात आहे. ते धूनउगम आहे. निसर्गातल्या प्रत्येक आवाजात एक एक सूर दडलेला असतो. आपल्याला त्या दृष्टीने पाहता आलं पाहिजे हे ठाम विधान कुमारांचं होतं. आणि ते नुसतं विधान करून कधीही थांबले नव्हते तर त्यांनी त्यांच्या मनात असलेले सर्वच्यासर्व प्रयोग करूनही पाहिले होते. नवीन नवीन धूनउगम रागांची निर्मिती हा त्यातलाच एक भाग होता.
उदाहरणार्थ राग मधुसुरजा! सर्वसामान्य माणसाचं पाहणं आणि ज्ञात्याचं पाहणं यात फरक असतो. कारण ज्ञाता माणूस आपण जे पाहतो ते मन:पटलावरून कोरून ठेवू शकतो. त्याचं रूपांतर कलाकृतीत करू शकतो. पुलंनी कुमार गंधर्वांबद्दल खूप लिहून ठेवलंय. त्यात त्यांनी एक आठवण अशी सांगितलेली आहे की एका ठिकाणी सूर्यास्त पाहायला कुमार गंधर्व आणि पुलं एकत्र गेले होते त्यावेळेला कुमार यांनी त्यांना सांगितलं की भाई हा सूर्यास्त बघून ठेव. उद्या हाच सूर्यास्त मी तुला गाण्यातून दाखवणार आहे आणि त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी जेव्हा ते गायला बसले तेव्हा तो सूर्यास्त त्यांनी स्वत:च्या गाण्यातून हुबेहूब उतरवला होता. इतका की ऐकणारे पुलं अवाक झाले होते. कारण त्यांनी तो प्रत्यक्ष पाहिलेला होता. ती अनुभूती त्यांना खोलवर जाणवली होती.
प्रत्येक ठिकाणच्या गाण्याच्या पद्धती आणि सुरेल कशाला म्हणावं याविषयीच्या कल्पनांमध्ये थोडा थोडा फरक असू शकतो. पुन्हा एकदा पुलंच्या भाषेत म्हणायचं तर ‘कौलावर पत्र्याचा तुकडा ओढल्यासारखे’ वाटणारे सूर एखाद्या ठिकाणच्या लोकांना सुरेल वाटू शकतात. परंतु जगातील कोणताही सच्चा कलाकार स्वस्थ बसलेला तुम्हाला दिसणार नाही. त्याच्या आजूबाजूला कितीही गोंधळ चालू असो. त्याच्या आजूबाजूला कितीही अप्रिय घटना सुरू असो. तो स्वत: कितीही वैफल्यग्रस्त व्हायची वेळ येवो, पण कुठे ना कुठे त्याच्या हाती परमेश्वराने दिलेलं संगीत तो घट्ट धरून ठेवतो. ती साथ त्याला जन्मापासून मृत्यूपर्यंत पुरेशी असते. अगदी काहीही समोर नसेल तरी वाहनाच्या घरघराटातून सुद्धा सा शोधून काढणारे असामी मी पाहिलेले आहेत. अशी माणसं शांत बसत नाहीत. कधी बोटाने ताल धरत बसतील. येता-जाता गुणगुणत बसतील. काहीतरी वेगळा विचार करत बसतील. अगदी झोपेतल्या झोपेत सुद्धा ताना घेणारे गुणी मेहनती कलाकार बघायला मिळाले आहेत.
अगदी रीतसर बसून ताना घेऊन पुन्हा पूर्वस्थितीत जाणारीही माणसं अहोरात्र त्या ध्यासापायी वेडी झालेली असतात. त्यांच्या हातून सुंदर कलाकृती घडतात ते उगाच नाही. चोवीस तास तंबोऱ्याचा सूर ऐकणे हे सर्वथा अशक्यच असतं. निदान आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे तंबोऱ्याचं अॅप लावून ठेवणे हे शक्य असलं तरी कान जागे ठेवणं हे आपल्या आवाक्याबाहेरच असतं. परंतु मन कायम स्वररत ठेवणं हे एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेसारखं होतच असतं. आणि त्यासाठी एकच गोष्ट आवश्यक असते ती म्हणजे आपल्या भोवतालच्या जगातले बेसूर न ऐकता सूर तेवढे ऐकण्याची कानांची तपश्चर्या तेवढी घडावी लागते. ती ज्यांची घडते ते कलाकार होतात. मग त्यांनी घडवलेले सूर कायम आभाळाला भिडत राहतात. सर्वांना आनंद देण्यासाठी!
अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु