Kolhapur News : सांबरेत अजूनही वैद्यकीय पथक तळ ठोकून
सांबरे गावात आरोग्य सेवक सक्रिय
नेसरी : सांबरे येथे झालेल्या महाप्रसादातून विषबाधेतील सगळे रुग्ण उपचार घेऊन सुखरूप घरी पोहोचले आहेत. घडलेल्या या धक्कादायक घटनेनंतर गावात सर्व सुरळीत सुरू असून खबरदारीसाठी मात्र सोमवारीही डॉक्टरांचे पथक तळ ठोकून होते.
सांबरे गावातील या घटनेनंतर आरोग्य विभाग व प्रशासनाने खबरदारी म्हणून वैद्यकीय पथक गावातच ठेवून त्यातील वेगवेगळ्या टीम घरोघरी जाऊन नागरिकांची विचारपूस व माहिती घेत आहेत. गावातील चुकूनच कोणीतरी किरकोळ लक्षणे असल्याचे सांगत असल्यास आरोग्य यंत्रणेकडून खबरदारीसाठी उपचार घेत आहेत.
यासाठी मुंगुरवाडी केंद्राचे डॉ. सौरभ पाटील, आरोग्य अधिकारी डॉ. विक्रम कोले, साधना घोलाकाय, वैदेही सिस्टर, विजया फुटाणे, अजित होडगे, बीरपक्ष बेनाडे, राजू कांबळे, सुष्मिता कांबळे, संजय काकीनकर, सुप्रिया शिंदे यांच्यासह आशा सेविका, आरोग्य सेवक, सुपरवायझर तळ ठोकून आहेत.
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून कोणत्याही गावात महाप्रसाद व अन्नदान करणाऱ्या सर्वांना खबरदारी घेण्याबरोबर आणि प्रशासनाकडून परवानगी घेण्याचे आवाहन केले आहे.