वाडदे वसाहतीमधील धरणग्रस्तांच्या सातबाराचा विषय निकाली
पालकमंत्री मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून धरणग्रस्तांना मिळणार सातबारा उतारे
5 जानेवारीला होणार साताबाराचे वाटप
कोल्हापूर प्रतिनिधी
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्न आणि पाठपुराव्यातून कसबा सांगाव ता. कागल येथील वाडदे धरणग्रस्त वसाहतीमधील धरणग्रस्तांच्या स्वमालकीच्या हक्काच्या सातबारा उताऱ्यांचा विषय कायमचा निकालात निघाला आहे. या वसाहतींमधील शंभरहून अधिक धरणग्रस्त कुटुंबांना त्यांच्या हक्काच्या स्वमालकीच्या शेतजमीनीचे सातबारा उतारे मिळणार आहेत.
तीन महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत पालकमंत्री मुश्रीफ यांनी या वसाहतीला अधिकाऱ्यांनी तातडीने भेट देऊन सर्वेक्षणाचे काम तात्काळ करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या प्रश्नासंदर्भात मुंबईत मंत्रालयामध्येही उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले होते. काळम्मावाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गावे गेल्याने धरणग्रस्त झालेल्या राधानगरी तालुक्यातील वाडदे व वाकी या दोन्ही वसाहतींचे कागल तालुक्यातील कसबा सांगाव या गावांमध्ये पुनर्वसन झाले आहे. सरकारने त्यांना घरांच्या जागा आणि शेतजमीनीही दिल्या. परंतु त्यांच्या स्वत:च्या नावाने शेत जमिनीचे सातबारा उतारे तयार होत नव्हते. वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री मुश्रीफ यांनी प्रयत्न आणि पाठपुरावा करून तसेच मंत्रालयीन स्तरावर बैठक लावून प्रयत्न केले. त्यानंतर या वाडदे वसाहतीतील शंभरहून अधिक कुटुंबांचा हा प्रश्न आता कायमचा निकालात निघणार आहे.
वाकी धरणग्रस्तांचा प्रश्नही लवकरच निकालात
याबाबत पालकमंत्री मुश्रीफ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, धरणग्रस्त शेतकऱ्यांना शेतजमिनी मिळाल्या आहेत, परंतु त्यांच्या मालकी हक्काचे सातबारा उतारे त्यांच्या नावावर होत नव्हते. वाकी धरणग्रस्त वसाहतीचाही पाठपुरावा सुरू आहे. लवकरच तो प्रश्नही कायमचा निकालात निघेल असे त्यांनी सांगितले.