भगवंताची सेवा करण्यातच जीवनाचे सार्थक
प. पू. भक्तीरसामृत स्वामी महाराज : इस्कॉनच्या भागवत कथा महोत्सवाचा समारोप : श्रीकृष्णाच्या बाललीलांची दिली माहिती
बेळगाव : ‘आपल्या जीवनाचे सार्थक करायचे असेल तर त्यासाठी माणसाने प्रपंचाचा त्याग करण्याची गरज नाही. त्याकरिता भक्तांच्या संगतीत राहून श्रद्धेने, विनम्रपणे, भक्तीने आणि प्रेमाने भगवंताची सेवा केली पाहिजे, त्यांच्याबाबतच्या कथा ऐकल्या पाहिजेत, त्यांचे नामस्मरण केले पाहिजे, तरच हळुहळू भगवंताबद्दलचे प्रेम उत्पन्न होईल. असे झाले तर संपूर्ण जग वृंदावन होऊन जाईल’, असे विचार बेळगाव इस्कॉनचे अध्यक्ष प. पू. भक्तीरसामृत स्वामी महाराज यांनी बोलताना व्यक्त केले. जुने बेळगाव येथील कलमेश्वर देवस्थानसमोर झालेल्या श्रीमद्भागवत कथा महोत्सवाचा समारोप महाराजांच्या उपस्थितीत कथाकथनाने झाला.
या कथा महोत्सवात 23 ते 28 सप्टेंबरपर्यंत इस्कॉनचे भक्त श्री सुदर्शन प्रभुजी यांनी रोज सायंकाळी भगवान श्रीकृष्ण यांच्या जीवनावर कथा सांगितली. त्या कथा महोत्सवाचा समारोप करताना रविवारी भक्तीरसामृत स्वामी महाराज यांनी भगवान श्रीकृष्ण यांच्या जीवनातील बाललीलांची माहिती दिली. भगवंतांनी वृंदावनात केलेल्या अनेक बाललीला सांगितल्या. ‘भगवंतांना समजून घेण्यासाठी आपण श्रीमद्भागवतासारखे ग्रंथ वाचले पाहिजेत. त्यामध्ये शुक्रदेव गोसावी यांनी भगवंताच्या जीवनातील अनेक बाललीलांचे वर्णन केले. भगवान हे पद नाही हे लक्षात घेतले पाहिजे, असे सांगून बालवयातच पूतना वध, तृणावत वध, यमलार्जुन वृक्षाचे पडणे, बकासुराचा वध, कंसाचा वध, रुक्मिणी विवाह याचबरोबर त्यांच्या इतर लीलांची माहिती दिली.
‘भगवंतांचे वैशिष्ट्या असे की ते नेहमीच तरुण राहिले’ असेही महाराज म्हणाले. भगवंतांना पान, फूल, पाणी, फळ आदी गोष्टी भक्तिभावाने अर्पण केल्या तर ते त्यांचा स्वीकार करतात. तेथे कोणत्याही आर्थिक, सामाजिक परिस्थितीचा संबंध येत नाही. वृंदावनातील भक्ती ही अद्वितीय, अपूर्व अशी आहे हे सांगताना त्यांनी भक्तीचे दोन स्तर असल्याचे सांगितले. भक्ती नसेल तर आपल्याला भगवंत भेटू शकणार नाहीत. तेथे गरीब-श्रीमंत भेदभाव नाही. त्यांच्या लीला अलौकिक व मधुर आहेत. त्यांनी केवळ सात वर्षाचे असताना गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर उचलून धरला आणि पडणाऱ्या प्रचंड पावसापासून वृंदावनवासियांचे कसे संरक्षण केले, हे ही महाराजांनी सांगितले. प्रारंभी महाराजांच्या हस्ते यमुना देवीची पूजा करण्यात आली. त्याचबरोबर भजन, कीर्तन आदी कार्यक्रम पार पडले. सर्वांसाठी प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.